नृसिंहभान देवस्थान तथा समाधी मठ

आम्ही ब्रह्मानंद गुहेत आहोत… (सन १८७८ )

साधू-संत-सत्पुरुष महात्मे हे जगदोध्दारासाठी अवतरलेले, निर्गुण ब्रह्माचे सगुण अवतार असतात. अशा विभूती लोककल्याणार्थ आयुष्य वेचून आपले अवतारकार्य संपवितात. नश्वर देहाचा त्याग करतात. तिथे त्यांचे चिरंतन स्मारक म्हणून समाधी स्थान उभारले जाते आणि भविष्यात पुढील पिढीसाठी ते पुण्यक्षेत्र ठरते. प्रापंचिकांच्या दृष्टीने परमार्थ पथावर वाटचाल करताना ही समाधी स्थळे दीपस्तंभाप्रमाणे कार्य करतात. कारण त्या सत्पुरुषांचे चैतन्य तिथे निरंतर असते आणि ते मूकपणे भक्तिमार्गाच्या दिशेने भाविकाला कार्यान्वित करते. चैतन्यकृपेचा वरदहस्त प्राप्त करून घेण्याचे पुण्यक्षेत्र म्हणजे समाधीस्थळ होय. श्रीस्वामी समर्थ महाराजांनीही समाधी स्थानी चैतन्य रूपाने राहून दर्शन देऊ असे अभिवचन दिले होते. समाधीस्थानी त्या त्या साधू-संतांच्या जयंती-पुण्यतिथी साजऱ्या होत असतात. त्या उत्सवाच्या पोथी – प्रवचन किर्तन – पोथी निमित्ताने त्यांचे शिष्य, अनुयायी तेथे जमतात. भजन –पूजा – अभिषेक – पालखी प्रदक्षिणा भंडारा – नामसप्ताह अशा स्वरूपात तेथे उपासना होत असते. व्यक्तिगत नामसाधनेबरोबरच सामुहिक नामसाधनेमुळे वातावरण भारून जाते. भावजागृती होण्यास तसेच श्रद्धा दृढ होण्यास सामूहिक उपासना हितकारक ठरतात. सत्संग – नामसप्ताह – साधना शिविरे यांस उपस्थित असलेला भाविकांचा मेळा म्हणजेच माउलींना अभिप्रेत असलेली ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. संवाद सुखाच्या पर्वणीतून पारमार्थिक वाटचाल करणाऱ्या प्रापंचिकांचे प्रबोधन होते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची समाधी, गाणगापुरातील श्रीनृसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुका, शेगाव येथील श्रीगजानन महाराज समाधी मंदिर, सज्जनगडावरील समर्थ रामदासांची समाधी, आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी ही स्थाने साधकांना परमार्थ मार्ग प्रदीप आहेत. अवतार समाप्तीनंतर चैतन्यरूपाने वावरत असणारे हे परमात्मे शरणागताला, प्रार्थना करणाऱ्यांना आपल्या कृपाबळे मार्गदर्शन करतात. ईश्वर दर्शन घडवितात. ईश्वरप्राप्ती करून देतात.

श्रीस्वामी समर्थ महाराजांचे समाधीस्थान अक्कलकोटात बुधवार पेठेत असून त्यालाच ब्रह्मानंद गुहा असे म्हटले जाते. अवतार समाप्तीपूर्वीच चोळाप्पांच्या घराजवळ त्यांनीही ब्रह्मानंद गुहा तयार करवून घेतली होती. ‘ब्रह्मानंद गुहेत आम्ही आहोत, येथे वसूनच भक्तांना दर्शन देऊ, जे जैसे मज भजती परब्रह्मासी, त्यासी तैसे भजतो आम्ही’ असे स्वामींचे सांगणे आहे. त्यानुसार अधिकारपरत्वे ते भक्तांना दर्शन देतात. समाधीस्थान ही ब्रह्मानंद गुहा आहेच पण अंतःकरण ही देखील ब्रह्मानंद गुहा असून सद्गुरु, परमेश्वर यांचा तिथेच निवास असतो. आर्त होऊन शरणागत भावाने त्यांना प्रार्थना करताच, तुमच्या हाकेला ते कृपा स्वरूपात ‘ओ’ देतात. सहाय्यासाठी धावून येतात. संकट दूरित निवारण करून तुम्हास सुखरूप करतात.

काकडारती ते शेजारती अशी नित्य उपासना दत्तसंप्रदायाप्रमाणेच बहुतेक सर्व संप्रदायात आहे. इथेही ती चालते. वास्तविक जागृती आणि विश्रांती या अवस्था मानवी देहाला आहेत; देवाला नाहीत. तरीही भावनात्मक रीतीने आपण आपल्या गुरुरायांना म्हणजेच आत्मरूपाला जागवतो किंवा जोजवितो. शिवाय भक्त देवदर्शन घेऊन सुखावतो तेव्हा त्याचे मन विश्रांत होते.

 

आम्ही कर्दळीवनातून निघालो… (सन ११४९ ) 

कर्दळीवन म्हणजे ज्ञानगंज. तेथे अनादिकालापासून महासिध्दांचे वास्तव्य होते. त्यालाच सिध्दाश्रम म्हणतात. असाच एक सिध्दाश्रम हिमालयात नर-नारायण पर्वताचे पलीकडे आहे. गुरुचरित्रात श्रीपादश्रीवल्लभ सिध्दाश्रमात गेल्याचा जो उल्लेख आहे, तो हाच असावा. या सिध्दाश्रमात दोन हजारच्या आसपास आयुर्मान असणारे महाअवतार बाबाजी यांचे वास्तव्य आहे… शंकराचार्य, तुलसीदास, कबीर, लाहिरी महाशय, योगानंद, तेलंग स्वामी यांना त्यांचे दर्शन घडले होते. महाअवतार बाबाजी चिरायु आहेत. भाग्यवंतांना त्यांचे दर्शन वा मार्गदर्शन घडते. असाच एक ज्ञानगंज किंवा सिध्दाश्रम नैमिपारण्यात आहे. गोंदवलेकर महाराज नैमिषारण्यात गेले असता, एक महामानव त्यांचेकडे आला व कृष्णावतार झाला का? असे संस्कृतमधून विचारु लागला. त्यावर कृष्णावतार संपून कलीयुग सुरु झाले असे सांगताच, त्याने कानावर हात ठेवले व तो अदृष्य झाला. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात याची नोंद आहे. याचा अर्थ असा की, रामावतारापासून समाधी अवस्थेत असलेल्या त्या महामानवाची समाधी कृष्णावतार संपून कलीयुग सुरु. झाल्यावर भंगली. असे हजारो वर्षे समाधी व साधनेत असणारे योगी आजही हिमालयात सर्वत्र आहेत. महाराजांना अभिप्रेत असलेले कर्दळीवन हे यापैकी कोणते? ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वैद्य यांनी गुरुलीलामृत हा ग्रंथ श्रीस्वामी महाराज सदेह वावरत असताना लिहिला. काही गोष्टींचे स्पष्टीकरण त्यांनी स्वामींकडून घेतले. काही स्थानांवर स्वत: यात्रा करून आले आणि ग्रंथनिर्मिती केली. श्रीस्वामी समर्थ महाराज हे नृसिंहसरस्वती आहेत असा उल्लेख त्यांनी केलेला नाही. आता नृसिंहभानांचे चरित्र सांगतो… अशीच सुरुवात त्यांनी केलेली दिसते. अपवाद एकच. महाराजांच्या अवतार समाप्तीपूर्वी सहा महिने ब्रह्मानंद गुहेचे स्थापनेचे वेळी तेथे श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना झाली व त्याचे पौरोहित्य चिदंवरस्वामींचे ज्येष्ठ पुत्र दिवाकरशास्त्री दीक्षित यांनी केल्याचा व त्यावेळी साक्षात् श्रीस्वामी समर्थांनी वेदमंत्र म्हटल्याचा उल्लेख गुरुलीलामृत ग्रंथात आहे. असो.

 

नृसिंहभान देवस्थान अर्थात समाधी मठ 

३० एप्रिल १८७८ चैत्र शुध्द चतुर्दशी मंगळवार संध्याकाळी ४ वाजता श्रीस्वामी समर्थ महाराजांनी वटवृक्षाचे तळवटी आपले देह ठेवला. सातशे एकोणतीस वर्षे अहोरात्र जनकल्याणार्थ झिजून अखेरीस अक्कलकोट येथे अवतारकार्य संपविले. शेकडो लोक यावेळी उपस्थित होते. साया अक्कलकोटवर अवकळा पसरली. श्रीमहाराजांची समाधी कोठे करावी यावर वाद-विवाद चर्चा होऊन कारभारी नानासाहेब बर्वे यांच्या मध्यस्थीने श्रींची समाधी भक्त त्यानुसार सर्व चोळणा यांनी त्यांच्या घराजवळील, श्रींनी स्थापन केलेल्या नृसिंह भान देवस्थानच्या गर्भगृहात तयार केलेल्या ब्रह्मगुहेत करावी असे ठरले. तयारी होऊन, रामा सुतार यांनी तयार केलेल्या लाकडी विमानात श्रीमहाराजाचा देह ठेऊन, सनई चौघड्यांच्या निनादात, टाळमृदुंगाच्या जल्लोषात बुधवार पेठेतील चोळप्पांच्या घराजवळ वाजत गाजत आणला गेला. श्रींचे लाडके भक्त चोळप्पा हे सहा महिन्या अगोदर स्वामीचरणी लीन झाले होते. त्यामुळे चोळप्पांचे पुत्र व कुटुंबियांनी विविध तऱ्हेच्या फुलांनी सुसज्ज केलेल्या ब्रह्मगुहेत शास्त्रोक्त पध्दतीने वेदमंत्रांच्या गजरात श्रीमहाराजांचे पार्थिव ठेऊन समाधीची शिळा बंद करण्यात आली. त्यानंतर नृसिंहभान देवस्थान म्हणून प्रसिध्द असलेले हे स्थान, श्रीस्वामी समर्थ महाराजांचा समाधी मठ म्हणून ओळखले जाऊ लागले. या मठाच्या लगतच भक्तश्रेष्ठ चोळाप्पा नाईक यांचे व त्यांच्या वंशजांची घरे असून तेच या स्थानाची मनोभावे देखभाल करतात.