अक्कलकोटचे प्राचीन वैभव – जुना राजवाडा

सोलापूरपासून अडोतीस किमीवर असलेले श्रीक्षेत्र अक्कलकोट हे चौदाव्या शतकापूर्वी वसलेले प्राचीन शहर. अक्कलकोट रेल्वे स्थानकापासून ते बारा किमीवर आहे. श्रीस्वामी समर्थांच्या काळापासून नगरपरिषद असलेले हे महाराष्ट्र राज्यातले हे एकमेव शहर होय. मजबूत अशा तटबंदीने वेढलेल्या नगराला सभोवती मोठमोठे खंदक होते. येथील जुना राजवाडा आणि त्याचे भव्य बुरुज हे अक्कलकोटचे एकेकाळचे वैभव. अक्कलकोट हे संस्थानच्या राजधानीचे शहर असल्यामुळे येथील राजेसाहेबांचे निवासस्थान, तहसील कार्यालय, न्यायालय, सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने, खाजगी वाडे, बंगले यांचे सर्व बांधकाम भक्कम होते. जुन्या राजवाड्याच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्याकडे आनंदबाग तथा थडगीमळा प्रसिध्द असून तिथे संस्थानिकांच्या पूर्वजांच्या बांधकामाचे उत्कृष्ट नमुने असलेल्या समाधी आहेत. पावणेदोनशे वर्षांपूर्वी मार्बलचा उपयोग करून बांधलेली शहाजीराजे भोसले यांची समाधी प्रेक्षणीय आहे. आनंदबागेसमोरच जुना डाकबंगला असून बंबगार्डन साहेबाचे वास्तव्य त्याकाळी याच डाकबंगल्यात होते.

महाराजांच्या चरित्रात जो राजवाड्याचा उल्लेख येतो तो याच जुन्या राजवाड्याचा. महाराजांनी इथे असंख्य लीला केल्या. अक्कलकोटचे अधिपती भोसले संस्थानिक यांच्यावर महाराजांची अखंड कृपा होती. शहाजीराजे दुसरे यांचा मृत्यू झाला आणि मालोजीराजे दुसरे हे गादीवर आले. सत्तेवर नवा राजा आला. दोन वर्षांच्या दुष्काळानंतर प्रचंड जलवृष्टी होऊन सर्व चराचर सृष्टीत नवचैतन्य आले आणि श्रीस्वामी समर्थ महाराजांचे, सध्या उन्हाळा आहे, आंव्याच्या दिवसात येऊ या उद्गाराचा प्रत्यंतर आला. महाराजांचे चरणांबुज खंडोबाच्या मंदिरानंतर पांडुरंग पुराणिकांच्या गृहास लागले. तिथे बाबा सबनीसांची व समर्थांची गाठभेट होऊन माणिकनगरची खूण पटली. पुराणिक कुटुंबावर कृपा करून श्रीमहाराज राजांच्या गणपती मंदिरात विराजमान झाले. मालोजींची व समर्थांची ही प्रथम भेट. यानंतर मालोजीराजांनी महाराजांच्या पूर्ण आशीर्वादाने अक्कलकोट संस्थानची कीर्ती दिंगत केली.

श्रीस्वामी समर्थ महाराजांचे या जुन्या राजवाड्यात अनेकदा वास्तव्य घडले. असून तिथे घडलेल्या असंख्य लीला आपण चरित्रांमधून वाचतो. मालोजी राजेंवर समर्थांची अपार कृपा होती. त्यामुळेच मालोजींचा राज्याभिषेकाचा संस्कार यथासांग पार पडून त्यांचे राजेपण अखेरपर्यंत टिकले. महाराजांच्या या कृपाछत्राचा आदर ठेवून भोसले घराण्याने श्रीमहाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात विशेष पूजा अभिषेक करून भंडारा प्रसाद देण्याची प्रथा सुरु केली, ती आजअखेर सुरु आहे. पुण्यतिथीच्या पहाटे अभिषेक, दुपारी बारा वाजता आरती व नैवेद्य देण्याचा मान राजघराण्याचा असतो. अकरा ब्राह्मण व सवाष्ण यांना भोजन घालण्याची परंपरा आजही कायम आहे. श्रीमंत मालोजीराजेंवर अनेक प्रकारची संकटे ओढवली पण श्रींच्या कृपेने त्यांचे निवारण झाले. मी तुझ्या गावी आलो असून तू येथे का येतोस असा स्वप्न दृष्टांत देऊन दत्तात्रयांनी गाणगापुरास गेलेल्या मालोजींना अक्कलकोटास परत धाडले. त्यानंतर श्रीमंत मालोजीराजांना श्रीस्वामी दत्तावतार आहेत याची खात्री पटली. त्यांनी श्रींच्या पादुका घेऊन त्यास गंधलेपन व शास्त्रोक्त पूजाअर्चा करून त्या आपल्या देवात पूजेस ठेवल्या आणि गुरुप्रतिपदेचा उत्सव अक्कलकोटात ते धूमधडाक्यात साजरा करु लागले. अंतकाळी श्रींचे मुखकमल न्याहाळीतच मालोजी राजेंनी देह ठेवला.

जुन्या राजवाड्याच्या थेट संबंध सहाव्या सातव्या शतकातील चालुक्य राजवटीशी जोडता येतो. राष्ट्रकूट हे चालुक्यांचे मांडलिक पण पुन्हा अकराव्या शतकानंतर चालुक्यच पुन्हा नवे राजे बनले. अष्टमातृकापट्टी अवकलकोटात दोन-चार ठिकाणी आढळत असून ती चालुक्य राजवटीची निदर्शक आहे. बदामीच्या चालुक्यांचे भूवराह हे राजचिन्ह जुन्या राजवाड्यात प्रवेश केल्यानंतर अंतद्वारीच्या उजव्या अंगास छोट्याशा मंदिर स्वरूपात आढळते. संपूर्ण पृथ्वीतलास आपल्या डाव्या दातावर बसवून श्रीविष्णू वराह देत्यांचे निर्दालन करीत संपूर्ण धरेचे रक्षण करीत आहेत, अशी ही सुंदर प्रतिमा. जुन्या राजवाड्यात शिरल्यानंतर जो प्रांगणाचा भाग लागतो तो अगदी अलिकडच्या काळातला. पूर्वी प्रथम प्रवेशानंतर लगेचच शिपाई वर्गाच्या नजरेच्या टप्यातून उजवीकडे वळत प्रवेश घ्यावा लागत असे. जुन्या राजवाड्यातील हाच पूर्वीचा प्रवेश मार्ग होता. तिथून वर येताच उजवीकडे राजचिन्ह आणि देवदर्शन असा शिरस्ता होता.