१८५७ च्या बंडाची भविष्यवार्ता – लक्ष्मी तोफ
अक्कलकोटच्या जुन्या राजवाड्याच्या बुरुजावर त्याकाळी लक्ष्मी नावाची एक प्रचंड तोफ होती. राजवाड्यात असताना सुरुवातीच्या काळात रोज सकाळी श्रीस्वामी महाराज या तोफेच्या तोंडात आपले मस्तक घालून बसत. या कृतीचे साऱ्यांना भय वाटे. महाराज या कृतीतून नेमके काय सुचवित आहेत हे न कळल्यामुळे, भीतीपोटी एकच खळबळ उडाली होती. कारण स्वामी महाराज अक्कलकोटात नुकतेच अवतीर्ण झाले होते. त्यामुळे ठराविक भक्तांखेरीज त्यांचे खरे स्वरूप कोणालाच कळलेले नव्हते. त्यानंतर लगेचच मंगल पांडेनी स्वातंत्र्ययुध्दाची नांदी केली आणि संपूर्ण हिंदुस्थानभर क्रांतिकारकांच्या हालचाली जोमाने सुरु झाल्या. सारा देश या उठावामुळे हादरून गेला आणि इंग्रजांना आपण नामशेष होणार याची खात्री पटू लागली.
स्वातंत्र्य समराला सुरुवात होण्याआधी श्रीमहाराजांचा मुक्काम चिंतोपंत टोळ यांचे घरी होता. त्या दिवसात, श्रीमहाराज रानात जाऊन एरंडाची लाकडे आणीत आणि सैन्यातील शिपाई ज्या पद्धतीने बंदुका लावून ठेवतात त्याप्रमाणे ते एरंडाचे फोक हारीने मांडून ठेवत. अंतर्साक्षी श्रींना सारेच ज्ञात होते आणि त्यामुळेच ते अंतर्यामी व्यथित होते. त्यांच्या या विचित्र कृतीचा कुणाला उलगडा होईना. महाराज आपण हे काय करता? असे विचारल्यास, पलटणी तयार करतो असे उत्तर मिळे. घोंगडीच्या किंवा तरटांच्या दशा काढून त्याही रांगेत मांडून, मस्तकाला हात लावून विचारात गढलेले असत. ही लीला म्हणजे १८५७ च्या स्वातंत्र्य समराची भविष्यवार्ता होती हे पुढे सर्वांच्या लक्षात आले.
१८५७ साली उत्तर भारतातील पलटणी इंग्रज सरकारवर उलटल्या व नानासाहेब पेशव्यांना मिळाल्या. संग्रामाचे स्वरूप आशादायक होते. परंतु दुर्दैवाने फासे उलटे पडले आणि पराभव पत्करावा लागला. त्यावेळी स्वामीरायांचा मुक्काम अक्कलकोटच्या राजवाड्यावर होता. तेथील बुरुजावरील लक्ष्मी तोफेकडे ते एकटक पहात आणि तासन् तास तिच्या तोंडात आपले मस्तक घुसवून बसत. महाराजांची प्रत्येक कृती सूचक असायची. त्यामागे काहीतरी भाष्य किंवा संकेत असायचा. त्यांच्या सहवासातील सेवेकऱ्यांना सरावाने काही कृतींचा अर्थ कळायचा. पण अनेकदा तेही बुचकळ्यात पडायचे. या संकेताचा अर्थ कालांतराने अक्कलकोट संस्थानात आलेल्या वर्दीवरून ध्वनित झाला. स्वातंत्र्य समरात सामील असलेल्या शेकडो बंडखोरांना पकडून तोफेच्या तोंडी देण्यात आले… ही वार्ता कानावर येताच सारे दिङ्मूढ झाले. कालांतराने ही तोफ राजवाड्यातून हलविण्यात आली. सध्या ती जुन्या राजवाड्याच्या डाव्या बाजूस असलेल्या शाळेच्या उघड्या पटांगणात ठेवलेली आहे. दहा इंचाचे भव्य मुख असलेली, श्रींच्या स्पर्शाने पावन झालेली भाग्यवान लक्ष्मी तोफ होय. १८५७ च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास आपणास नव्याने सांगण्याची गरज नाही. तो भारतीयांच्या हाडीमाशी खिळला आहे. टोपीकर इंग्रजींनी हे स्वातंत्र्य युध्द मोडून काढले आणि वाटेल त्या शिक्षा फर्मावल्या. बंडातील जे क्रांतीकारक पकडले गेले त्यापैकी काहींना फाशी दिले तर काहींना तोफेच्या तोंडी दिले. परंतु काही जण परमेश्वराच्या कृपेने यातून बचावले. अक्कलकोट येथील पांडुरंग पुराणिकांचे घराणे हे क्रांतीयुध्दाशी संबंधीत होते. १८५७च्या समरात सक्रीय असलेले हे कुटुंब केवळ श्रीस्वामींच्या कृपेनेच वाचले आणि पुढे अक्कलकोट येथून निरवानिरव करून चिदानंद नाम धारण करून गाणगापूर येथे स्थलांतरीत झाले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या घराण्याच्या तीनचार पिढ्या, क्रांतीकाऱ्यांना सहकार्य करीत, भूमीगतांना आश्रय देत आणि गाणगापूर येथे येणाऱ्या भाविकांना छत्रछाया देत राहिले. आजही गाणगापूरमध्ये चिदानंद नामक एक जुनी धर्मशाळा यात्रेकरूंच्या सेवेत तत्पर आहे.