बुधवार पेठेतील अष्टभुजा अंबाबाई मंदिर

अक्कलकोटात जसे रामचंद्राचे विठ्ठलाचे एकमुखी दत्ताचे विष्णूचे मारुतीचे देऊळ आहे त्याचप्रमाणे आदिशक्ती अंबाबाईचे मंदिरही प्रसिध्द आहे. श्रीस्वामी महाराजांची लाडकी गाय भागिरथी गंगा व तिच्या वासरांना चारायला नेणारे एक गुराखी होते. ते कोळी समाजाचे असून त्यांचे नाव होते विठोबा नारायण पुजारी. बालपणापासूनचा गुरे राखण्याचा त्यांचा हा नेम श्रीमहाराजांच्या समाधीनंतरही सुरुच होता. त्याच्या सेवेने संतुष्ट झालेल्या बुधवार पेठेत श्रीमहाराजांनी त्यास अंबाबाईच्या स्वरुपात दर्शन दिले. त्याची स्मृती म्हणून त्यांनी बुधवार पेठेत अष्टभुजा अंबाबाई मातेचे मंदिर उभारले. रुद्र स्वामींचा जंगममठ जिथे आहे तेथून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूस हे टोलेजंग मंदिर आहे. १ मे १९४१ रोजी याची स्थापना झाली. अलिकडच्या काळात त्याचा जीर्णोद्धार झाला. सांगलीच्या श्री. कोटणीस महाराजांनी उभारलेल्या स्थानाप्रमाणे, श्रीस्वामी महाराज अंबाबाई स्वरुपात इथे सेवा स्वीकारीत आहेत. नवरात्रात इथे मोठा उत्सव होतो. हजारो लोक दर्शनासाठी येतात. श्रीमंत फत्तेसिंह महाराज दसऱ्याचे दिवशी सीमोल्लंघनास निघत तेव्हा प्रचंड जनसमुदायास इथे येत. श्रीस्वामी महाराजांच्या या जगदंब वरूपास वंदन करून मगच पुढे जात. स्वामीराव टोपण्णा पुजारी हे या अंबाबाई देवस्थानची पूजाअर्चा व देखभाल करतात. या अंबाबाई मंदिरा व्यतिरिक्त्त अक्कलकोटात सदाशिव सखाराम चव्हाण या देवीभक्ताने उभारलेले अष्टभुजा भवानी मंदिर प्रसिध्द आहे. तसेच राजण्णा पुजारी यांनी बांधलेले एस.टी. स्टँड जवळील रेणुका मंदिर, नवीन राजवाड्याजवळील अलिकडेच बांधलेले कालिका मातेचे मंदिर, जैन धर्मीयांची देवस्थाने असून नवरात्रात पद्मावती मातेची पूजा प्रेक्षणीय असते. टिळक गल्लीत रहाणाऱ्या बाळू प्यारी यांच्या घरी सुमारे आठशे वर्षांपूवीची वैभवसंपन्न अशी देवीची मूर्ती नित्य पूजेत आहे. नवरात्राच्या उत्सवकाळात खंडोबा मंदिराप्रमाणेच या सर्व मंदिरांतून आदिशक्तीचा जागर, पूजा, गोंधळ- भंडारा मोठ्या उत्साहात संपन्न होतो.