ENG | MAR

वराह मूर्ती

भगवान श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी तृतीय अवतार म्हणजे श्रीवराह अवतार होय. या अवताराचे सविस्तर वर्णन श्रीमद् भागवत महापुराण, विष्णु पुराण, वराह पुराण, मत्स्य पुराण तसेच इतर अनेक पुराणांमध्ये आढळते.

पुराणांनुसार सृष्टीच्या प्रारंभी दैत्य हिरण्याक्षाने पृथ्वीदेवीला (भूदेवीला) रसातळात नेले. त्यामुळे सृष्टीचे संतुलन बिघडले आणि सर्वत्र अराजकता निर्माण झाली. तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान श्रीविष्णूंचे ध्यान केले. त्यांच्या नाकपुडीतून अंगुष्ठमात्र आकाराचे वराहरूप प्रकट झाले. क्षणार्धात त्याचे रूप पर्वताएवढे विराट झाले. भगवान वराह प्रलयजलात उतरले, त्यांनी आपल्या दिव्य सुळ्यांवर भूदेवीला धारण करून रसातळातून वर आणले आणि तिला तिच्या पूर्वस्थितीत प्रतिष्ठित केले.

यानंतर भगवान वराह आणि हिरण्याक्ष यांच्यात घनघोर युद्ध झाले. अखेरीस भगवान वराहांनी हिरण्याक्षाचा वध करून धर्माची पुनर्स्थापना केली. त्यामुळे श्रीवराह अवतार हा पृथ्वीचा उद्धार, अधर्माचा नाश आणि धर्मसंस्थापनेचे प्रतीक मानला जातो. तात्त्विक दृष्टिकोनातून हा अवतार अज्ञानावर ज्ञानाचा, अन्यायावर न्यायाचा आणि अधर्मावर धर्माचा विजय दर्शवितो. योग्य वेळी ईश्वर संपूर्ण सृष्टीच्या रक्षणासाठी अवतार धारण करतात, हा या अवताराचा मूलभूत संदेश आहे.

मूर्तिशास्त्रात वराहाच्या अनेक स्वरूपांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये आदि-वराह, भू-वराह, यज्ञ-वराह, लक्ष्मी-वराह इत्यादी रूपांचा समावेश होतो. मानवी धड आणि वराहाचे मुख असलेल्या प्रतिमेला नृ-वराह असे संबोधले जाते.

येथे दर्शविलेली प्रतिमा चतुर्भुज असून डाव्या खालच्या हाताच्या दंडावर भूदेवी विराजमान आहे. तिच्या हातात नीलोत्पल (निळे कमळ) आहे. वरच्या दोन हातांमध्ये अनुक्रमे चक्र आणि पद्म, तर खालच्या हातांमध्ये गदा आणि शंख धारण केलेले आहेत. मस्तकावर किरीट-मुकुट असून संपूर्ण देह विविध अलंकारांनी सुशोभित आहे. प्रतिमेच्या पायाशी हिरण्याक्ष राक्षसाचे शिल्पांकन केलेले असून त्यासोबत मानवी रूपातील नागही दर्शविला आहे. ही संपूर्ण प्रतिमा वराह अवताराने पृथ्वीचे केलेले रक्षण आणि अधर्मावर मिळविलेल्या विजयाचे प्रभावी प्रतीक आहे.