बगेहळ्ळीचे श्रींचे विश्रांती स्थान
अक्कलकोटपासून दोन किमीवर वगेहळ्ळी नावाचे एक खेडे असून या निसर्ग संपन्न गावी असलेल्या वटवृक्षासाठी श्री अनेकदा विश्रांतीसाठी जात असत. अक्कलकोटमधील कोलाहल, भक्तांची वर्दळ, सेवेकऱ्यांची मुजोरी अशाने त्रासलेले स्वामी महाराज या एकांत स्थळी येऊन बसत असत. बाबुराव निंबाळकरांची ही जहागिरी. दाजीबा भोसल्यांच्या अंदाधुंद कारकीर्दीत बापूसाहेब निंबाळकरांनी एका महाराला जोडा मारल्याबद्दल त्यांच्यावर फिर्याद झाली आणि या साध्या अपराधाबद्दल सदुसष्ट वर्षाच्या बापूसाहेबांना दाजिबा भोसलेंच्या शिफारशीमुळे एका वर्षांची सक्तमजुरी व एक हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. बापूसाहेबांनी श्रींच्या कृपेनेही शिक्षा भोगली.
बागेहळ्ळी गावाचा उल्लेख स्वामींच्या चरित्रात येतो. एके दिवशी स्वामी महाराज फिरत फिरत इथे आले. इथे मुजावर नावाच्या त्यांच्या यवन भक्ताचे घरी थांबले. पाचपन्नास भक्त सेवेकऱ्यांचा लवाजमा सोबत होताच. पहाण्यास गम्मत खाण्यास नामत चला असे म्हणत भर दुपारी रणरणत्या उन्हात इटगीच्या दिशेने चालू लागले. कोणाचेही भोजन झाले नव्हते. बाबासाहेब जाधवांसारखे निस्सीम भक्त सोजले तर बाकीचे सर्व भोजनभाऊ गळपाटले. दुपारी तीन वाजता श्री इटगीच्या मारुतीच्या मंदिरात पोहोचले. इथे सर्पदंश झालेल्या रावण्णांचे प्राण वाचवले.
हा बागेहळ्ळी गाव त्याकाळी मोठमोठ्या घनदाट वृक्षांनी वेढलेला होता. इथेच श्रींनी ससाण्याच्या तावडीतून एका चिमणीस वाचवले. वटवृक्ष देवस्थानाप्रमाणे येथेही एका वटवृक्षाखाली श्रीमहाराज बसत असत. ग्रामस्थांनी श्रीमहाराजांसाठी तिथे मोठा पार बांधला होता. या ठिकाणी महाराजांचे विश्रांतीधाम मंदिर उभारले गेले आहे. १९९८ साली श्रीमहाराजांचे शिवलिंग, तैलचित्र व मुखांवट्याची स्थापना झाली. फाल्गुन द्वादशीस उत्सव होतो. भीमशा बिराजदार हे इथे व्यवस्थापक व पुजारी आहेत. २३१४२५ हा त्यांचा दूरध्वनी आहे.