श्रीरामचंद्राचे देवालय आणि रामचंद्राचा जलकूप
श्रीमहाराजांच्या भ्रमंती स्थळातील विशेष आवडीचे स्थान म्हणजे गावाबाहेर असलेले प्राचीन प्रशस्त रामचंद्राचे देऊळ व त्यासमोरील वापी. या विहीरीच्या तटावर श्रीमहाराज नेहमी बसत असत. ही विहीर आज कशीबशी तग धरून उभी आहे. विश्वंबर बुवा आणि बळवंत या सेवेकऱ्यांच्या आश्रयाने रहाणारी चिमा नावाची एक ब्राह्मण स्त्री. इथे महाराजांचे दर्शनास आली. तिच्या हातात श्रींची पाद्यपूजा करण्यासाठी आणलेला पाण्याचा तांब्या होता. श्रीमहाराजांनी तो घेतला अन् विहीरीत भिरकावून दिला. चिमा रडू लागली. महाराज माझ्याकडे या तांब्याशिवाय अन्य भांडे नाही. आता मी काय करू? त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘जगे विहीरीत उडी टाक अन् घे आपला तांब्या काढून.’ यावर क्षणभर चिमा गडबडली. तिला पोहता येत नव्हते. पण श्रींवर निस्सीम श्रध्वा जसल्यामुळे मागचा पुढचा विचार न करता तिने त्या भल्या थोरल्या खोल विहिरीत उडी मारली. गटांगळ्या खात विहिरीच्या तळाशी बुडून गेली. घाबरलेले लोक तिला काढण्याची तयारी करू लागले. श्री मात्र खो खो हसत त्यांना टोकू लागले. आणि म्हणाले, ‘रांड बुडते कसली, आता वर येईल. बघावे तेव्हा चेप्टा करीत असते…’ चिमा जीवाच्या आकांताने ओरडत होती. सर्वजण काठावर उभे राहून मजा पहात होते. अखेर कुणाच्याही मदतीशिवाय चिमा आपला तांब्या घेऊन विहीरीच्या बाहेर आली. निंदा करण्याचा, इतरांची खिल्ली उडवण्याचा दुर्गुण टाकून अंतर्मुख होऊन अखेरपर्यंत ती श्री सेवेत राहिली. गेल्या काही वर्षात हा आड उध्वस्त झाला आहे.
रामचंद्राचे देवालय कुणी बांधले याची नोंद नाही. भव्य तटबंदीच्या प्राकारात मध्यभागी असलेले हे राम मंदिर फार पुरातन आहे. रामराया, त्यांचे मांडीवर बसलेल्या सीतामाई आणि शेजारी लक्ष्मण भावोजी, अशा प्राचीन मूर्ती होत्या. वर्षानुवर्षांच्या दह्यादुधाच्या अभिषेकाने ह्या मूर्ती खराब झाल्या. श्रीमहाराजांच्या काळी हे मंदिर गजबजलेले असायचे. कारण या देवालयाचा परिसर फार मोठा आहे. मंदिरातील दर्शन मंडपात वीररूपातील हनुमंत असून गर्भगृहात उजव्या बाजूस हात जोडून उभे असलेले दास मारुती हे या मंदिराचे ठळक वैशिष्ट्य. लढवय्या शिपायांना स्फूर्ती देणाऱ्या मारुतीरायांच्या दर्शनास समरवीर आवर्जुन येत असत. मीच कधी राम होतो. कधी कृष्ण होतो अशी ग्वाही देणारे स्वामीराय या रामचंद्राचे देवळात अनेकदा मुक्कामास असत. आळंदीच्या नृसिंह सरस्वतींना, ‘क्यूं रंडी नही छोडी? ‘ असा प्रश्न करून सिध्दींच्या मागे लागू नये. ती परमार्थातील धोंड आहे हे सूचवून त्यास उपदेश केला तो याच रामाचे देवळात. याच नृसिंह सरस्वतींना जुन्या राजवाड्याजवळील भंडारखान्यात मंत्र म्हणून आज्ञाचक्र भेद केला आणि एका कृपा कटाक्षात समाधी सुखाची अनुभूती दिली. त्यानंतर दीड दोन तासांनी ते देहभानावर आले. त्यानंतर ‘हे मोठे महंत आहेत यास बसावयास आसन द्यावे,’ अशी आज्ञा दिली आणि व्याघ्रजीनावर त्यांस बसवून महाराजांनी त्यांचा मोठा बहुमान केला.
या रामचंद्राच्या मंदिरातील पक्क्या बांधकामाच्या प्रशस्त ओवऱ्या ह्या त्याकाळातील शेकडो यात्रेकरूंसाठी विश्रांती स्थान होत्या. आता या ओवयांची पडझड झाली आहे. तरीही हे भक्कम बांधणीचे मंदिर त्यामानाने आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. पंडिताचार्य गोविंदाचार्य मणूरकर हे श्रीमहाराजांच्या कारकीर्दीत या मंदिराची पूजा अर्चा व देखभाल करीत. त्यांचे वडील श्रीस्वामी महाराजांच्या सेवेत होते. पाच पिढ्यांच्या सेवेनंतर सुहास चंद्रकांत मणूरकर यांनी ह्या मंदिराचे सर्व हक्क वटवृक्ष देवस्थानकडे सुपूर्द केले. अक्कलकोट हद्दीत वागदरी रोड शरण मठाजवळ या मंदिराची पासष्ट एकर जमीन असून या शेतात लक्ष्मीचे जागृत स्थान आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात तिचा उत्सव रानातच साजरा केला जातो. या घराण्यावर प्रभूरामाची आणि स्वामी महाराजांची अखंड कृपा असून अनेक आयुर्वेदिक औषधांचे निर्माते म्हणून हे मणूरकर घराणे अक्कलकोटात विख्यात आहे. राजेराय रायान मठ, बेलेनाथ बाबा समाधी मंदिरचे समोरचे हे रामचंद्राचे देवालय आणि वापी पहायला विसरू नये.