जंगमाचा मठ आणि जंगमाचा आड
अक्कलकोट एस.टी.स्टँडच्या बाहेर येताच टोलेजंग मल्लिकार्जुन मंदिर दिसते. तिथून पुढे समाधीमठ लागतो आणि समाधी मठाच्या डाव्या बाजूला प्रसिध्द पूर्वाभिमूख असा दगडी बांधणीचा हा जंगम मठ आहे. रुद्र स्वामी नावाच्या एका लिंगायत साधूची समाधी रुद्रस्वामी मठ किंवा जंगमाचा मठ म्हणून आहे. इथे रुद्रस्वामींचा पितळी मुखवटा अन्य काही देवता असून समाधी चौथऱ्याच्या मागच्या बाजूस खोबणीत एका दगडावर श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पादुका उमटल्या आहेत. त्या सहजासहजी दिसत नाहीत. विजेरीच्या प्रकाशात आत डोकावून पाहिले असता त्या दृष्टीस पडतात. शिवोपासक लिंगायत समाजाच्या धर्मगुरु किंवा पुरोहितास जंगम म्हणतात. कारण ते चल असतात. फिरस्ते असतात. जंगम रुद्रस्वामींच्या समाधीवरील शिवलिंगावर देह ठेवण्यापूर्वी काही दिवस स्वामी महाराजांनी होम केला होता व आपल्या देहनिर्वाणाचे सूतोवाच केले होते. ३० एप्रिल १८७८ रोजी श्रीमहाराजांनी अक्कलकोट येथे देह ठेवला. तत्पूर्वी काही दिवस श्रीमहाराजांची या मठात एक विचित्र लिला केली. रुद्रस्वामींच्या समाधीपुढे स्वामी महाराज एका पलंगावर पहुडले होते. समोर ठाकुरदास बुवांचे कीर्तन सुरु होते. अनेक श्रोते कीर्तनरंगात दंग होते. कीर्तन संपताच स्वामी महाराजांनी आपल्या जवळ बसलेल्या बावडेकर पुराणिकांस होम करायचा आहे असे सांगून गोवऱ्या मागवल्या आणि स्वहस्ते त्या रुद्रस्वामींच्या समाधीवरील शिवालिंगावर यज्ञवेदीप्रमाणे रचल्या. त्यावर खारका, नारळ, सुपाऱ्या, पेढे, बर्फी अशा सर्व जिनसा ठेवल्या. सेवेकऱ्यांमार्फत मणभर तूप मागवून ते त्यावर ओतण्यास सांगितले. त्यादिवशी महाराजांनी निर्जल उपोषण केले होते. सर्व रचनापूर्ण झाल्यावर आहुती देण्यात आली. अग्नि भडकला. हवीद्रव्याने पेट घेतला. महाराजांच्या पुढे बोलण्याची कुणाचीच प्रज्ञा नव्हती. अनिमिष नेत्रांनी उपस्थित मंडळी हे चमत्कारिक दृश्य पहात होती. लिंगायत समाजातील मंडळी जंगम मठाकडे धावली. आपल्या गुरुंची समाधी जळते आहे हे पाहून आकांत करू लागली. काही जण चवताळलेही पण स्वामीमहाराजांचे तेज:पुंज रूप आणि त्यांची तीक्ष्ण भेदक नजर पाहून ते हबकले आणि आल्या पावली निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत पिंडी जळत होती. महाराज रात्रभर तिथेच होते. दाह शमल्यावर श्रीमहाराजांनी रक्षा बाजूला करून भुजंगा भालके सेवकास शिवपिंडी धुण्यास सांगितले. आडाच्या निर्मल जलाने पिंडी धुवून साफसुफ करून श्रीमहाराजांनी त्यावर स्वहस्ते दूध व दह्याने अभिषेक केला. शेकडो गोवऱ्या मणभर तूप आणि नारळ सुपाऱ्यादि असंख्य वस्तू ठेवून हे शिवलिंग पेटवून दिले होते. परंतु त्यास काहीही इजा झाली नाही. उलट पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागले. त्यामुळे उपस्थित लिंगायत लोकांचा जीव यामुळे भांड्यात पडला.
महाराजांनी होम केलेले हे शिवलिंग लिंगायत लोकांनी पुढे बाजूला काढून ठेवले होते. त्यानंतर ते मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात एका बाजूस गेले. ज्या शिवलिंगावर होम केला ते शिवलिंग मल्लिकार्जुन मंदिर परिसरात असल्यामुळे अनेक भाविकांना हा प्रसंग मल्लिकार्जुन मंदिरात घडला असे वाटते. हे शिवलिंग पुढे अक्कलकोट हन्नुर रोड वरील चांदोड्याच्या शेतात पहायला मिळते. ३१ डिसेंबर १९६० रोजी श्री. चांदोडे यांनी आपल्या शेतातील एका मोठ्या विहिरीवर बांधलेल्या दगडी मोटेवर त्याची विधीवत स्थापना केली. हे स्थान अक्कलकोटपासून केवळ चार किमीवर हन्नुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे.
पूर्वापार तीन कमान आणि गर्भगृह असलेल्या ह्या जंगम मठाची वास्तू भक्कम आहे. १८७६ च्या दुष्काळाचे वेळी अक्कलकोट मधील जनता पाण्यासाठी त्रस्त झाली होती. पिण्यासाठी पाण्याचा थेंबही नाही अशी परिस्थिती उत्पन्न झाली. गुरुप्रतिपदेच्या उत्सवासाठी गावोगावचे भाविक जमा झाले. प्रतिवर्षीप्रमाणे हजार दोन हजार स्त्रीपुरुष अक्कलकोटास दाखल झाले. समाराधनेची तयारी सुरु झाली. सर्व जिन्नस भांडीकुंडी यांचा सरंजाम सिध्द झाला. पण सर्व विहीरी कोरड्या पडलेल्या. लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. उत्सव कार्यात मोठे विघ्न निर्माण झाले. याचे निवारण केवळ श्रींच करू शकतात. त्यामुळे सारेजण स्वामींना शोधत शोधत या जंमगाच्या आडाकडे आले. श्रींची स्वारी मुलांबरोबर विटीदांडू खेळण्यात मग्न होती. पाण्यासंबंधी सर्व स्त्रीपुरुष गुरुरायांची आळवणी करत होते. खेळाचा बहाणा करून दयाळ स्वामी महाराजांनी आडाच्या शेजारी एक खड्डा खणला. त्या लघुशंका केली आणि पाण्यासाठी विव्हल झालेल्या लोकांकडे हसत हसत एक नेत्रकटाक्ष टाकत म्हणाले, ‘अरे, उठा त्वरा करा… वदता का अमृतगिरा.. कुपें जले भरला… कूपे जले भरला… श्रींच्या उद्गारांसरशी साऱ्यांनी आडात डोकावून पाहिले आणि साऱ्यांचे नेत्र आश्चर्याने विस्फारले. जंगमाची ती कोरडी पडलेली खोल विहीर पाण्याने अर्धीअधिक भरली होती. त्या दिव्य जलौघाने माघ वद्य प्रतिपदेचा उत्सव मोठ्या आनंदात यथासांग पार पडला. हा प्रसंग १८७६ च्या गुरुप्रतिपदा उत्सवाचे वेळी घडलेला आहे.
मल्लिकार्जुन मंदिर – पुण्याच्या नंदरामजींवर कृपा
अक्कलकोट एस.टी.स्टँडच्या बाहेर काही अंतरावर एक दाक्षिणात्य पध्दतीने बांधकाम केलेले एक टोलेजंग मंदिर दिसते. हे मल्लिकार्जुन मंदिर होय. त्याचा काही वर्षांपूर्वी जीर्णोध्दार झाला असला तरी मंदिर प्राचीन आहे. ही लिंगायत साधूची समाधी असून श्रींनी होम केला तो इथेच असा अनेकांचा समज असून तो चुकीचा आहे. कारण अभ्यासाअंती मल्लिकार्जुन मंदिर हे प्राचीन शिवमंदिर असून ती लिंगायत साधूची समाधी नाही. या मंदिरापासून एका मिनिटाच्या अंतरावर समाधीमठ असून त्याच्या डाव्या बाजूस जंगम मठ आहे. पूर्वाभिमुख असलेला दगडी बांधणीचा हा रुद्र स्वामींचा मठ. एस. टी. स्टँडसमोरील मल्लिकार्जुनाचे आलिशान शिवमंदिराचा उल्लेख श्रींचे चरित्रात येतो तो पुण्याचे स्वामीभक्त नंदराम गवंडी यांचे संदर्भात शिवभक्त नंदरामजींवर याच शिवालयात श्रींची कृपा होऊन त्यांचे द्वैत फिटले. नंदराम सुंदराम गवंडी तथा नंदरामजी नाईक यांचे नाव पुण्य नगरीत मोठ्या आदराने घेतले जाते ते त्यांनी केलेल्या विराट बांधकामांमुळे बेसुमार दानधर्मामुळे आणि शुक्रवार पेठेतील त्यांच्या वैभव संपन्न हवेलीमुळे.
मूत्रव्याधीने त्रस्त झालेले नंदरामजी अक्कलकोटला आले ते बाळकृष्णबुवा ग्रामजोशींच्या सांगण्यावरून. बाळकृष्णबुवांनी नंदरामजींची कुंडली मांडली आणि खडतर योगातून सुटका व्हावी असे वाटत असल्यास श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या सारख्या अवतारी सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे असा सल्ला दिला. श्रींची विभूती त्यांचे कपाळास लावली. प्रकृतीला आराम पडला. स्वामींच्या विभूतीने चमत्कार घडवला कारण अनेक वर्षांची नंदरामजींची व्याधी चिमूटभर विभूतीने क्षणात घालवली. त्यानंतर काही काळातच कृष्णनाथ बुवा ठाकूरदासांबरोबर नंदरामजी अक्कलकोटास आले. बाळकृष्णबुवा ग्रामजोशींच्या घरी स्नान करून लागलीच श्रींचे दर्शनास गेले. नंदराम जी हे शिवभक्त. त्यादिवशीही सोमवारच होता आणि श्रीची स्वारी त्यावेळी मल्लिकार्जुन मंदिराच्या ओट्यावर विराजमान आहे असे कळले हा दुग्धशर्करा योगच समजून ते तिथे दर्शनास गेले. मल्लिकार्जुनाचे दर्शन त्यांनी महाद्वारातूनच घेतले अन् द्वारालगतच्या ओट्यावर वसलेल्या स्वामीशिवाचे चरणी साष्टांग दंडवत घातले. श्रींनी आम्ही शंकर नाही. त्या दगडाच्या देवाकडे जा अशी आज्ञा केली. तेव्हा ते उठून गर्भगृहात गेले तर तिथेही त्यांना शिवलिंगाचे ठाई श्रींचे मुखकमल दिसले. नंदरामजींनी बाहेर येऊन श्रींचे चरणकमल धरले अन् आपणच सर्वेश्वर आहात असे म्हणून त्यांची पाद्यपूजा केली. महाराजांचे नैवेद्याकरता दर महा दहा रुपयांची नेमणूक केली, मोठा दानधर्म केला. समाराधना केली आणि पूर्ण कृपांकित होऊन पुण्यनगरीस परत आले. जुन्या गाडीखान्याच्या मागच्या बाजूला पंचमुखी मारुतीजवळ नंदरामजींची तीन मजली सात चौकी हवेली आणि श्रींच्या पादुका स्थान आहे.