ENG | MAR

अक्कलकोटचा जुना राजवाडा

सोलापूरपासून सुमारे  ३८ कि.मी. अंतरावर वसलेले श्रीक्षेत्र अक्कलकोट हे मध्ययुगीन काळातील एक प्राचीन नगर आहे. चौदाव्या शतकापूर्वी या नगराची वस्ती अस्तित्वात होती, असे ऐतिहासिक पुराव्यांवरून दिसून येते. श्री स्वामी समर्थांच्या काळापासून नगरपरिषदेचा दर्जा लाभलेले हे महाराष्ट्रातील मोजक्या प्राचीन नगरांपैकी एक आहे.

पूर्वी अक्कलकोट नगराभोवती मजबूत तटबंदी आणि खोल खंदक होता. संस्थानाची राजधानी असल्यामुळे येथे राजवाडा, प्रशासकीय इमारती, अधिकाऱ्यांची निवासस्थाने आणि भक्कम वाडे उभारण्यात आले होते. त्यांपैकी भोसले संस्थानिकांचा जुना राजवाडा आणि त्याचे विशाल बुरुज आजही त्या वैभवाची साक्ष देत उभे आहेत.

श्री स्वामी समर्थांच्या चरित्रात उल्लेखिलेला राजवाडा हाच हा जुना राजवाडा होय. श्री स्वामी समर्थांनी येथे अनेकदा वास्तव्य केले आणि असंख्य अलौकिक लीला घडवल्या. अक्कलकोटचे अधिपती भोसले संस्थानिकांवर त्यांची विशेष कृपादृष्टी होती.

शहाजीराजे द्वितीय यांच्या निधनानंतर मालोजीराजे द्वितीय गादीवर आरूढ झाले. पुढे मालोजीराजे आणि श्री स्वामी समर्थ यांचे अत्यंत निकटचे गुरु-शिष्य संबंध निर्माण झाले. मालोजीराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगी श्री स्वामी समर्थांनी त्यांना मार्गदर्शन केले. राजघराण्यावर त्यांची अखंड कृपा असल्यामुळे मालोजीराजांचा राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पडला आणि त्यांचे राज्य अखेरपर्यंत अबाधित राहिले.

या कृपाछत्राच्या स्मरणार्थ भोसले घराण्याने श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवात विशेष पूजा, अभिषेक आणि महाप्रसादाची परंपरा सुरू केली. आजही पुण्यतिथीच्या दिवशी पहाटे अभिषेक, दुपारी बारा वाजता महाआरती आणि नैवेद्य अर्पण करण्याचा मान भोसले घराण्याकडे आहे. तसेच अकरा ब्राह्मण आणि सवाष्णींना भोजन घालण्याची परंपराही आजतागायत अखंड सुरू आहे.

मालोजीराजांच्या जीवनात अनेक संकटे आली; परंतु प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचे निवारण झाल्याचा उल्लेख चरित्रग्रंथांत आढळतो. एकदा गाणगापूरला गेलेल्या मालोजीराजांना स्वप्नात भगवान दत्तात्रेयांनी, “मी तुझ्या गावी आलो आहे, मग तू येथे का आला आहेस?” असा दृष्टांत दिला. त्यानंतर ते तातडीने अक्कलकोटला परतले आणि श्री स्वामी समर्थ हेच दत्तावतार असल्याची त्यांची दृढ श्रद्धा झाली. पुढे त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या पादुका राजवाड्यात आणून त्यांची शास्त्रोक्त पूजा सुरू केली आणि गुरुप्रतिपदेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आरंभली. जीवनाच्या अखेरीस श्री स्वामी समर्थांच्या मुखकमलाचे दर्शन घेत असतानाच मालोजीराजांनी देहत्याग केल्याचे वर्णन आढळते.

इतिहासाच्या दृष्टीने पाहता, जुन्या राजवाड्याच्या परिसरात काही चालुक्यकालीन खाणाखुणा दिसतात. अक्कलकोटमध्ये विविध ठिकाणी आढळणाऱ्या अष्टमातृका शिल्पपट्टिका या चालुक्यकालीन शिल्पपरंपरेच्या निदर्शक मानल्या जातात. प्रारंभीचे बदामीचे चालुक्य, त्यानंतर राष्ट्रकूट आणि पुढे कल्याणीचे चालुक्य या राजवंशांचा या प्रदेशाशी संबंध होता.

याच ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणारे भूवराह हे बदामीच्या चालुक्यांचे राजचिन्ह जुन्या राजवाड्याच्या अंतर्गत प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस, लहान देवळाच्या स्वरूपात आजही पाहावयास मिळते. या शिल्पात भगवान श्रीविष्णूंचा वराहावतार आपल्या डाव्या सुळ्यावर पृथ्वीदेवीला धारण करून अधर्माचा नाश करीत असल्याचे प्रभावी चित्रण केले आहे. चालुक्य राजांनी वराहाला आपल्या राजसत्तेचे आणि धर्मरक्षणाचे प्रतीक म्हणून स्वीकारले होते.

आज राजवाड्यात प्रवेश करताना दिसणारे प्रशस्त प्रांगण हे तुलनेने अलीकडील काळातील आहे. पूर्वीचा प्रवेशमार्ग वेगळा होता. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उजवीकडे वळून अंतर्गत मार्गाने राजवाड्यात प्रवेश करावा लागत असे. याच ठिकाणी शिपाई पहारा देत असत. पुढे उजव्या हाताला चालुक्यांचे भूवराह राजचिन्ह आणि देवदर्शन करूनच राजवाड्याच्या आतील भागात प्रवेश करण्याची पद्धत होती.

आज हा जुना राजवाडा केवळ भोसले संस्थानच्या वैभवाची साक्ष देत नाही, तर श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोटातील कार्याशी, चालुक्यकालीन इतिहासाशी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा म्हणून उभा आहे.