जयतीर्थ पुराणिकांचा वाडा

श्रीस्वामी समर्थ महाराज ज्या वास्तुमध्ये अनेकदा येऊन गेले आहेत अशा अक्कलकोट मधील पावन वास्तुंमधील महत्त्वाची वास्तु म्हणजे पुराणिकांचा वाडा, बेरड गल्लीत किंवा भारत तात्या सुभेदार यांच्या वाड्यासमोर हा वाडा असून, जयतीर्थ पुराणिकांचे पणतू बिंदुमाधव व अरुण हे सध्या तिथे वास्तव्यास आहेत. जेऊरच्या भक्तेश्वर देवस्थानचे वंशपरंपरा पुजारी असलेले हे घराणे ज्योतिषी म्हणून जोशी उपनामाचे पुढे पुराण सांगू लागले पुराणिक झाले. जेऊरचे भक्तेश्वर देवस्थान हे सातशे वर्षापूर्वीचे असून सन १८१६ पासून हे पुराणिक मौजे जेऊर येथील जमिनीचे हक्कदार आणि वहिवाटदार आहेत. महाराजांनी देह ठेवला त्यापूर्वी दोन-तीन वर्षे जो भयानक दुष्काळ पडला त्यावेळी श्रीस्वामी महाराजांनी इंद्रदेवतेला आवाहन करीत हरवरे भेकले ते याच जेऊर येथील भक्तेश्वर देवस्थानात श्रीमहाराज १८५६ साली प्रज्ञापुरीस आले त्याच दरम्यान, भोसले संस्थानिकांचे आश्रीत असलेले हे पुराणिक घराणे जेऊरहून प्रज्ञापुरीस आले आणि बेरड गल्लीत स्थिरावले. श्रीस्वामी समर्थ महाराज वटवृक्षाखाली निवास करू लागले. त्याठिकाणी ज्योतिबा पाडे यांनी छप्परवजा देवालय उभारून श्रींची सेवा सुरु केली. पोथी वाचन, कीर्तन, भजन पुराण सांगणे ह्या गोष्टीही वटवृक्षाखालील श्रींच्या देवालयात सुरु झाल्या. अक्कलकोटमध्ये जोशी पण करणारे जेऊरच्या भक्तेश्वराचे पुजारी जयतीर्थ तथा तात्या जोशी हे पुराण सांगू लागले आणि पुराणिकबुवा झाले. श्रीमहाराज अनेकदा हे पुराण श्रवण करीत. श्रीमहाराज त्यांना पंडत म्हणत तर त्यांच्या पत्नी हरणाबाई यांना माई म्हणून हाक मारीत.

वैष्णवांना शंख फार प्रिय. पण शंखपूजनाचा अधिकार स्त्रियांना नाही याचे माईंना वाईट वाटे. त्रिकालज्ञानी श्रींनी हे जाणले आणि आताची बेरड गल्ली पण पूर्वी तिथे बाभळीचे वन होते. त्या बाभूळ वन्मतील फरशीच्या वाड्यात पुराणिकांच्या घरी महाराज गेले अन् एक उजवा शंख. माईंना दिला. तीन वर्षांनी वद्य त्रयोदशीला या शंखाचे पूजन सुरु कर अशी आज्ञा दिली. दुर्मिळ असा तो उजवा शंख माईंनी जपून ठेवले. १८७८ सालची चैत्र वद्य त्रयोदशी आली. आता त्या शंखाचे पूजन करायचे म्हणून तयारी सुरु केली. एवढ्यात श्रीमहाराजांनी तो शंख घेऊन वडाखाली येण्याची आज्ञा केली. तात्या- माई उभयता उपस्थित झाले. श्रीमहाराजांनी देह ठेवण्यापूर्वी काही काळची ही गोष्ट. श्रींनी खूणेने माईंना जवळ बोलावले व तुझ्याकडील शंखाने माझ्या तोंडात झाली तीर्थ घाल अन् मग त्याची पूजा कर असे सांगितले. माईंनी निमूटपणे स्वामी आज्ञेचे पालन केले. दुपारी दोन वाजता त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरु आणि साडेचार वाजता महाराजांनी देह ठेवला. माई किती भाग्यवान! साक्षात् विष्णू अवतार श्रींनी स्वतःच दिलेल्या शंखातून माईच्या हस्ते तीर्थ प्राशन केले. तीर्थाने तीर्थांचा सन्मान केला. असे हे अक्कलकोटचे श्री कृपांकित पुराणिक घराणे. गुरुमंदिराजवळ भारत गल्लीत (पूर्वीची बेरड गल्ली) श्री. शिरीष सुभेदार रहातात. यांचा सुभेदार वाडा पुराणिक वाड्याच्या समोर असून शिरीष यांचे खापरपणजोबा तात्या सुभेदार यांचा उल्लेख चरित्रात येतो. देह विसर्जनाच्या पूर्वी महाराज यांचे वाड्यात आले होते. शिरींप शहाजी वाचनालयात सचीव आहेत. बिंदुमाधव पुराणिक यांचे वाड्यात बाबा महाराज आर्वीकरांची ये जा होती. बाबा महाराजांच्या चर्मपादुका त्यांचेकडे आहेत. यांचे आजोबा – पंढरीनाथ व आजी लक्ष्मीबाई, वडील यशवंतराव. तसेच काशीनाथ पंढरीनाथ ऊर्फ सोन्याबापू व त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचे फोटो उपलब्ध आहेत.