ENG | MAR

नरसिंह

भारतीय मंदिर स्थापत्यात काही शिल्पे पाहताक्षणीच मनावर ठसा उमटवतात. त्यापैकी सर्वाधिक प्रभावी प्रतिमा म्हणजे नरसिंह. सिंहाचे मुख, मानवी धड आणि विलक्षण उग्र भाव यांमुळे ही मूर्ती सहज लक्ष वेधून घेते. परंतु नरसिंहाचे महत्त्व केवळ विष्णूच्या चौथ्या अवतारापुरते मर्यादित नाही. मंदिर स्थापत्यात तो धर्मसंरक्षण आणि दैवी न्याय यांचा मूर्त संदेश आहे.

पुराणानुसार  हिरण्यकश्यपच्या अत्याचारांचा अंत करण्यासाठी विष्णूंनी नरसिंहावतार धारण केला. ना मनुष्य, ना पशू  या अवतारात संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावर  हिरण्यकश्यपचा वध करून त्यांनी ब्रह्मदेवाच्या वरदानालाही बाधा येऊ दिली नाही.

मूर्तिशास्त्रीय ग्रंथांमध्ये नरसिंहाच्या अनेक रूपांचा उल्लेख आढळतो. उग्रनरसिंह, लक्ष्मीनरसिंह, योगनरसिंह, ज्वालानरसिंह अशा विविध स्वरूपांत त्याचे दर्शन घडते. काही ध्यानवर्णनांमध्ये त्याचा सुवर्णवर्ण, चार भुजा आणि शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले स्वरूप वर्णिले आहे.

भारतीय शिल्पकारांनी नरसिंहाच्या चेहऱ्यावर सिंहाची उग्रता आणि डोळ्यांत दैवी करुणा यांचा विलक्षण समतोल साधला आहे. त्यामुळे ही मूर्ती केवळ क्रोधाचे प्रतीक राहत नाही, तर धर्मरक्षणासाठी आवश्यक असलेल्या दैवी शक्तीचे रूप बनते.

यादव, चालुक्य, होयसळ आणि विजयनगरकालीन मंदिरांमध्ये आढळणाऱ्या नरसिंहशिल्पांचा अभ्यास केला असता त्यांची शैली आणि मुद्रा वेगवेगळी असली, तरी त्यामागील संदेश एकच आहे. अन्याय कितीही बलवान असला तरी धर्माचे रक्षण करणारी शक्ती सदैव जागृत असते. म्हणूनच मंदिरातील नरसिंह हा भक्तासाठी भयाचे नव्हे, तर अभयाचे प्रतीक मानला जातो.