शहागंज बागेतील भली थोरली वापी

ज्यावेळी श्रीस्वामी समर्थांनी आपला पंचमहाभूतात्मक देह टाकून आपल्या वरवरुपी लीन होण्याचा निर्णय घेतला. सन १८७८ च्या चैत्र पोर्णिमेपासूनच त्याची चिन्हे दिसू लागली. श्रीस्वामी महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी अनेक विचित्र लीला केल्या, त्यात शहागंज बागेतील विहिरीवर घडलेला प्रसंग सांगितला जातो. अक्कलकोट सोलापूर रोडवर जिथे नवा राजवाडा आहे त्याच्या पुढे उजव्या हातास, गणेशबाग परिसर लागतो. तेथील दोनं विहिरींवर श्रींची बैठकीची जागा होतीच. त्या विहिरींवर घडलेला प्रसंग अन्यत्र दिला आहे. या गणेशबागेकडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस आपणास सरकारी रोपवाटिका कार्यालय दिसते, अनेक प्रकारची झाडे, रोपे येथे विक्रीस उपलब्ध असून संपूर्ण परिसर आज हराभरा दिसतो. हीच शहागंज बाग होय. श्रींनी देह ठेवण्यापूर्वी दोन वर्षे भयानक दुष्काळ पडला होता. त्यामुळे अक्कलकोटमधील सर्व वापी कोरड्या पडल्या होत्या. पिण्याच्या पाण्याची वानवा होती. अक्कलकोट मधील सर्व वावड्या ह्या अत्यंत प्रशस्त मोठ्या घेराच्या दगडी भक्कम बांधकामाच्या आणि खूप खोल अशा आहेत. पर्जन्यमान कमी असलेल्या प्रदेशात अशा अजस्त्र विहिरी आपणास पहावयास मिळतात. शहागंज बागेतील विहीर अशीच भली भक्कम असून शंभर सव्वाशे फूट खोल आहे. टप्याटप्याने सुमारे शंभर पायऱ्या उतरून विहिरीच्या तळापर्यंत जाता येते. १८७६च्या दुष्काळाचे वेळी या विहिरीचे पाणी हाती लागायचे. पुढे असले नसले पाणी सरून विहिर खडखडीत झाली. या विहीरीच्या मधल्या भागात वरच्या अंगाला एक बैठकीची जागा आहे. श्रीमहाराज तिथे अनेकदा येऊन बसत असत. शहागंज बागेचा परिसर म्हणजे एके काळचे अरण्य. जंगली श्वापदांच्या शिकारीसाठी प्रसिध्द असलेले हे शाही अरण्य. अक्कलकोट नरेशांचे वास्तव्य शिकारीच्या निमित्ताने इथे वारंवार घडत असे.

एकदा श्रीमहाराज आपल्या सेवेकऱ्यांच्या मेळाव्या सोबत शहागंज बागेत आले. परिसर फिरून ते या विहिरीकडे आले. दुष्काळी स्थिती. एवढ्या भल्या थोरल्या विहिरीत पाण्याचा टिपूसही नव्हता. महाराजांनी भविष्याचा वेध घेऊन अक्कलकोटच्या जनतेच्या हितदार्थ या विहिरीस सदैव पाणी रहावे यासाठी एक योजना केली. सेवेकऱ्यांना बोलावून आपला बिछाना वस्त्रे आणि अन्यकाही जिनसा इथे आणून या विहिरीत जाळून टाकण्याची आज्ञा केली. या कृत्यामागे महाराजांचा जो जनकल्याणकारी हेतू होता तो ओळखण्या एवढी सेवेकऱ्यांची मति असती तर कशाला हवे होते! स्वार्थी सेवेकऱ्यांनी महाराजांच्या आज्ञेचे उल्लंघन केले. महाराजांनी सांगितलेल्या वस्तू जाळण्याऐवजी ते स्वत:च्या घरी घेऊन गेले. श्रीमहाराजांनी सेवेकऱ्यांचे हे कृत्य जाणले आणि स्वत:ची लंगोटी स्वत:च्या हाताने या विहिरीत जाळून पाण्याचे दुर्भिक्ष मिटवले. आज ही विहीर ढासळली असली तरी पाणी राखून असते. तिचे बांधकामाची भक्कमता आजमावण्यासाठी आपण या वापीस अवश्य भेट द्यावी.