बाळकृष्णभट ग्रामजोशींचा वाडा आणि तेथील स्वामी पादुका
अक्कलकोटचे वेदशास्त्रसंपन्न विद्वान ब्राह्मण श्री. बाळकृष्णभट ग्रामजोशी. त्यांचा भलाथोरला वाडा वटवृक्ष देवस्थानकडून फत्तेसिंह चौकाकडे जाताना उजव्या बाजूस आहे. नित्यनेमाने श्रींच्या सेवेत असलेले हे निष्ठावान स्वामीभक्त. या जोशीबुवांच्या घरी श्रीस्वामी समर्थ महाराजांची अधूनमधून फेरी असायची. एके वर्षी मार्गशीर्ष महिन्यात वडोद्याचे ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वैद्य, प्रतिवर्षीच्या शिरस्त्यानुसार गुरुदर्शनार्थ अक्कलकोटी आले. वामनबुवांचे वास्तव्य ग्रामजोशींच्या वाड्यातच असायचे. दत्तजयंतीच्या दिवशी प्रात:काळी बाळकृष्णभटजीं श्रींच्या दर्शनार्थ आले. त्यांनी श्रींना नैवेद्यासाठी आपल्या घरी येण्याचे विधिवत निमंत्रण दिले. त्यावर आमचे झाल्यावर चवथ्या दिवशी येऊ, असे महाराजांनी सांगितले. आपल्या गृही अनेकदा येणारे स्वामीराय आपण बोलावल्यादिवशी मात्र फिरकलेही नाहीत. त्यामुळे बाळकृष्णभट अस्वस्थ झाले. त्यांनी ते शल्य तसेच दाबून टाकले. पुढे काही दिवसांनी अनेक सेवेकऱ्यांसमवेत श्रीस्वामी समर्थ महाराज अचानक ग्रामजोशींच्या वाड्यात भोजनासाठी उपस्थित झाले. श्रीबाळकृष्णबुवांची कळी त्यामुळे खुलली. स्वयंपाकाची तयारी झाली. श्रींसह सर्व सेवेकऱ्यांची पंगत बसली. श्रींचे भोजन सुरु असताना जोशीबुवा हात जोडून त्यांच्यासमोर लीन झाले. महाराज पारण्याच्या दिवशी आपले आगमन झाले नाही, त्यामुळे आम्हास गोड वाटले नाही असे जोशीबुवांनी म्हटले मात्र. महाराज संतापले. ‘आम्ही भिकारी आहोत काय? पारण्याच्या दिवशी आमच्या पानावर एकच लाडू आणि मूठभर भातच का बरे वाढला होता? तेवढ्याने आमचे पोट कसे भरेल आणि ही गोष्ट बडोद्याहून आलेल्यांना कळत नव्हती काय? …
‘श्रींचे हे उद्गार ऐकून जोशीबुवा आणि ब्रह्मनिष्ठ वामनबुवा चकित झाले. या गोष्टीची शहानिशा केली असता नैवेद्याबाबतची ही हेळसांड सुंदराबाईनी केली होती हे सर्वांच्या लक्षात आले. झाल्या प्रकाराची माफी मागून पुन्हा नैवेद्य अर्पण करण्याची आज्ञा वामनबुवांनी मागितली आणि श्रींनी त्यास अनुमोदन दिले. दुसऱ्याच दिवशी बुवांनी श्रीस्वामीरायांना यथासांग नैवेद्य अर्पण केला. श्रींनी तो कबूल केला. भोजनोत्तर तांबूल ग्रहण करून, ” अरे एक-दोन मनुष्यास पुरेल एवढे अन्न नैवेद्यावर वाढावे.’ अशी समज देऊन महाराज मुरलीधर मंदिराकडे निघून गेले हा प्रसंग प्रत्येक स्वामीभक्ताने लक्षात घेण्यासारखा आहे. आपल्या घरी सणासुदीच्या दिवशी देवासाठी जो नैवेद्य वाढला जातो, त्यावर हातचं राखून मूठभर न वाढता सर्व पदार्थ घसघशीत वाढावे अशी शिकवण श्रीमहाराजांनी दिली आहे. त्यावेळी उपस्थित असलेले सर्व लोक स्वामी महाराजांच्या अंतर्यामीत्वामुळे प्रभावित झाले. कारण दत्तजयंतीच्या पारण्याच्या दिवशी महाराज नैवेद्यग्रहणासाठी प्रत्यक्ष आले नसताना त्यांनी त्या नैवेद्याचे केलेले वर्णन ऐकून सारेच मंत्रमुग्ध झाले. ज्या देवाने आपल्याला सर्व काही दिले त्याला देताना सढळ हस्तेच द्यावे असा त्यातील मतितार्थ आहे. श्रीस्वामी महाराजांच्या निर्वाणानंतर बाळप्पा महाराजांचा मुक्काम चोळाप्पाचे वंशज श्री रंगराव पुजारी यांचे घरी होता. महाराजांनी दिलेल्या पादुकांची पूजाअर्चा व श्रीमहाराजांचे सर्व उत्सव रंगरावांच्या घरीच साजरे होत असत. पुढे वाढत्या गर्दीमुळे ही जागा अपुरी पडू लागली त्यावेळी बाळप्पा महाराजांचे वास्तव्य याच ग्रामजोशींच्या वाड्यात अनेक महिने होते. गुरुमंदिराची विद्यमान वास्तु राजघराण्याकडून मिळेपर्यंत श्रीमहाराजांचे सर्व उत्सव बाळप्पा महाराज या ग्रामजोशी वाड्यातच साजरे करीत. १९२० साली बाळकृष्णबुवा ग्रामजोशींच्या नातवाने हा वाडा तडवळकर वकीलांना विकला. या ग्रामजोशींच्या वाड्याच्या मागच्या परसात एक प्राचीन औदुंबर वृक्ष आहे. मुंबईतील एका स्वामीभक्ताने इथे श्रीस्वामी महाराजांच्या पादुकांची स्थापना केली. कालांतराने या औदुंबरांभोवती कडुनिंब आणि पिंपळाची रोपटी उगवली. त्यामुळे आज या वृक्षत्रयीच्या छायेत श्रींच्या सुंदर पापाण पादुका विराजमान आहेत. या वाड्याच्या परसात एक छोटा आड होता. महाराज तिथे स्नानास येत असत. १९६२ साली श्रीस्वामी पादुका असलेला वाड्याचा भाग शरणप्पा सिध्दप्पा मेंथे यांनी तडवळकरांकडून खरेदी केला. शरणप्पांचे चिरंजीव डॉक्टर असून त्यांच्या दवाखान्याच्या मागेच हा वाडा आहे.