रामाचार्य जमखिंडीकर (मानकऱ्याचा) वाडा
बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील रामतीर्थ नामक तीर्थक्षेत्र फार प्राचीन आहे. तिथे त्रिविक्रम संन्यासी नामक एकसिध्द योगी रहात असत. ह्यांना एकदा अक्कलकोटला पाचारण करण्यात आले. शहाजी तथा अप्पासाहेब भोसले हे त्यावेळी अक्कलकोटचे नरेश होते. शहाजी राजेंना दीर्घायुषी पुत्र व्हावा आणि राजवाड्यातील पिशाच्च बाधेचे उच्चाटन व्हावे म्हणून रामतीर्थ शिरोमणींच्या त्रिविक्रम यतिंना अक्कलकोटास आमंत्रित केले.
‘सर्व वाधा दूर होईल, शूर चतुर पुत्ररत्न प्राप्त होऊन हे राजघराणे विख्यात होईल. थोड्याच दिवसात या प्रज्ञापुरीस एक परमहंस यतिंद्रांचे आगमन होईल. गावोगावचे लोक त्यांचे दर्शनास येत राहतील.’ पुढे त्याचप्रमाणे घडले. यतिंद्रमुनी अक्कलकोटास आले त्यावेळी त्यांचेबरोबर रामाचार्य जमखिंडीकर नावाचे एक सन्मार्गी दशग्रंथी ब्राह्मण शिष्य होते. राजघराण्यास नित्य तीर्थप्रसाद मिळावा, म्हणून त्रिविक्रम यतिंनी या रामाचार्यांना अक्कलकोटास रहाण्याची आज्ञा केली. त्यानुसार रामाचार्य जमखिंडीकर हे अक्कलकोटचे मानकरी म्हणून अक्कलकोटास राहिले. संस्थानतर्फे त्यांच्या निवासाची व्यवस्था मुरलीधर मंदिरानजीक असलेल्या वाड्यात करण्यात आली. तो वाडा आजही मानकऱ्याचा वाडा म्हणून प्रसिध्द असून बाळासाहेब इंगळे यांचे ताब्यात आहे. तिथूनच पुढे डाव्या बाजूला माधवराव शिंदोरे यांचा वाडा आहे.
गुर्वाज्ञेने राजाश्रींत रामाचार्य व त्यांची पत्नी गयाबाई हे दोघेही श्रींच्या सेवेत राहिले. पण उतारवय झाले तरी संतान नव्हते. पण श्रींच्या आशीर्वादाने गयाबाईंची कूस उजवली. कृष्णेच्या काठी असलेल्या नृसिंहाचे देवस्थानच्या शूर्पाली या गावास गयाबाई आपल्या माहेरी बाळंतपणास गेल्या. इकडे रामाचार्य चिंतेत होते. या रामाचार्यांच्या वाड्यात एक रामदासीबुवा ( कबीरा) रहात होते. श्रींनी त्यास हाक मारुन कागद घेऊन येण्यास सांगितले. त्यावर ‘पुत्र जाहला ‘ असे लिहून घेतले अन् हा कागद कोमट्यास म्हणजेच रामाचार्यांस नेऊन दे असे सांगितले. रामाचार्यांनी श्रींना विचारले, ‘हा कागद कसला तर तुला पुत्रलाभ झाला, हा पहा गणपती’ असे म्हणून महाराज मुरलीधर मंदिरात जाऊन भक्तांसोबत खेळत बसले. त्यानंतर काही वेळातच शुर्पालीहून पुत्र जन्माची वार्ता देणारे पत्र आले. मुलाचे नाव कृष्णाचार्य असे ठेवण्यात आले. हा मुलगा एकदम देखणा व गणपती सारखा थोडा ठेंगणा होता. हे श्रींनी केलेले वर्णन तंतोतंत खरे होते. पुढे काही वर्षांनी प्रथम रामाचार्य व नंतर गयाबाई निवर्तल्या. रामाचार्यांची कन्या भीमा निष्काम कुलीन वृत्तीची होती तर पुत्र कृष्णाचार्य हेही थोर भगवतभक्त व श्रींचे कृपांकित होते. त्यांनाही राजघराण्याकडून आश्रय आणि बहुमान होता. कृष्णाचार्यांना गोविंदं आणि माधव असे दोन पुत्र होते. पैकी दोघेही अक्कलकोटहून स्थलांतरित झाले. माधवराव नोकरी निमित्त सोलापुरास गेले तर गोविंदराव मुंबईत गोवंडी येथे. गोविंद यांचे पुत्र रामचंद्र यांचे दोन पुत्र विक्रांत आणि जितेंद्र हे पुण्य नगरीस रहातात. त्यांचेकडे श्रीमहाराज भोजन करीत ते मोठे पितळी ताट, तांब्या, श्रींच्या पादुका आणि अंगरखा आहे.