विष्णुबुवा ओंडकरांच्या वाड्यातील स्वामीपादुका
अक्कलकोटला मेनरोडवर ग्रामजोशी वाड्यासमोर म्हणजेच डॉ. मेंथेच्या वाड्यासमोर ओंडकरबुवांचा वाडा आहे. विष्णुबुवा ओंडकर हे श्रींचे भक्त होते. ह्यांच्या वाड्यात किंवा समोरील परसात महाराज अनेकदा येऊन बसत. या वाड्यात असंख्य चमत्कार श्रींनी केले असून सुंदराबाईची हकालपट्टी, अंत्यज चोखामेळा भजनी बुवांवर कृपा, विष्णुबुवांवर श्रीकृपा आणि पुण्याच्या एका दांपत्याची श्रींनी घेतलेली हजेरी असे महत्त्वाचे प्रसंग या वाड्यात घडले. श्रीमहाराजांच्या समाधी पश्चात हा दुमजली वाडा ओंडकरांनी १८७८ ला म्हसकरांना विकला व त्यांचे वंशज इथून स्थलांतरीत झाले. म्हसकरांनी फलटणकरांना विकला. ह्या वाड्याच्या दोन स्वतंत्र वास्तू असून, त्यापैकी एक वास्तू १९१७ साली शंकर विनायक फलटणकरांनी परिचारकांना विकला. बाहेरची वास्तू गणपतराव शेरीकरांकडून १९२७ साली फडणीस यांजकडून गोविंद नानाजी परिचारक यांनी खरेदी केला. तेव्हापासून ही वास्तु परिचारकांच्या मालकीची असून डॉ. परिचारकांच्या दवाखान्यातूनच ओंडकरांच्या वाड्याकडे जाता येते. डॉ. परिचारकांना विनंती करून, योग्य वेळात गेल्यास ओंडकरांच्या घरासमोरील परसातील एका घुमटीत श्रीमहाराजांच्या पापाण पादुकांचे आपणास दर्शन घडेल. विष्णुबुवांना श्रीमहाराजांनी स्वहस्ते ह्या पादुका दिल्या असून, बुवांनी मोठ्या भक्तिभावाने श्रीमहाराज त्यांच्या वाड्यात ज्या कट्ट्यावर बसत तिथे त्यांची स्थापना केली आहे.