राजोपाध्ये वाडा – भाऊ शेषाद्रींना मुक्ती
टिळक गल्लीजवळ राजोपाध्ये गल्ली असून इथे राजोपाध्येंचे सलग तीन वाडे आहेत. त्यातील रामजानकी निवास हा वाडा गिरराव राजोपाध्ये यांचा. हे घराणे मूळचे साताऱ्याचे. शिव कालातील पंडितराव हे पुढे राजोपाध्ये झाले. गिरराव व त्यांचे रामकृष्ण पंढरीनाथ व गोपाळकृष्ण असे तीन पुत्र. संपूर्ण कुटुंब स्वामीभक्त. मुरलीधर मंदिराजवळून टिळक गल्लीत शिरताना उजवीकडे गिररावांचा वाडा आहे. त्यांचे वाड्यात श्रीमहाराज ज्या खांबाला टेकून बसत त्याचे दर्शन आपण घेऊ शकता. गिरराव हे अक्कलकोटच्या राजांचा उपाध्ये. अक्कलकोटच्या जुन्या राजवाड्यातील भले थोरले देवघर – हिरे माणकांचे देवाचे टाक, श्रींच्या पादुका यांची देखभाल ते करीत. राजघराण्यातील सर्व धार्मिक विधी – यज्ञयाग राजोपाध्येंच्या हस्ते संपन्न होत.
गिरसवांच्या वाड्यात श्रीमहाराज अनेकदा येत. गिररावांचे सासरे भाऊ शेषाद्री हेही श्रींचे भक्त होते. हे वळसंग जवळील धोत्री गावचे रहिवासी. त्यांची एकुलती एक कन्या गिररावांना दिली होती. त्यामुळे उतारवयात ते अक्कलकोट येथे मुलीकडेच रहात असत. अखेरच्या काळात आसन्न मरण पडले असता श्रींचा धावा सुरु केला. भक्तवत्सल स्वामीमहाराज राजोपाध्ये वाड्यांत आले. रात्रभर ते भाऊंच्या उशाशी बसून होते. हातात मण्याची माळ घेऊन ती वर फेकणे आणि झेलणे सुरु होते. अचानक ती माळ तुटली आणि त्याचक्षणी भाऊंचे पंचप्राण अनंतात विलीन झाले. भाऊ शेषाद्रींची शवयात्रा स्मशानापर्यंत निघाली.. त्यांच्या देहाला अग्नि लागला तोपर्यंत सर्वकाळ स्वामी महाराज तिथे उपस्थित होते. राजोपाध्ये घराण्याची पाचवी पिढी आज अक्कलकोटात नांदते आहे.