अक्कलकोटचे खंडोबा मंदिर
अक्कलकोटच्या आध्यात्मिक इतिहासात खंडोबा मंदिराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण इ.स. १८५६ मध्ये ललिता पंचमीच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये प्रथम याच मंदिरात प्रकट झाले. त्यामुळे अक्कलकोटला येणारे अनेक भक्त आजही सर्वप्रथम या मंदिरात दर्शन घेऊन नंतर श्री स्वामी समर्थांच्या समाधी मठाकडे जातात.
परंपरेनुसार, आश्विन महिन्यात चिंतोपंत टोळ यांच्यासमवेत श्री स्वामी समर्थ सोलापूरहून घोड्यावरून अक्कलकोटकडे निघाले होते. वाटेतच कलेक्टराचा तातडीचा निरोप आल्यामुळे चिंतोपंतांना सोलापूरला परतावे लागले. त्यांनी आपल्या सेवकाला महाराजांवर लक्ष ठेवण्याची सूचना केली. मात्र, “हम किसी के हुक्म के ताबेदार नहीं” असे म्हणत श्री स्वामी समर्थ त्या सेवकाच्या नजरेआड झाले आणि थेट अक्कलकोटच्या वेशीजवळील खंडोबा मंदिरात प्रकट झाले.
अक्कलकोट एस.टी. स्थानकासमोर, सोलापूर मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर अक्कलकोटच्या भोसले संस्थानिकांनी आपल्या कुलदैवतासाठी बांधले होते. श्रीमंत शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणीसाहेब या पंढरपूर, तुळजापूर आणि जेजुरीच्या नियमित यात्रेला जात असत. वृद्धापकाळात जेजुरीला जाणे शक्य होणार नाही, या भावनेतून त्यांनी जेजुरीहून श्री खंडोबा, बाणाई आणि म्हाळसा यांच्या मूर्ती अक्कलकोटला आणून त्यांची विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. मूर्तींवर तांब्याचे मुखवटे बसविण्यात आले. त्याचबरोबर जेजुरीहून आणलेला एक लहान घोडाही मंदिरात ठेवण्यात आला होता. मार्गशीर्ष महिन्यातील रविवारी आणि चंपाषष्ठीच्या दिवशी त्या घोड्याची मिरवणूक काढली जात असे. पुढे त्या घोड्याचा मृत्यू झाल्यावर मंदिरासमोर त्याची समाधी बांधण्यात आली.
पुढे श्रीमंत ताराबाई राणीसाहेबांच्या कारकिर्दीत या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराभोवती पत्र्याचे आच्छादन, दगडी ओटा आणि इतर आवश्यक बांधकाम करून मंदिर अधिक प्रशस्त करण्यात आले. इ.स. १९३२ मध्ये संस्थानामार्फत हनुमंत अप्पा गुरव यांची येथे पूजाअर्चेसाठी नियुक्ती करण्यात आली. सध्या त्यांच्या वंशजांकडून मंदिराची देखभाल आणि धार्मिक परंपरा जपल्या जात आहेत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत येथे खंडेरायाचे नवरात्र, अभिषेक, आरती, महापूजा आणि महाप्रसादाचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
अक्कलकोटमध्ये प्रथम प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ थेट मंदिराच्या गर्भगृहात गेले आणि श्री खंडोबाच्या पाषाणमूर्तींवरील तांब्याच्या मुखवट्यांशी बालभावाने खेळू लागले. हा विलक्षण प्रसंग पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. काही वेळाने महाराज ते मुखवटे हातात घेऊन मंदिराबाहेर पडले आणि अक्कलकोटच्या थोरल्या वेशीजवळ जाऊन तेथील एका देवडीत सलग तीन दिवस निराहार बसून राहिले.
याच ठिकाणी रिसालदार अहमद अली खाँ नाईकवाडी यांनी महाराजांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रिकामी चिलम महाराजांच्या हातात देत, “क्यों, हुक्का पीते हो?” असा प्रश्न केला. श्री स्वामी समर्थांनी ती रिकामी चिलम ओढली आणि ती प्रज्वलित झाल्याचा अद्भुत अनुभव उपस्थितांना दिसला. या प्रसंगामुळे अहमद अली खाँ महाराजांच्या योगसामर्थ्याने प्रभावित झाले आणि त्यांना अत्यंत आदराने बुधवार पेठेतील चोळाप्पांच्या घरी घेऊन गेले.
खंडोबा मंदिरातून आणलेले तांब्याचे मुखवटे श्री स्वामी समर्थांनी चोळाप्पांच्या घरी जपून ठेवले. ते अनेकदा ते मुखवटे एकमेकांत अडकवून त्यामध्ये धान्य भरत खेळत असत. हे मुखवटे आजही श्री स्वामी समर्थ समाधी मठाच्या गर्भगृहात सुरक्षित ठेवलेले आहेत. महाराजांनी मुखवटे सोबत नेल्यानंतर अनेक वर्षे खंडोबा मंदिरात मूळ पाषाणमूर्तींचीच पूजा केली जात होती.
या मंदिरात ज्या पाषाणावर श्री स्वामी समर्थ बसले होते, त्या ठिकाणी पूज्य गजानन महाराज यांनी इ.स. १९८५ मध्ये श्री स्वामी समर्थांचा मोठा फोटो आणि पाषाण पादुकांची प्रतिष्ठापना केली.