संस्थानिकांची आनंदबाग – थडगीमळा

जुन्या राजवाड्याच्या मागच्या बाजूस अक्कलकोट संस्थानिकांच्या मालकीचा निसर्गरम्य परिसर आहे. जुन्या राजवाड्याच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्याकडील ही जागा भोसले राजघराण्याच्या मालकीची आहे. येथील संस्थानिकांच्या पूर्वजांच्या सर्वच समाधींचे बांधकाम उत्कृष्ट आहे. तो आनंदबाग या नावाने ओळखला जातो. भोसले कुटुंबातील दिवंगत स्त्री-पुरुषांच्या असंख्य समाधी या परिसरात आहेत. अक्कलकोट संस्थानचे संस्थापक राणोजी लोखंडे पाटील तथा फत्तेसिंह महाराज पहिले यांचेपासून, सिंहासनावर बसलेल्या सर्व राजांच्या आणि राजस्त्रियांच्या समाधी आहेत. यात श्रीमंत शहाजीराजे यांची समाधी अत्यंत भव्य अशी आहे. बाहेरून एखादे मंदिर वाटावे अशा या समाधी स्थानास सदा मंडप नावाचे मोठे सभागृह आहे. पावणे दोनशे वर्षांपूर्वी मार्बल सारख्या मौलवान दगडाचा वापर करून बांधलेली शहाजीराजे भोसले यांची समाधी खरोखरच प्रेक्षणीय आहे. राजघराण्याच्या मालकीचा हा संपूर्ण परिसर राजपुरुषांच्या समाधी मंदिरांनी व्याप्त असल्यामुळे, अक्कलकोटचे ग्रामस्थ त्यास थडगीमळा म्हणू लागले. श्रीमंत फत्तेसिंहमहाराज तिसरे हे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर, शेकडो लोकांच्या लवाजम्यासहित देवदर्शनास निघत त्यावेळी वटवृक्ष स्वामी मठा वरून श्रीसमाधी मठ व आईसाहेब अंबाबाई मंदिर येथे दर्शन करून आनंदबागेत येत. इथे पूर्वजांच्या समाधींची विधीवत पूजा करून, ते नवीन राजवाड्यात परतत असत. संध्याकाळी विजयादशमीच्या निमित्ताने खास दरबार भरून, संबंधीत व्याक्तिंचे मानपान होत असत.