स्वामीभक्त गणपतराव सूर्यवंशी – सूर्यवंशीवाडा मुजावर गल्ली
अक्कलकोटच्या मुजावर गल्लीत ख्वाजापीर दर्गा प्रसिध्द आहे. अवकलकोटमध्ये यवन वस्ती मोठ्या प्रमाणावर असून हिंदू मंदिरांबरोबर यवनांचे दर्गे-पीर-मशिदीही आहेत.
मुबलक म्हणून पांढरीचा गाव म्हणूनही पूर्वीच्या ग्रंथातून अवकलकोटचा उल्लेख येतो. शेखनुरुद्दिन दर्ग्याची माहिती आपण घेतलीच आहे. मुजावर गल्लीतील ख्वाजापीर दर्गाही जुना असून यवनांचे ते मोठे श्रध्दा स्थान आहे. एकदा श्रीमहाराज या दर्ग्याच्या पायरीवर बसले असता एक सात-आठ वर्षाचा मुलगा श्रींचे जवळ आला. महाराजांनी त्याला जवळ घेतले आणि काय हवे विचारताच, मला भूक लागली आहे पेढे हवेत असे म्हणाला. श्रीमहाराजांपुढे पेढे मिठाई फळफळावळ यांचा ढीग लागलेला असे. मुलाने पेढा मागताच श्रींनी मूठभर पेढे उचलून त्यास दिले आणि मोठा झालास की याचाच उदीम कर असे सांगितले. भुकेलेला मुलगा पेढे खाऊन तृप्त झाला. भविष्यात त्याने पेढ्यांचेच दुकान काढले. ते त्यांच्या मुला-नातवंडांनी वाढवले. अक्कलकोटात शीतल नामक मेवामिठाईची पाच दुकाने आज श्रीकृपेने उत्तम चालत आहेत. ह्या मुलाचे नाव होते गणपत सुरवसे अर्थात सूर्यवंशी, बालपणी पितृछत्र हरपले. आईने चार घरची धुणी-भांडी करून गणपतला वाढवले. श्रींच्या आज्ञेनुसार मोठा झाल्यावर त्याने मिठाईचा व्यापर सुरु केला. राजघराण्याची त्यांचेवर मेहेरनजर होती. राजवाड्यातील कोणत्याही सणासुदीला किंवा मंगल कार्याला गणपतरावांच्या दुकानातील पेढे किंवा मेवामिठाईच जायची. श्रीमंत जयसिंह राजे प्रति गुरुवारी अर्धा शेर पेढे श्रीमहाराजांना अर्पण करीत. गणपतरावांना अनंत, पंढरीनाथ व श्रीपत गुरुनाथ असे चार मुलगे होते. या चौघांनीही पित्याच्या व्यवसायास हातभार लावला आणि गणपतराव सूर्यवंशींचा मिठाईचा व्यवसाय नावारूपास आला. पेढेवाले सूर्यवंशी अक्कलकोटात मशहूर झाले. अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी राजवाड्यातच मिठाईचा कारखाना सुरु करावा असे सांगितले. परंतु गणपतरावांनी मुजावर गल्लीजवळ जिथे श्रीकृपा झाली तो आपला वाडा अखेरपर्यंत सोडला नाही. गणपतरावांचा जन्म १८४८ सालचा. ते शतायुषी होते. १९४८ साली त्यांनी वयाची शंभरी गाठून स्वामी चरणी देह ठेवला. पेढे बनवण्यास ज्या ठिकाणी चूल मांडली तिथे आज गॅसच्या शेगड्या आल्या पण गेली दिडशेहून अधिक वर्षे त्याच जागेत हे गोड कार्य अव्याहतपणे सुरु आहे. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानमध्ये मुख्य गर्भगृहाच्या डाव्या बाजुला असलेल्या शेजघराचे बांधकाम गणपतरावांच्या पुत्रांनी आपल्या मातापित्याच्या स्मरणार्थ करून दिले. शेजघरात असलेला श्रीमहाराजांचा पलंगही त्यांनीच घडवून दिला.