राजवाड्यालगतचे पंचायतन गणेश मंदिर
अक्कलकोटच्या जुन्या राजवाड्यालगत, शहाजी वाचनालयासमोर भोसले संस्थानिकांनी उभारलेले पंचायतन गणेश मंदिर आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे. मंदिरात पंचायतनातील श्रीगणेश, भगवान शिव, सूर्य, शक्ती आणि विष्णू यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती दाक्षिणात्य शिल्प परंपरेचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. मूर्तीवरील कोरीव काम, प्रमाणबद्धता आणि कलात्मकता आजही भाविकांचे लक्ष वेधून घेतात.
या मंदिराशी श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोटातील प्रारंभीच्या वास्तव्याचा एक महत्त्वपूर्ण प्रसंग जोडला जातो. अक्कलकोटमध्ये एक महान योगी आले असून त्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याची वार्ता संस्थानिक श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या कानावर आली. धार्मिक वृत्तीचे असलेल्या मालोजीराजांनाही त्या महापुरुषांच्या दर्शनाची तीव्र इच्छा झाली. सेवकांकडून चौकशी केली असता ते योगी राजवाड्यालगतच्या या गणेश मंदिरात वास्तव्यास असल्याचे समजले.
मालोजीराजांच्या मनात विचार आला, “हे जर खरेच सिद्धपुरुष असतील, तर ते याच क्षणी मला येथेच दर्शन देतील.” असे मनोमन म्हणताच श्री स्वामी समर्थ दिगंबर अवस्थेत राजवाड्यात त्यांच्या समोर दत्तस्वरूपात प्रकट झाले. हा अद्भुत अनुभव पाहून मालोजीराजे विस्मयचकित झाले. तत्काळ दाजीबा भोसले यांच्यासह ते गणेश मंदिरात गेले. तेथे त्यांनी पाहिले की, काही क्षणांपूर्वी राजवाड्यात ज्यांचे दर्शन झाले, तेच योगीवर्य मंदिरात विराजमान आहेत. यामुळे त्यांच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या.
मालोजीराजांनी श्री स्वामी समर्थांना पुष्पमाला आणि श्रीफळ अर्पण करून नम्रतापूर्वक वंदन केले. श्री स्वामी समर्थांनी तेच श्रीफळ त्यांच्या हाती परत देत त्यांना आध्यात्मिक कृपेचा प्रसाद दिला. त्यानंतर जवळील काषायवस्त्र मालोजीराजांच्या अंगावर टाकून, “राजवैभव क्षणभंगुर आहे. त्याग, धर्म आणि प्रजाहित यांचा विचार ठेवून राज्यकारभार करा,” असा मूक संदेश दिला.
यानंतर श्री स्वामी समर्थांनी पुष्पमाला संस्थानचे खाजगी कारभारी दाजीबा भोसले यांच्या गळ्यात घातली. अनेक स्वातंत्र्यप्रेमी आणि राष्ट्रभक्तांशी दाजीबांचा असलेला निकटचा संबंध श्री स्वामी समर्थांना ज्ञात होता. त्यांच्या कार्याला दिलेली ही मूक मान्यता आणि सन्मान मानला जातो.
अशा प्रकारे श्रीमंत मालोजीराजे भोसले आणि श्री स्वामी समर्थ यांची पहिली भेट याच श्रीगणेशाच्या साक्षीने घडली. त्यामुळे हे मंदिर अक्कलकोटच्या आध्यात्मिक आणि संस्थानिक इतिहासात विशेष स्थान प्राप्त करते.
या मंदिराच्या पूजाअर्चेसाठी प्रारंभी मैंदर्गी येथील भट जोशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढे हे कुटुंब अक्कलकोटात स्थायिक झाले आणि “मैंदर्गीकर” हेच त्यांचे उपनाम रूढ झाले. या घराण्यातील लक्ष्मण भटजी मैंदर्गीकर यांनी आयुष्यभर श्रीगणेशाची आणि श्री स्वामी समर्थांच्या सेवाकार्याची अत्यंत निष्ठेने सेवा केली. अनेक वर्षे अखंड पूजाअर्चा केल्यानंतर एके दिवशी त्यांनी श्रीगणेशासमोर मस्तक टेकवले आणि त्याच ठिकाणी शांतपणे देह ठेवला.
श्री स्वामी समर्थांचे या मंदिरात अनेकदा आगमन झाले असून त्यांनी येथे अनेक वेळा विश्रांतीही घेतल्याचा उल्लेख आढळतो. मंदिरालगत असलेल्या वाड्यातील कट्ट्यावर श्री स्वामी समर्थ बसत असत. त्या कट्ट्याशेजारील औदुंबर वृक्ष आजही या स्मृतींचा निःशब्द साक्षीदार म्हणून उभा आहे.