लंबोदर गणपती
भगवान श्रीगणेशाच्या अनेक नामांपैकी लंबोदर हे एक अत्यंत प्राचीन आणि अर्थपूर्ण नाव आहे. लंब म्हणजे मोठे किंवा विशाल आणि उदर म्हणजे पोट. त्यामुळे लंबोदर म्हणजे “विशाल उदर असलेला”. हे केवळ शारीरिक वैशिष्ट्य नसून, संपूर्ण विश्वाला आपल्या उदरामध्ये धारण करणाऱ्या परमचैतन्याचे प्रतीक मानले जाते. गणपती अथर्वशीर्ष, गणेश पुराण, मुद्गल पुराण तसेच विविध आगम आणि मूर्तिशास्त्रीय ग्रंथांमध्ये लंबोदर स्वरूपाचे महत्त्व वर्णिले आहे.
पुराणांनुसार भगवान श्रीगणेशांचे विशाल उदर हे संपूर्ण चराचर सृष्टीचे प्रतीक मानले जाते. विश्वातील सर्व जीव, पंचमहाभूते, देव, दानव आणि सृष्टीतील सर्व तत्त्वे त्यांच्या उदरामध्ये सामावलेली आहेत, अशी वैष्णव, शैव आणि गाणपत्य परंपरेतील तात्त्विक व्याख्या आढळते. मुद्गल पुराणानुसार लंबोदर हे श्रीगणेशाचे एक विशेष स्वरूप असून त्यांनी क्रोधासुराचा पराभव करून क्रोध, अहंकार आणि असंयम यांवर विजय मिळविल्याचे वर्णन आढळते. त्यामुळे लंबोदर हे संयम, क्षमा, धैर्य आणि विवेक यांचे प्रतीक मानले जाते.
भारतीय मूर्तिशास्त्रात लंबोदर गणपतीच्या प्रतिमा इ.स.च्या पाचव्या-सहाव्या शतकापासून मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, होयसळ, काकतीय आणि विजयनगरकालीन मंदिरांमध्ये विविध स्वरूपातील गणेशप्रतिमा आढळतात. महाराष्ट्रातील लेणी, मंदिरे आणि प्राचीन देवालयांमध्येही लंबोदर स्वरूपातील अनेक गणेशमूर्ती कोरलेल्या दिसतात.
मूर्तिशास्त्रानुसार लंबोदर गणपतीची प्रतिमा सामान्यतः चतुर्भुज असते. सदर मूर्तीच्या वरच्या दोन हातांमध्ये पाश आणि अंकुश, तर खालच्या हातांमध्ये मोदकपात्र, तुटलेला दात आहे. सोंड डावीकडे वळलेली असून ती मोदकाकडे झुकलेली आहे. मस्तकावर मुकुट, गळ्यात हार, यज्ञोपवीत, बाहूंमध्ये केयूर, मनगटात कंकणे आणि कटीभागी मेखला अशी अलंकारयोजना दिसून येते. पायाशी मूषक हे वाहन दर्शविलेले आहे. विशाल गोल उदर हे या मूर्तीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.