समाधी मठामागील विरुपाक्ष मोदींचा वाडा
अक्कलकोटमधील मातब्बर घराण्यांपैकी एक घराणे मोदी यांचे. भोसले संस्थानचा खजिना सांभाळणारे मोदी. राजांच्या सल्लागार समितीवरील प्रमुख अधिकारी यांना सांगवीच्या पुढे असलेल्या कोळेकर वाडी येथे संस्थानकडून इनामी जमीन आहे. दुधनीच्या गुरु शांतलिगम् महाराजांचे अनुग्रहित असलेले हे अत्यंत इमानी आणि विरक्त घराणे. पिढीजात श्रीमंत परंतु अत्यंत नम्र. विरुपाक्ष आणि राचप्पा मोदी हे मूळचे विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील व्हर्ति या गावचे. राचोटीचा देव वीरभद्र हे यांचे उपास्य दैवत. त्यांच्यावर राचप्पा मोदींची असीम श्रध्दा असून या वीरभद्र देवावर त्यांनी असंख्य काव्यरचना केल्या होत्या.
इंडी तालुक्यातील तंब गावचे गोविंद शिवराम जोशी हे स्वामी कृपांकित होते. त्यांच्यामुळे या मोदी कुटुंबाला स्वामी महिमा कळला. गोविंदभटांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांची भेट घेऊन त्यांचेवर कवन करावे असे त्यांस सुचविले. परंतु राचप्पा म्हणाले की, वीरभद्रा वाचून मी अन्य कुणावर काव्य करीत नाही. यावर गोविंद भट हिरमुसले. श्रींचा अपमान झाला आणि तोही आपल्यामुळे असे वाटून त्यांनी अन्नत्याग केला. सात दिवस निराहार बसून स्वामींचे स्मरण करीत राहिले. देव वीरभद्र यामुळे व्यथित झाले. त्यांनी राचप्पांना दृष्टांत देऊन मी आणि स्वामी समर्थ महाराज एकच आहोत. तू द्वैत बाळगू नकोस इथेच स्वामीरायांवर कवन कर असा आदेश दिला. राचप्पा तंब येथे जाऊन गोविंद भटांचे चरणी लागले आणि श्रींच्या दर्शनास अक्कलकोटास आले. स्थाईक झाले. त्यांनी बांधलेला वाडा आजही उत्तम स्थितीत असून श्रीमहाराजांवर त्यांनी असंख्य काव्यरचना केल्या. राचप्पांनी स्वामी समर्थ महाराजांचे चरित्रही लिहिले होते असे त्यांचे वंशज सांगतात पंरतु दुर्दैवाने यापैकी काहीही उपलब्ध नाही. राचप्पा व त्यांचे बंधू दोघांनाही पुत्र संतान नव्हते. राचप्पांना एक कन्या होती. तिचा विवाह अक्कलकोटातच लोकापुरे यांच्याशी झाला. विरुपाक्ष यांना श्रीमहाराजांच्या खारकेच्या प्रसादाने १८७२ साली मुलगा झाला. त्यांचे नाव विरभद्रप्पा यांना श्रींचा सहवाही मिळाला. यांचे चिरंजीव (दत्तक) श्री अण्णाराव हे २००० साली वटपौर्णिमेच्या दिवशी पुत्र हे दिवंगत झाले. श्रीस्वामी समर्थ महाराजांचे मोदी वाड्यातील वास्तव्य आणि तिथे घडलेल्या असंख्य लीला ते स्वमुखाने सांगत असत. अण्णारावांचे मोदींचे सध्याचे वंशज असून ते सोलापूर येथे प्राध्यापक आहेत. श्रीस्वामी महाराज मोदींच्या वाड्यात ज्या चौपाळ्यावर ( झोपाळ्यावर ) बसत तो या मोदींनी वटवृक्ष देवस्थानला अर्पण केला असून त्याचे दर्शन आपणास भक्त निवास येथील चित्र प्रदर्शनाचे ठिकाणी घडू शकते.
या मोदी वाड्यात श्रींनी अनेकांवर कृपा केली आहे. पूज्य बाळप्पा महाराजांची व श्रींची प्रथम भेट याच वाड्यात घडली. श्रींनी आपल्या मुखातील खडीसाखरेचा खडा बाळप्पांच्या मुखात घातला आणि आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ त्यांचे गळ्यात घालून आपलेसे केले. नारायणदास नामक गुर्जर विप्राची कानउघडणी केली ती इथेच. बीड येथील त्याचे घरी ब्राह्मण रूपात प्रकट होऊन त्याच्या पत्नीची प्रसूती सुलभ केली. यावेळी केलेला संकल्प ब्राह्मणाने पाळला नाही म्हणून त्यास अक्कलकोट येथे चार महिने सेवेस ठेऊन प्रकृती स्वास्थ्य दिले. मुंबईचे लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य तथा भाऊ रसूल हे भाऊचा धक्का बांधणारे कर्तृत्ववान पुरुष. श्रींच्या अक्कलकोट येथील भेटीस आले. १८५६ च्या सुरवातीलाच ब्राह्मण भोजनाचा संकल्प करून रुपये दोनशे पाठवतो म्हणून मुंबईला गेले आणि विसरले. श्रींनी तीन वर्षांच्या बटू रूपात प्रकट होऊन त्याची पूर्तता करून घेतली त्यानंतर लगेचच भाऊ निवर्तले. परंतु त्यांची व श्री महाराजांची प्रथम भेट याच वाड्यात झाली होती. दत्तजयंतीच्या दिवशी तीनशे जणांकरता म्हणून केलेल्या स्वयंपाकात तीनचार हजार माणसे जेवली. ती स्वामीरायांवरील हिंगुलाज व अंबाबाईच्या असलेल्या अखंड कृपेमुळे शिवाय अन्नपूर्णा त्यांना अंकित होतीच.
कानफाट्यास जेरबंद करून सरकारच्या स्वाधीन करण्यापूर्वी कानफाट्याच्या इच्छेनुसार त्यास समर्थांचे दर्शन घडले ते याच मोदीवाड्यात. श्रींचे मुखदर्शन घडल्याशिवाय तोंडात पाणीही न घालणाऱ्या नाथपंथी कानफाट्यास श्रींनी प्रसन्न चित्ताने दर्शन दिले. त्यावेळी श्रींची स्वारी खुषीत होती. वामनबुवांनी तीर्थयात्रेहून आणलेल्या गंगाजलाने श्रींचे स्नान झाले होते. रेशमी भगवी वस्त्र परिधान करून श्रीमोदीवाड्यातील झोपाळ्यावर प्रसन्नचित्त विराजमान होते. शेगावचे गजानन महाराज हे श्रींचे शिष्य परंतु श्रींनी अक्कलकोट येथे त्यांचेवर कधी कृपा केली? कुठे केली? याच उलगडा होत नव्हता. पूज्य अण्णाराव यांना ऐकिवात असलेल्या अन्य घटनांप्रमाणे त्यांच्या वाड्यात घडलेली गजानन महाराजांवरील स्वामीकृपा ते अखेरपर्यंत सांगत असत. मोदी वाड्यातील देव्हाऱ्यात सतरा वर्षांच्या युवा गजानन महाराजांच्या शिरावर स्वामींनी कृपा हस्त ठेवला आणि पुढील मार्गदर्शनासाठी नाशिक येथे देवमामलेदारांकडे धाडले. अक्कलकोटला समाधी मठात दर्शन घेतल्यावर विरुपाक्ष मोदींच्या पुण्यप्रद वाड्यास अवश्य भेट द्यावी.