सरदेशमुखांचा वाडा आणि श्रीसंस्थापित मारुती
वटवृक्ष देवस्थानच्या दक्षिण द्वारापाशी जुन्या अन्नछत्राचा भाग येतो. तो सर्व परिसर सरदेशमुखांच्या मालकीचा आहे. मूळचे सातारा जिल्ह्यातील वाईचे हे सरदेशमुख घराणे. अफजलखानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांचे हे वंशज. मूळ पुरुष नरसिंह त्रिंबक सरदेशमुख यांना उत्तर सोलापूरातील मार्डी येथील गडीवर देशमुख म्हणून नेमले. आजही मार्डी येथील देशमुखांची गढी व त्यांचे वंशज तिथे वास्तव्यास आहेत. पुढे खंडेराव त्रिंबकराव यांस बोरगावची जहागिरी मिळाली. तिथली काझीची मुजावरीची सनद मिळाली. बोरगावची ऐंशी टक्के जनता मुस्लीम आहे. बोरगाव येथील राजे बक्सर सूफी साधूच्या दर्ग्याचे सन ७९८ पासून बोरगावचे जहागिरदार हे काझी किंवा मुजावर आहेत. वंशपरंपरेने आजही तो मान अक्कलकोटच्या सरदेशमुखांकडे असून ह्यांच्या सही शिक्क्याशिवाय गावात झालेला निकाह ग्राह्य धरला जात नाही असे सरदेशमुखांचे विद्यमान वंशज विजयकुमार उर्फ राजाभाऊ सांगतात. त्या संदर्भातले जुने कागदपत्र त्यांचे संग्रही आहेत. त्यानंतर अदिलशहाकडून, अखत्यारीतील प्रांताचा चौथ वसूल करण्याची सनद मिळाली. संस्थानवर लक्ष ठेवणे आणि प्रांतोप्रांतीचा सारा वसूल करून रुपयातील चार आणे स्वत:कडे ठेऊन, उर्वरीत रक्कम दर महिन्याच्या चौथ्या जुम्म्याचा दिवशी विजापूर दप्तरी जमा करणे असे हे चौथ वसूलीचे काम मिळाले.
हे सर्व काम करता करता घराण्याची प्रचंड भरभराट झाली. सरदेशमुखांनी कोर्टकचेरीच्या कामाप्रित्यर्थ सोईस्कर म्हणून अक्कलकोटमध्ये, वटवृक्ष देवस्थानच्या दक्षिणद्वारापाशी पेशवे पध्दतीचा भव्य वाडा बांधला. जो गेली पावणे दोनशे वर्षे उत्तम स्थितीत आहे. या सरदेशमुखांचे कुलदैवत पालीचा खंडोबा. वाड्यात मोठे देवघर उभारून देवांची पूजा करण्यास ब्राह्मण नेमला. श्रींच्या काळात या सरदेशमुखांच्या देवाची पूजा दत्तंभटजी करीत असत. आयुर्वेदाचे जाणकार असलेले दत्तंभटजी जिव्हा दोषामुळे थोडे बोबडे बोलत. वटवृक्ष देवस्थानला लागून असलेल्या या वाड्यात श्रींची वामकुक्षी ठरलेली असायची. दुपारी दीड ते सायंकाळी चार पर्यंत महाराज सरदेशमुखांच्या वाड्यात असत. श्रीमहाराजांनी वाड्यात पाऊल टाकले की दत्तंभटजी दीड वाजले असे घड्याळाकडे न पहाता म्हणत आणि ती वेळ अचूक असे. जुन्या चरित्रात शिऊबाई असा उल्लेख येतो तो श्रींच्या निष्ठावंत सेविका कमळाबाई सरदेशमुख यांचा. शिऊबाई हे तिचे पूर्वाश्रमीचे नाव होते. १८७४ भाद्रपद वद्य षष्टी गुरुवार यादिवशी श्रीमहाराज देशमुखांच्या वाड्यात बसले असता, मोगलाईतील सय्यद नावाचा मुसलमान अधिकारी श्रींच्या दर्शनार्थ तिथे आला. ‘क्यों जी, अक्कलकोट के स्वामी कहाँ है? उधर क्या देखता है’ असे म्हणताच त्यास श्रींनी परवरदिगार गरीब नवाझ साहेबांचे दर्शन घडवले. बुध्दीने डोळसपणे परमेश्वर ओळखावा. अंधश्रध्देला बळी पडू नये हा कानमंत्र दिला.
रंगराव सरदेशमुख यांना मल्हारराव, यादवराव, आनंदराव व व्यंकटराव असे चार मुलगे होते. ही मार्डीची परंपरा. अक्कलकोटच्या त्र्यंबक शंकर सरदेशमुखांना वारस नव्हता म्हणून कमळाबाई व त्र्यंबक दांपत्याने एक पुत्र दत्तक घेतला. परंतु महाराजांच्या वचनानुसार तो जास्त काळ जगला नाही. त्यानंतर यमाईदेवी मार्डी येथील आनंदराव रंगराव यास दत्तक घेतले. त्याचे नाव खंडेराव ठेवले. त्याचा वंश सध्या चालू आहे. बोरगावला पन्नास एकर तर अक्कलकोटला पंधरा एकर जमीन शेती वाडी यांचे मालक असलेले अक्कलकोटमधील सरदेशमुख हे एक सधन संपन्न घराणे आहे. १९८६ साली चार मुलींच्या पाठीवर विजयरावांना मुलगा झाला. त्याचे नाव अक्षय (खंडेराव) असे ठेवले. त्यावेळी ‘अंबे मैं आ रहाँ हूँ’ असा दृष्टांत स्वामी महाराजांनी दिला होता. ह्यांच्या देवघरात श्रीमहाराज बसत असत. ते देवघर आपणास पहाता येते.
विजयकुमार तथा राजाभाऊंची आजी कमळाबाई त्र्यंबक ह्या श्रींची सेवा मनोभावे करीत. वयाच्या १९व्या वर्षी लग्न होऊन या घरात आल्या आणि अवघ्या तीन वर्षात वैधव्य आले. श्रीमहाराज त्यांच्यावर शिव्यांचा भडिमार करीत. कमळाबाई त्याकडे लक्ष देत नसत. तिची कर्मभोगातून मुक्तता करून, श्रींनी तिचे देहप्रारब्ध चुकवले. खूप परीक्षा घेतल्या आणि त्यात तावून सुलाखून घेतले आणि पूर्ण कृपा केली. एकदा असेच महाराज आले अन् म्हणाले, ‘कमळे मेरे कु घी होना…’ कमळाबाई हो म्हणाल्या. लोणी कढवून तूप करून श्रीमहाराजांना द्यायचे असे त्यांनी ठरवले पण कामाच्या रामरगाड्यात त्या साफ विसरून गेल्या. दोन दिवसांनी श्रीमहाराज सरदेशमुखांच्या वाड्यात दत्त म्हणून हजर झाले अन् कमळाबाईंकडे तूप मागू लागले. घरात तूपाचा थेंबही नव्हता. कमळाबाई ओशाळल्या. खिन्न झाल्या स्वत:च्या स्मरणशक्तीला दोष देऊ लागल्या. एवढ्यात श्रीमहाराज देवघरात गेले आणि देवपूजेसाठी घासून पुसून भरलेल्या पाण्याच्या तांब्याकडे बोट दाखवत म्हणाले, ‘देख… यह क्या है ।’ वरचे भांडे बाजूला करून पहाताच पूर्ण तांब्या तुपाने भरलेला आढळला. कमळाबाई धन्य झाल्या.
एकदा कमळाबाईंना त्यांच्या परसातून एक मारुतीची मूर्ती काढून दिली आणि त्याची स्थापना करण्यास सांगितले. कमळाबाईंनी उपाध्ये दत्तंभटजी यांच्या करवी आज जे जुने अन्नछत्र आहे ती संपूर्ण जागा सरदेशमुखांची असून त्या जागी मारुतीचे मंदिर उभारले. हा सरदेशमुखांचा मारुती श्रींच्या उपस्थितीत स्थापन झालेला आहे. कमळाबाईंचे सासरे शंकर नाना सरदेशमुख यांनी श्रीमंत मालोजी राजेंचे कारभारी दाजीबा भोसले यांच्या अंधाधुंद कारभाराचे काळात प्रजेच्या होणाऱ्या हालाच्या विरोधात आवाज उठवला होता. असे हे अक्कलकोटचे स्वामी कृपांकित सरदेशमुख घराणे. हे खंडोबाचे नि:स्सीम भक्त. १९८६ साली यांचे घरात असलेली खंडोबाची घाटी चोरीस गेली. त्रिंबकराव सरदेशमुख १९२२ अक्कलकोट अशी नाममुद्रा असलेली ही घाटी, चार दिवसांनी मुंबई सांताक्रूझ एअर पोर्ट जवळील झोपडपट्टी परिसरात पोलिसांना चोरीच्या लुटीच्या मालात सापडली आणि त्यावरील नावावरून ती यथावकाश अक्कलकोट येथे सुखरूप परत आली. श्रींच्या काळातील भांडीकुंडी, पाट- देवघर पहाण्यासाठी आपण या वाड्याला अवश्य भेट द्यावी.
श्रीस्वामी समर्थ महाराजांना देहत्याग करून आज १३३ वर्षे उलटली. परंतु जो स्वामी भक्त किंवा भाविक श्रध्देने अक्कलकोटास येतो त्याला स्वामी महाराजांच्या चिरंतन अस्तित्वाची साक्ष पटल्याशिवाय रहात नाही. महाराज सदेह असताना किती सामर्थ्यशाली होते, याची कल्पना चरित्र वाचताना येते पण आजही ते आहेत आणि अनंतकाळ रहाणार आहेत याचा प्रत्यय करोडो लोक घेत आहेत. हजारो मैलांवर असलेल्या भक्तांचे रक्षण हाकेसरशी ते करीत होते आजही करीत आहेत. अशा या सर्वसाक्षी सर्वव्यापी सर्वांतर्यामी पूर्ण ब्रह्माचे केवळ स्मरण करीत जावे आणि कृपा प्रसाद प्राप्त करावा. त्यांच्या चरित्रांमधील कथा – घटना-प्रसंग लीला यांचा अभ्यास करून त्याचा मतितार्थ समजून घ्यावा. त्यांचा उपदेश आचरणात आणावा. श्रींची अक्कलकोटमधील ही भ्रमंती स्थाने डोळे भरून पहावीत. त्यांचे स्मरण करावे. त्या त्या ठिकाणी श्रींचे अस्तित्व किंवा वावर आपणास जाणवेल. श्रींच्या वास्तव्य व लीलांशी निगडीत अशी ही दिव्य स्थाने प्रेक्षणीय स्थळे आपणास प्रेरणादायी ठरतील असा मला विश्वास वाटतो. ही स्थलदर्शिका आपण श्रींचा प्रसाद म्हणून आपल्या घरी ठेवावी. घरच्या घरी नित्य एकेक पृष्ठातील वास्तुचे दर्शन घेऊन त्यामागील मजकूर वाचून नित्य पारायण करावे. आपल्या सग्या सोयऱ्यांना, आप्तेष्टांना भेट द्यावी. श्रींच्या या पावन चरित्राचा जास्तीत जास्त प्रचार करावा. श्रींच्या कृपेने आज्ञेने आणि आशीर्वादाने निर्माण झालेली ही मार्गदर्शिका समस्त स्वामी भक्तांच्या घरोघरी जाऊन त्यांना श्रींची कृपा प्राप्त व्हावी यापेक्षा अधिक काय सांगू? श्रींच्या पश्चात् स्थापन झालेली अनेक मंदिरे अक्कलकोटात आहेत. अजूनही अशा काही वास्तु आहेत ज्यांची माहिती यात समाविष्ट झाली नाही, त्याचा विचार भविष्यात केला जाईल.