साखर बावडी

मुरलीधर मंदिराच्या जवळील वडार गल्लीतून पुढे गेल्यास उजव्या हातास जी प्रशस्त पायऱ्यांची विहीर दिसते तीच साखर बावडी होय. या साखर विहीरीवरच्या कठड्यावर महाराज बसत असत. या विहीरीच्या जवळ श्रीमहाराजांनी अनेक लीला केल्या. या विहीरीलगत एक कबर असून तिथे एक मोठा निंबवृक्ष होता. एकदा या निंबाच्या ओट्यावर महाराज सेवेकऱ्यांसह बसले होते. १८६४ सालचा हा प्रसंग. महारोगाने पछाडलेला एक उंचापुरा पंजाबी गृहस्थ महाराजांची कीर्ति ऐकून त्यांचे दर्शनार्थ अक्कलकोटी आला. त्यावेळी याच पोटशूळाच्या व्याधीने त्रस्त झालेला एक वैष्णव आपली कैफियत सांगून महाराजांची करुणा भाकत होता. एवढ्यात तो पंजाबी गृहस्थ महाराजांचा शोध घेत तिथे आला. श्रीमहाराजांच्या सर्वसाक्षित्वाची त्यास कल्पना नव्हती आणि साधुसंतांशी लीन होऊन बोलावे याची समजही त्यास नव्हती त्यामुळे मान वर करून तो श्रीमहाराजांशी थेट बोलू लागला. ‘आप बहुत चमत्कार करते हो, यह सुनकर मैं आया हूँ ।’ त्याचे हे वाक्य पूर्ण होते न होते तोच, आपली नेसती लंगोटी फेकून त्यास दाखवत म्हणाले, ‘चमत्कार बैठे लंड पर… चमत्कार गारुडी के खेल में देखो… दही वर्फी खाके मगर मस्ती करता है । तेरे कू और क्या चमत्कार चाहिए? ‘ श्रींच्या मुखातून आपल्या गैरवर्तनाचा पाढा ऐकून तो पंजाबी गृहस्थ लटपटला. आपल्या कुकर्माचा पश्चात्ताप होऊन तो श्री चरणी लीन झाला. दोन महिने अक्कलकोट येथे सेवेत राहून रोगमुक्त होऊन श्रींचा निरोप घेऊन स्वगृही परत गेला.

पोटशूळाने कण्हत असलेला ब्राह्मण अनेक दिवस जशी जमेल तशी सेवा करत राहिला. एके दिवशी दयाघन स्वामीराय त्याच्यावर प्रसन्न झाले आणि कृतकोपाने म्हणाले, ‘काय रे आम्ही तुझ्या बापाचे काय देणे लागतो? आम्हा संन्याशाजवळ येऊन तू का मरतोस?’ हे ऐकून तो ब्राह्मण रडू लागला. मायबापा तुमच्याशिवाय आम्हाला कोण त्राता? तेव्हा मज पामरावर दया करावी, अशी आर्जव करू लागला. यावर प्रसन्न होऊन श्रीमहाराजांनी त्यास उपाय दिला. अरे, हत्तीच्या लेंड्या आणि तुझ्या डोक्यावर असलेल्या कडूलिंबाचा पाला एकत्र करून खा, म्हणजे तुझा पोटशूळ शांत होईल. अक्कलकोट संस्थानात त्यावेळी हत्तींना तोटा नव्हता. हत्तीच्या लेंड्यांबरोबर निंबाचा पाला एकत्र करून खाणे त्यास जमेना. दुसऱ्या दिवशी त्याने श्रीमहाराजांची भेट घेऊन महाराज, लिंबाचा पाला फार कडू लागतो माझ्या गळी उतरत नाही अशी कळवळून तक्रार केली. हे ऐकताच स्वामी महाराज त्या लिंबाच्या झाडाच्या एका भल्या थोरल्या फांदीला हस्तस्पर्श करून त्या ब्राह्मणास म्हणाले, ‘या फांदीचा पाला खा, म्हणजे गोड लागेल.’ खरोखरच त्या फांदीचा पाला गोड झाला. ब्राह्मणाने औषधोपचार सुरु केला आणि तो बरा झाला. निंबाच्या झाडाच्या त्या फांदीचा पाला पुढे अनेक वर्षे गोड लागत असे. अक्कलकोटास आलेले असंख्य भक्त त्या फांदीचा पाला प्रसाद म्हणून ओरबाडून नेत. त्यातच ते झाड संपून गेले. ब्राह्मणाचा पोटशूळ घालवला, पंजाबी गृहस्थावर कृपा केली ती या साखर बावडी जवळच. या साखर विहीरीच्या जवळ एक प्राचीन आम्रवृक्ष होता. या आम्रवृक्षाखाली विटेवर महाराजांची वामकुक्षी चाले. सेवेकरीही आसपास असत. एकदा दर्शनार्थीची अशीच भली गर्दी इथे जमली. हैदराबादचा एक मुसलमान शिपाई महाराजांची परीक्षा पहाण्याच्या लबाड बुध्दीने तिथे उपस्थित होता. दर्शनाची वेळ येताच महाराजांना कुर्निसात करून तो महाराजांकडे धनयाचना करू लागला. महत्त्वाच्या कामासाठी मला मुंबईला जायचे आहे पण माझ्यापाशी एकही पैसा नाही. आपली ख्याती ऐकून मी इथे आले. मला खर्चासाठी आपण पैसे द्यावे. त्या कपटी यवनाकडे एक जळजळीत नेत्र कटाक्ष टाकत महाराज कडाडले. ‘अरे कमरेस पंधरा रुपये खोचून आला आहेस. एवढेच काय तुझ्याकडील गाडग्यात मौल्यवान अलंकार आहेत. इतके असूनही खोटे का बोलतोस? ‘ हे ऐकताच मुसलमान शिपाई गोरामोरा झाला. आपले कपट महाराजांनी अचूक जाणले हे समजून तो खजिल झाला. पोतडीत असलेले सोन्याचे दागिने आणि रुपये काढून त्याने महाराजांसमोर ठेवले आणि स्वामीरायांसमोर लोटांगण घातले. श्रीस्वामीराज नृसिंहभान आपण प्रत्यक्ष खुदा- अल्ला-इलाही रहिमान आहात, मी स्वार्थी आहे. मला क्षमा करा असे म्हणत त्याने श्रीचरणांवर मस्तक ठेवले दीनदयाळ श्री विरघळले. ‘मुंबापुरीस जा… तुझे कार्य होईल.

तुझे कार्य होईल…’ असा आशीर्वाद देऊन त्यास मार्गस्थ केले.