ENG | MAR

नागयुग्म

भारतीय मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्रामध्ये नागयुग्म अथवा सर्पमंडल हे अत्यंत प्राचीन आणि अर्थपूर्ण प्रतीक मानले जाते. परस्परांमध्ये गुंफलेले दोन नाग केवळ अलंकारिक शिल्प नसून सृष्टीतील संतुलन, संरक्षण, अनंतत्व आणि दिव्य ऊर्जेचे प्रतीक आहेत. प्राचीन काळापासून मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर, जलकुंड, विहिर, बारव, घाट, शिवमंदिर तसेच देवालयांमध्ये नागयुग्माचे शिल्पांकन करण्याची परंपरा आढळते.

पुराणांनुसार सृष्टीनिर्मितीच्या प्रारंभी ब्रह्मदेवांनी महर्षी कश्यप यांना प्रजोत्पत्तीचे कार्य दिले. महर्षी कश्यप यांच्या अनेक पत्नींपैकी कद्रू हिच्यापासून नागवंशाची उत्पत्ती झाली. तिच्या गर्भातून अनंत (शेष), वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख आणि कुलिक यांसारखे दिव्य नाग प्रकट झाले.

भारतीय परंपरेत नागांना भूमी आणि जल यांचे रक्षक मानले जाते. नद्या, तलाव, विहिरी आणि भूमिगत पाण्याशी त्यांचा संबंध जोडला गेला आहे. त्यामुळे मंदिरात नागयुग्म कोरण्याचा उद्देश त्या स्थानाचे संरक्षण आणि जलसंपत्तीबद्दल आदर व्यक्त करणे हा आहे.

मूर्तिशास्त्रानुसार नागयुग्मामध्ये दोन नाग एकमेकांत गुंफलेले किंवा सममितीय रचनेत दर्शविले जातात. एकमेकांत दोन नाग हे सृष्टीतील संतुलनाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या फण्यांचा विस्तार समान प्रमाणात असून मध्यभागी कमळ, कलश, शिवलिंग, यंत्र किंवा इतर पवित्र चिन्ह कोरलेले आढळते. काही शिल्पांमध्ये दोन्ही नागांच्या शेपट्या परस्पर गुंफलेल्या असतात, तर फण्यांनी मध्यभागाचे संरक्षण केलेले दिसते. ही रचना संरक्षण, समतोल आणि अखंड जीवनचक्र यांचे प्रतीक मानली जाते.

भगवान शिवाच्या गळ्यातील नाग असो, किंवा भगवान विष्णू ज्यावर विसावले  आहेत तो शेषनाग असो, भारतीय संस्कृतीत नागाला देवतेचा मिळाला आहे. म्हणूनच मंदिरात असलेली ही शिल्पे पावित्र्य आणि दैवी संरक्षण याचे प्रतिक म्हणून कोरली जातात.

भारतीय शिल्पकारांनी नागांच्या वेटोळ्यांतील लय, शरीराचा वक्रपणा आणि दोन्ही नागांमधील समतोल अतिशय सुंदर पद्धतीने दगडात साकारला आहे. त्यामुळे ही शिल्पे पाहताना त्यांची कलाकुसर आणि कल्पकता सहज लक्षात येते.