शिवयोगी लंडोरीबुवांचा मळा – बारा ज्योतिर्लिंग मंदिर

वटवृक्ष देवस्थानपासून जेमतेम एक किमीच्या अंतरावर, वटवृक्ष देवस्थानमार्फत अलिकडेच एक आलिशान असे भक्तनिवास उभारले गेले असून, शेकडो स्वामीभक्तांची निवासाची उत्तम व्यवस्था केली आहे. या भक्तनिवासाच्या मागच्या बाजूचा संपूर्ण परिसर म्हणजेच लंडोरी बुवांचा मळा होय. अक्कलकोट येथील लिंगायत समाजात लंडोरीबुवा नावाचे एक महान शिवयोगी होऊन गेले. त्यांच्या तपोबलामुळे अवकलकोट येथे द्वादश ज्योतिर्लिंग स्थानाची निर्मिती झाली ( बारा ज्योतिर्लिंग मंदिर ) मुरलीधर मंदिरासमोरील धाकट्या वेशीच्या बाहेर असलेल्या या लंडोरी बुवांच्या मळ्यात श्रीमहाराजांचे अनेकदा येणे-जाणे घडायचे. कर्जतचे लक्ष्मण महाराज भापकर यांना घेऊन श्रीमहाराज याच मळ्यात आले आणि त्यांची परिक्षा घेण्यासाठी धावत जाऊन सुईदोरा घेऊन ये अशी आज्ञा दिली. श्रींच्या आज्ञेनुसार धावत सुटलेल्या लक्ष्मण महाराजांना अक्कलकोटच्या थोरल्या वेशीजवळ एका वृध्द स्त्रीच्या रूपात श्रींनीच सुईदोरा दिला. तो घेऊन ते परत मळ्यात आले आणि समर्थांच्या कृपेने मोठे योगी बनले त्यांचे समग्र चरित्र श्रीस्वामी समर्थ गौरव गाथेच्या द्वितीय खंडात आम्ही दिले आहे. लहानग्या लक्ष्मण महाराज भापकरांबरोबर श्रीमहाराज ज्या पाटाच्या पाण्यात पाय सोडून बसले होते, तोच हा बुवांचा मळा होय. श्रीमहाराज अक्कलकोटला येण्याच्या कित्येक वर्षे आधी लंडोरी बुवांनी देह ठेवला होता. या मळ्यात भवत्तगणांनी पुढे त्यांची समाधी बांधली. या लंडोरी बुवांचे कलाप्पा पाटील नावाचे एक पट्टशिष्य होते. बुवांच्या सान्निध्यात असताना अकस्मात त्यांचे निधन झाले. त्यामुळे बुवांनीच चारी बाजूस उंच अशा कमानीची एक लांव रुंद टोलेजंग समाधी बांधून आपल्या शिष्याला चिरंजीव केले. मळ्यातील या समाधीवर पूर्व दिशेस अभिषेक जल ओघळेल अशा पद्धतीने एका शिवपिंडीची स्थापना केली. अक्कलकोटातील थडगीमळ्यात राजघराण्यातील व्यक्तिंच्या जशा प्रशस्त समाधी आहेत तशाच धर्तीवर बुवांनी आपल्या शिष्याची समाधी उमारली आहे. पुढे जेका बुवांनी देह ठेवला तेव्हा शिष्य कलाप्पा पाटलाच्या शेजारीच बुवांची समाधी बांधली. ही समाधी दोन फूट उंचीची असून त्यावरील मानवी आकृतीवर महाराज शिवयोगी बुवा असे नमूद असून त्यावर शिवलिंगे स्थापिली आहेत. या दोन्ही समाधींच्या समोर मोटनाडा लावण्याची सुविधा असलेली एक भलीथोरली विहिर आहे. आज तिची पडझड झाली असली तरी सध्या ती वापरात असून सुगरणींच्या घरट्यांनी सजलेली आहे. बुवांचा मळाही फुललेला दिसतो.

लंडोरी बुवांचा मळा आणि तेथील कलाप्पा पाटलांची भव्य समाधी हे श्रीस्वामी समर्थ महाराजांचे विश्रांतीस्थान असे. श्रीमहाराजांनाही या शिवयोग्यांबद्दल मनोमन आदर होता. कारण ते अक्कलकोटात येण्यापूर्वी अनेक वर्षे या लंडोरी बुवांचे कृपाछत्र अक्कलकोटावर होते. एकदा तिथे फार मोठा दुष्काळ पडला. गुरेढोरे, मुलेमाणसे पाण्यासाठी तडफडू लागली. कितीतरी यज्ञयाग केले. त्या प्रीत्यर्थ जवळ असेल नसेल ते द्रव्य वेचले. परंतु, पर्जन्याची कृपा होत नव्हती. अखेरीस शेवटचा उपाय म्हणून अक्कलकोटचे ग्रामस्थ लंडोरी बुवांच्या मळ्यात आले. बुवांना हे सर्व ज्ञातच होते. गावकऱ्यांची तगमग त्यांना सहन झाली नाही.

ते ताडकन उठून उभे राहिले. वर आकाशाकडे एक तीक्ष्ण कटाक्ष फेकत आपल्या अंगावरील घोंगडी त्यांनी उभ्या उभ्या झटकली. त्यावेळी त्यांचे थरथरणारे शरीर, उग्र मुद्रा आणि रुद्रावतार पाहून गावकरी दिङ्मूढ झाले. पण क्षणभरच. एवढ्यात आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली. बघता बघता सहस्रधारांनी पर्जन्य कोसळू लागला. अक्कलकोटचे ग्रामस्थ त्यानंतर अनेक वर्षे सुखसमृद्धीत न्हाऊन निघाले. अशा या शिवयोग्याचे चिरंतन वास्तव्य असणाऱ्या, बारा महिने फुललेल्या मळ्यात श्रीमहाराज वारंवार येत असत. दुष्काळग्रस्त अक्कलकोटमधील पाण्याविना तडफडणाऱ्या शेकडो जीवांना, स्वत:च्या योगसामर्थ्यानि पाऊस पाडून ज्यांनी तृप्त केले त्या शिवयोगी बुवांना, अक्कलकोटच्या राजाने हा मळा दान दिला. त्यानंतर शिवयोगी बुवांचे वास्तव्य अखेरपर्यंत याच मळ्यात होते. वटवृक्ष देवस्थानकडून अन्नछत्राकडे जाताना सांडपाण्याचा नाला ओलांडताच डाव्या बाजूच्या रस्त्याने पुढे गेल्यास उजव्या हाताला लिंगायत समाजाचा विरक्त मठ आहे. या मठाच्या मागच्या बाजूस स्मशान असून त्याच्या जवळ हा बुवांचा मळा आहे. त्यात पाच फूट उंच समभूज चौकोनी अशी समाधी असून त्यावर सतरा फूट उंचीची आणि पंधरा बाय तीस फूट लांबीरुंदीची भव्य कमान आहे. श्रीमहाराजांचे हे अत्यंत आवडते ठिकाण असून लहर लागली की ते इथे येत आणि तासन् तास बसून रहात. अर्थात् त्यांच्या आगेमागे पाचपन्नास लोकांचा जथा नित्य असायचाच.

एके दिवशी असेच श्रीमहाराज या समाधीवर बसले होते. तेथील शिवलिंगाची त्यांनी स्वहस्ते पूजा केली. त्याचवेळी दोन शिपाई अटकेत असलेल्या धटिंगण कानफाट्याला साखळदंडात जखडून गावात झाडलोट करण्यासाठी धाकट्या वेशीजवळ घेऊन आले. विश्वंभरबुवा सेवेकऱ्याचे डोके फोडल्यामुळे तो कैदेत होता. एवढ्यात त्याच्या कानावर श्रीस्वामी महाराजांचा नामगजर पडला. कारण महाराज मळ्यात सेवेकऱ्यांसोबत बसले होते. कानफाट्या हा महाराजांचा निस्सीम भक्त होता. श्रीस्वामींचे दर्शनास आपणास घेऊन जावे अशी विनंती त्याने केली पण शिपायाने त्यास नकार दिला. त्यामुळे कानफाट्या खवळला. त्याच शिपायाच्या हातातली तलवार हिसकावून तो मळ्याच्या दिशेने पळाला. पायातल्या लोखंडी साखळदंडानिशी नंगी तलवार घेऊन महाराजांच्या दिशेने धावत येणाऱ्या त्या धटिंगणाला पाहून साऱ्यांची पाचावर धारण बसली. कारण त्याचे प्रतापच असे होते. बहुतेक सेवेकऱ्यांनी भीतीने तिथून पोबारा केला. भुजंगा भालके शिपाई आणि सेवेकरी वावासाहेब यादव यांचेखेरीज महाराजांजवळ अन्य कुणीच उरले नाही. आणखी एक व्यक्ति तिथे साधनेत होती. परभणी जिल्ह्यातील एक वृध्द ब्राह्मण विहीरीच्या ओट्याखाली हातात जपमाळ घेऊन श्रीमहाराजांच्या नामस्मरणात ध्यानस्थ बसला होता. एवढ्यात कानफाट्या महाराजांचे समोर उभा ठाकला.

‘यहाँ क्या है? मोटके पास बैल और टोणगा है, उसके पास जाव…’ महाराजांची ही आज्ञा ऐकताच कानफाट्या विहिरीकडे निघाला आणि पुन्हा माघारी आला. चोळाप्पाच्या अंगलटीचा व त्याच्यासारखाच काळासावळा पाठमोरा बसलेला तो ब्राह्मण चोळाप्पाच आहे असे त्यास वाटले. त्याचा चोळाप्पावर भयंकर राग होता. त्याचा मुडदा पाडण्याची आयतीच संधी चालून आली असे समजून कानफाट्याने त्या ब्राह्मणावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. ब्राह्मण रक्तबंबाळ झाला. आपल्यावर हा हल्ला का व कशासाठी होतोय हे कळायच्या आत तो रक्तस्त्रावाने बेशुध्द पडला. भक्तवत्सल स्वामीराय एकटक निश्चल नजरेने ब्राह्मणाकडे पहात होते. शेवटी मूठ तुटून तलवारीचे पाते खाली पडले, तेव्हा कानफाट्याने ती तलवार स्वामींच्या पुढे आणून टाकली. त्यानंतर रागाने बेभान झालेला कानफाट्या मळ्यातील मोठमोठी ढेकळे उचलून फेकू लागला. अनेकजण दुरुनच त्याचे हे थैमान पहात होते. कारण पुढे येऊन त्यास पकडण्याचे धारिष्ट्य कोणातच नव्हते. तेवढ्यात कानफाट्याहून दांडगा गलेलठ्ठ असा एक धनगर तिथे आला. समोरच्या मंडळींनी कानफाट्यास बोलण्यात गुंतवले आणि क्षणार्धात त्या धनगराने कानफाट्याच्या गुडघ्यावर मागून एक तडाखा मारून त्यास खाली पाडले आणि शिपायांनी चद्दिशी पुढे होऊन त्यास साखळदंडांनी जखडून टाकले. रक्तबंबाळ झालेल्या त्या वृद्ध ब्राह्मणावर श्रींची कृपादृष्टी होतीच. तो सावध होऊन उठून बसला. त्यास वैद्याकडे नेऊन औषधोपचार केल्यावर तो बरा झाला. एवढ्या मोठ्या जीवघेण्या प्रसंगातून तो केवळ स्वामींच्या कृपेमुळेच वाचला अन्यथा त्याची धडगत नव्हती.

(‘या शिवयोग्याच्या म्हणजेच लंडोरी बुवांच्या वारा ज्योर्तिलिंग मंदिराची माहिती पान १४ वर दिली आहे. )