महाराजांचे सेवेकरी

अक्कलकोट हे संस्थानच्या राजधानीचे गाव असले तरी पूर्वी फारसे प्रसिध्द नव्हते. चाळीस पंचेचाळीस उंबऱ्यांचे अतिशय छोटे असे खेडे होते. श्रीस्वामी समर्थ महाराज १८५६ मध्ये येथे प्रकट झाले आणि या गावाची ख्याती सर्वदूर पसरली. काशीपासून रामेश्वरपर्यंत सहाशे वर्षे भ्रमंती करत आलेले महाराज हे उभ्या हिंदुस्थानात बुवा, दिगंबर, चंचलभारती अशा विविध नावांनी प्रसिध्द होते. अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली बसत त्यामुळे वटवृक्षस्वामी आणि त्यांच्या शेकडो चमत्कारांमुळे ते स्वामी समर्थ किंवा अक्कलकोटचे स्वामी या नावाने ओळखले जाऊ लागले. पुणे वैभव साप्ताहिकात श्रीस्वामीरायांच्या असंख्य लीला व चमत्कार प्रकाशित झाले आहेत. परीसस्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसे महाराजांच्या आगमनानंतर अक्कलकोटचे सोने झाले. इथला व्यापार शतपटीने वाढला. शेकडो टांगे गावात फिरु लागले. कडबगाव स्टेशनावर उतरून रोज शे-दिडशे भाविकांचा जत्था अक्कलकोटास येऊ लागला. पूज्य बाबा सबनीस, त्यांचे मेहुणे पांडुरंग पुराणिक, चिंतोपंत टोळ आणि चोळाप्पा हे चार सेवेकरी महाराजांच्या नित्य सेवेस असत. पुढे महाराजांची कीर्ति ऐकून भले-भले सत्पुरुष, सरकारी अधिकारी, मातब्बर लोक महाराजांची कृपा संपादन करण्यासाठी येऊ लागले. महाराजांच्या येथील उण्यापुऱ्या बावीस वर्षांच्या कालखंडात हजारो लोक कृपांकित झाले. परंतु, आपल्याकडे इतिहास लिहून ठेवण्याची सवय नसल्यामुळे असंख्य चमत्कृतिंना आपण मुकलो आहोत. स्वामी महाराज कधीही एकाच ठिकाणी बसत नसत. दिवसातून किमान दहा- बारा स्थानांवर ये-जा असे. अर्थातच सेवेकऱ्यांचा मेळाही त्यांच्या आगे-मागे असायचाच. तू औदुंबराच्या छायेत बस, अशी आज्ञा करून बाळप्पांना महाराजांनी उत्तराधिकारी पद दिले. ज्योतिबा सेवेकरी हे महाराजांच्या हयातीत पंधरा वर्षे तर महाराजांच्या पश्चात ४१ वर्षे वटवृक्ष देवस्थानची देखभाल करीत तिथेच समाधीस्त झाले. महाराजांचे कुंभार बाबासाहेब यादव हे समाधी स्थानावर अपरिमित सेवा करून स्वामी रूपात मिळाले. अक्कलकोटच्या तुरुंगात सक्तमजुरीची शिक्षा भोगणारा एकनाथ कानफाट्या महाराजांच्या समाधीनंतर एकनाथ पुण्यास गोसावी पुन्यात जाऊन तिथेच निधन पावला. स्वामींचे गवळी मोरोपंत म्हसकर हे राजे रायराया मठाचे पुजारी झाले. दत्तंभट तसेच गोडधोडाचा स्वैपाक करून महाराजांना खाऊ घालणारे गणपतराव मुळे संगमेश्वरकर हे पुढे काशीस गेले. महादेव भट, परशुराम लंगोटीवाले अशा काही सेवेकऱ्यांनी तीर्थक्षेत्री प्रस्थान ठेवले. महाराजांचे कबीरा हे रामदासी साधू पंढरपूर येथे गेले. लठ्या पंडित तथा श्रीपाद भटजी हे चोळप्पाचे जावई अखेरपर्यंत अक्कलकोटलाच राहिले. भुजंगा भालके सेवेकऱ्यांचे घराणे आजही अक्कलकोटात आहे. चोळाप्पाचे चिरंजीव कृष्णाप्पा धोंडोबा यांचा वंश आजही अक्कलकोटात स्वामीसेवेत आहे. सुईवाले बळवंतराव, विश्वंभरबुवा अविट, केशव रामचंद्र देशपांडे, विरुपाक्ष व राचाप्पा मोदी, सेवेकरी, रंगाप्पा, शिऊवाई देशमुख, नरसप्पा व भगवंत सुतार, पांडुरंग पुराणिक, जयतीर्थ पुराणिक, चिंतोपंतांचे चिरंजीव गोविंदराव टोळ, महाराजांची हुक्क्याची सेवा सांभाळणारे जगन्नाथ सेवेकरी सुंदराबाई श्रीस्वामीकृपा संपादून महाराजांच्या पश्चात् आपापल्या स्थानी गेले.

भुजंगा भालके

श्रीस्वामी समर्थ महाराजांचे सुंदराबाई, बाळणा, चोळाप्पा, भुजंगा भालके असे अनेक शिष्य होते. पैकी सुंदरबाई, बाळप्पा यांचे वंशज अक्कलकोटात नाहीत. चोळाप्पाचे वंशज बुधवार पेठेत तसे वटवृक्ष देवस्थानात पुजारी आहेत. श्रीमहाराजांचे मागे चवरी ढाळण्याचे काम करणारे भुजंगा भालके हे मूळचे अक्कलकोटचे लिंगायत वाणी. अक्कलकोटचे रिजंट माधवराव विंचुरकर यांनी भुजंगा यांना शिपाई सेवक म्हणून श्रींच्या सेवेत ठेवले. ही जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडली. श्रीमहाराजांच्या चरित्रात या भुजंगांचा उल्लेख अनेक घटना प्रसंगातून येतो. महाराज त्यांना फिरंगी म्हणत. श्रीमहाराजांनी प्रसाद स्वरूप दिलेल्या खडावा भुजंगांच्या वंशजांनी त्यांच्या पश्चात गुरुमंदिराकडे सुपूर्द केल्या. शिक्षकी पेशातून तालुका मास्तर म्हणून निवृत्त झालेले बसवणप्पा सिध्दप्पा भालके हे भुजंगांचे पणतू. हर्डीकरांच्या वाड्यानंतर, ग्रामजोशी किंवा सध्याच्या मेंथेवाड्याकडे आपण बोळात सिरतो. तो बोळ भालके बोळ म्हणून प्रसिध्द असून तिथूनच पुढे भालकेंचे घर लागते. त्यांच्या घराच्या गच्चीतून वटवृक्ष देवस्थानचा ध्वज दिसतो. इतके ते जवळ आहे. भुजंगांचे निधनाची तारीख माहीत नाही. त्यांचे पुत्र रेवणसिध्दण्णा यांना श्रींचे दर्शन घडले होते. ते १९५१ साली दिवंगत झाले. यांना चार पुत्र होते. पैकी शेंडेफळ गंगाराम हे लहान असताना शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडले ते घरी आलेच नाहीत. मातापिता डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पहात होते. त्यानंतर तब्बल ४० वर्षानंतर ते साधू वेशात अवकलकोटास आले. हिमालयात वास्तव्यास होते. एक दिवस येऊन घरच्या मंडळींना भेटून पुन्हा निघून गेले ते कधी आले नाहीत. भुजंगांच्या कुटुंबावर आजही श्रींचे कृपाछत्र आहे हे भुजंगाच्या वंशजांना भेटल्यानंतर जाणवते.