शिवयोग्याचे बारा ज्योर्तिलिंग मंदिर

अक्कलकोट बाजारपेठेच्या खालच्या अंगास हाक्याच्या मारुतीजवळ, आझाद गल्लीत या शिवयोग्यांचे म्हणजेच लंडोरी बुवांचे बारा ज्योतिर्लिंग मंदिर आहे. एकाच गर्भगृहात एकत्रित अशी द्वादश शिवलिंगे असलेले हे स्थान, एस. टी. स्टँडपासून समाधीकडे आल्यावर डाव्या बाजूस आहे. बुवांच्या तपोबलामुळे इथे प्रथम तीन शिवलिंगे प्रकट झाली. त्यानंतर लगतच्या परिसरात एका मागोमाग एक अशी आणखी नऊ शिवलिंगे दृष्टोत्पत्तीस आली. ती एकमेकांस खेटून एकत्र प्रतिष्ठापित केली आणि बारा ज्योतिर्लिंग स्थान उदयास आले. शिवयोगी लंडोरी बुवा हे सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यांची शिष्यपरंपराही थोर होती. पैकी एका शिष्याची समाधी बुवांच्याच कारकीर्दीत मळ्यात उभारली गेली. बुवांच्या पश्चात त्यांच्या शिष्य परंपरेतील काहींच्या समाधी याच परिसरात होत्या. त्यांचेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या भूमीगत झाल्या. बांधकामाच्या निमित्ताने परिसरात खणायला घेतले असता, भूमीगत अशा समाधींवरील शिवलिंगे जमिनीत सापडली. मुळात शिवयोगी बुवांच्या तपोबलाने निर्माण झालेली तीनच शिवलिंगे होती. त्यानंतर ही नऊ शिवलिंगे लिंपून स्थापन करण्यात आली. ह्या वारा ज्योतिर्लिंग मंदिरात दर महिन्याच्या शिवरात्रीला शिवभक्तांची गर्दी असते. महाशिवरात्र व श्रावणी सोमवारी इथे मोठा उत्सव व अभिषेक असतो. शिवयोगी लंडोरी बुवांच्या वंशजांपैकी नवव्या पिढीतील श्रीदिगंबरवुवा सदाशिवराव शिवयोगी हे मंदिरालगत वास्तव्यास आहेत. हे देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण असून शिवभक्त आहेत. या मंदिराची मूळ बांधणी प्राचीन होती. नुकताच या मंदिराचा जीर्णोध्दार झाला आहे. श्रीस्वामी महाराज मूळ मंदिरात येऊन गेले होते. त्यावेळी हे मोठे शिवस्थान होणार असे भाकित त्यांनी केले होते.