ENG | MAR

जुन्या राजवाड्यातील अद्भुत लीला

श्री स्वामी समर्थ महाराज हे अवतारी महापुरुष असल्याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक लीला अक्कलकोटमध्ये घडल्या आहेत. त्यांपैकी एक अत्यंत विलक्षण घटना जुन्या राजवाड्यात घडल्याचे श्रीस्वामी चरित्रग्रंथांत वर्णन आढळते. आपल्या भक्ताच्या आर्त हाकेला प्रतिसाद देण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी राजवाड्याच्या तटावरून उडी मारून दर्शन दिले, अशी ही भक्तवत्सलतेची अद्वितीय लीला होय. आजही जुन्या राजवाड्याची ती भिंत या प्रसंगाची साक्ष देत उभी आहे.

या लीलेमागे पुण्याचे प्रसिद्ध संत रामचंद्र बळवंत उर्फ रामानंद बिडकर महाराज यांचा जीवनप्रवास दडलेला आहे. इ.स. १८३२ मध्ये एका देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांची श्रीहनुमंतावर अपार श्रद्धा होती. अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी पंढरपूरची वारी केली. त्या वेळी त्यांना साक्षात श्री विठ्ठलाचे दर्शन झाले. पुढे वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनावेळी देवीच्या मुखातील त्रयोदशगुणी विडा त्यांच्या हातावर पडला आणि आदिशक्तीची कृपा त्यांच्यावर झाल्याचे मानले जाते.

युवावस्थेत त्यांनी काही काळ नोकरी केली. त्यानंतर सुगंधी द्रव्यांचा व्यापार, कवड्यांचा व्यवसाय आणि सराफी अशा विविध उद्योगांत ते यशस्वी झाले. कल्याण येथे एका अवलिया संताच्या सहवासातून त्यांना काही गूढ विद्याही प्राप्त झाल्या. त्यामुळे त्यांना मोठी संपत्ती आणि लौकिक लाभला. परंतु ऐहिक सुखांच्या परमोच्च शिखरावर पोहोचल्यानंतरही त्यांच्या अंतःकरणाला समाधान लाभले नाही. सांसारिक वैभव क्षणभंगुर असल्याची जाणीव होताच त्यांची ओढ परमार्थाकडे वळली.

एकदा एका साधुपुरुषांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, “संपत्ती मिळविणे सोपे आहे; परंतु परमार्थासाठी वैराग्य आवश्यक आहे.” हे शब्द त्यांच्या मनाला भिडले. त्यांनी अखंड साधनेचा निश्चय केला. श्रीहनुमंताची उपासना, जप आणि हनुमान कवचाचे अकरा पाठ पूर्ण केल्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत. अनेक महिन्यांच्या या कठोर उपासनेनंतर श्रीहनुमंतांनी त्यांना दर्शन देऊन, “अक्कलकोटला जा आणि श्री स्वामी समर्थांचे दर्शन घे,” अशी आज्ञा दिली.

रामचंद्र बीडकर यांचा असा विश्वास होता की, “जो राम माझ्या हृदयात वसतो, तोच अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या रूपाने विराजमान आहे.” याच भावनेतून त्यांनी “समर्थांच्या दर्शनाशिवाय मी अन्नग्रहण करणार नाही.” असा संकल्प केला आणि ते अक्कलकोटला आले.

अक्कलकोटमध्ये ते पेठेतील आप्पासाहेब शेरखाने यांच्या घरी उतरले. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, श्री स्वामी समर्थ सध्या राजवाड्यात आहेत आणि एकदा राजवाड्यात गेल्यावर ते अनेक दिवस बाहेर येत नाहीत. त्यामुळे उपवासाचा हट्ट सोडावा. पण रामानंद बिडकर आपल्या संकल्पावर ठाम राहिले. एक दिवस गेला, रात्र सरली आणि दुसरा दिवस उजाडला.

याच काळात राजवाड्यात अचानक श्री स्वामी समर्थ अस्वस्थ झाले. ते मोठ्याने म्हणू लागले, “हमारेकू बंदीखाने में डालते हैं. लोगोंको तकलीफ होती है, दर्शन नहीं मिलते.” उपस्थित मंडळी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. राजवाड्याचे मुख्य दरवाजे राजांच्या परवानगीशिवाय उघडता येत नसल्यामुळे सेवकांनी अनुमती घेण्यासाठी धावपळ सुरू केली.

परंतु श्री स्वामी समर्थ कोणाच्या बंधनात अडकणारे नव्हते. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी राजवाड्याच्या उंच तटावरून थेट खाली उडी मारली आणि बाहेर जमलेल्या भक्तांना दर्शन दिले.

ही बातमी समजताच आप्पासाहेब शेरखाने तातडीने रामानंद बिडकरांना घेऊन तेथे आले. रामानंदांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि विधिपूर्वक पाद्यपूजा केली. यानंतर त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. श्री स्वामी समर्थांची कृपा त्यांच्यावर अखंड राहिली. पुढे रामचंद्र बळवंत बिडकर हेच पुण्याचे पूज्य रामानंद बिडकर महाराज म्हणून प्रसिद्ध झाले.

जुन्या राजवाड्याच्या डाव्या बाजूस मुदपाकखान्यालगत हा सुमारे १६ फुटांपेक्षा जास्त उंचीचा तट आहे.  येथूनच समर्थांनी उडी घेतली असे सांगितले जाते. त्या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते आणि शरीर वृद्धत्वाकडे झुकले होते. अशा अवस्थेत केवळ आपल्या भक्ताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलेली ही उडी त्यांच्या भक्तवत्सल स्वभावाची आणि सर्व बंधनांच्या पलीकडे असलेल्या दिव्य सामर्थ्याची साक्ष म्हणून आजही स्मरणात ठेवली जाते.