राजे रायरायन मठ (सन १८७७)

हैदराबादच्या निजाम सरकारच्या दप्तरी असलेले राजेरायरायन हे भालेराव उपनामाचे देशस्थ ब्राह्मण. पूर्वजांच्या कर्तृत्वामुळे निजामाकडून त्यांना चार-पाच लाखाची जहागिरी आणि तलवार बाजीच्या जोरावर राजांचे राजे म्हणजेच राजे रायरायन असा किताब प्राप्त झाला. हुमणाबादचे दत्तात्रेय अवतार श्रीमाणिक प्रभू महाराज हे या घराण्याचे श्रध्दास्थान. एकदा प्रभु चाळकापुरात आले असल्याची खबर मिळताच थोरले राजे रायरायान लगबगीने त्यांचे दर्शनास गेले. आपणास पुत्रप्राप्ती होऊन संस्थानची परंपरा अखंड रहावी अशी प्रभुचरणी प्रार्थना केली. श्रीमाणिक प्रभूंनी त्यांना फुले, खारका आणि भरमाचा एक गोळा प्रसाद म्हणून दिला. फलस्वरूप पुत्रप्राप्ती झाली. प्रभुंच्या आज्ञेनुसार मुलाचे नाव शंकर असे ठेवले. हेच शंकरराव राजे रायराया होत. प्रभुकृपेमुळे शंकररावांची कीर्ति दिगंत झाली.

कालांतराने, प्रारब्धवशात सालस शंकररावास ब्रह्मसमंधाने पछडले. त्यातच क्षयरोग उद्भवून प्रकृती खालावली. वैभवसंपन्न सर्वशक्तिमान असा राजा या दुखण्यामुळे पंगू झाला. अनेक प्रकारचे औषधोपचार करूनही प्रकृति सुधारत नव्हती. अखेरीस ते सहकुटुंब काशीयात्रेस निघाले. इथे श्रीविश्वेश्वराचे दर्शनास गेले असता त्यांना शिवलिंगाच्या जागी एका दिव्य विभूतीचे दर्शन घडले. तेथील ब्राह्मणांकडे याविषयी चर्चा केली असता, आपण केलेला एखादा नवस फेडायचा राहिला असेल तो आठवून पहावा असे ब्रह्मवृंदाने सांगितले. शंकररावांना एकदम स्मरण झाले. काही वर्षापूर्वी आपण अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला होता, परंतु ते घडले नाही. तेव्हा विश्वेश्वराचे जागी दर्शन देणारे हे यती म्हणजे अक्कलकोटचे स्वामीच असावेत अशी खूणगाठ त्यांना पटली. प्रयाग गया आदि तीर्थक्षेत्री दर्शन, ब्राह्मण भोजन व दानदक्षिणा करीत ते गाणगापूर मार्गाने अक्कलकोटला श्रींच्या दर्शनार्थ निघाले. परंतू त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे तीन महिने ते गाणगापूर येथे राहिले. पुष्कळ अनुष्ठाने, दानधर्म केला परंतु प्रकृति अधिकच ढासळत गेली. व्याधीजर्जर शरीर शरपंजरी झाले. अशातच एके रात्री अक्कलकोटास गेल्याशिवाय आरोग्य होणार नाही, असा त्यांस दृष्टांत झाला. तेव्हा मोठ्या कष्टाने प्रवास करीत ते कसेबसे अक्कलकोटास दाखल झाले.

श्रीस्वामी महाराज त्यावेळी कर्नाळकरांच्या माडीवर एका पलंगावर पहुडले होते. शंकररावांनी श्रींचे दर्शन घेतले आणि काशीक्षेत्री यतिरूपात दिसलेली ती महादिव्य मूर्ती म्हणजे श्रीस्वामी समर्थ महाराजच होते, याची त्यांना खात्री पटली. श्रीसमर्थ चरणी दंडवत घातला. कंठ दाटून आला आणि काही बोलवेनासे झाल्यामुळे ते एका कोपऱ्यात स्तब्ध उभे राहिले. सुंदराबाई तिथे बसलेल्या होत्या. त्यांनी विचारपूस करता शंकररावांनी आपली सर्व व्यथा सुंदराबाईना सांगून श्रींची मेहेरनजर व्हावी याविषयी प्रार्थना करण्याची विनंती केली. परंतु तुम्हास आरोग्य झाल्यास मला काय द्याल, असा सवाल तिने केला. जिवाला कंटाळलेल्या शंकररावांनी तुम्ही मागाल ते आम्ही देऊ असे कबूल केले. व्याधीमुळे काळाकुट्ट झालेला त्यांचा चेहरा आणि जर्जर अवस्था पाहून हा अगदी सामान्य माणूस असावा असे सुंदराबाईस वाटले होते. म्हणून बरे झाल्यावर दोन हजार रुपये देण्याची कबुली घेतली. त्यावर दोनच हजार काय मी बरा झालो तर दहा हजार रुपये देईन असे शंकरराव म्हणाले. हे ऐकून सुंदराबाई चकीत झाल्या. शंकररावांना श्रींसमोर उभे केले आणि श्रीमहाराज यांना बरे करावे असा हुकूम सोडला. हे ऐकताच महाराज काहीही न बोलता तिथून उठले व ताड ताड पावले टाकीत शेखनूर दर्ग्यावर गेले. तेथील कब्रस्तानात नुकत्याच खणलेल्या एका खाचेत छाटी टाकून तिथे निजले. काही काळाने तिथून उठून परत वडाखाली आले. कब्रस्तानातील खड्ड्यात निजून महाराजांनी शंकररावांचा मृत्यू म्हणजे काळ चुकवला होता. शंकररावास लिंबाच्या पाल्यात नऊमिरी घालून ते औषध घ्यावे आणि शेखनूर बाबाच्या कबरीवर कफनी चढवावी अशी आज्ञा केली. शंकररावांची प्रकृति त्यानंतर हळुहळू सुधारली आणि श्रींचा निरोप घेऊन ते हैदराबादेस परत गेले.

पुढे वर्षभरातच श्रीकृपेने ते ठणठणीत बरे झाले. बरे झाल्यावर नवस फेडण्यासाठी अक्कलकोटी आले. श्रीचरणी रुपये दहा हजार अर्पण करून याचे काय करावे असे विचारू लागले. सुंदराबाई व चोळाप्पा द्रव्याच्या आशेने पुढे पुढे लुडबुडू लागले त्यावर बोडकीस व जैनास काही देऊ नको… मठ बांध…गावाबाहेर मारुती आहे तिथेच चुनेगच्ची मठ बांधावा असे महाराज म्हणाले. श्रींनी भुजंगा शिपाई ह्यास ती जागा दाखवण्यास सांगितले. रामचंद्राचे देवालयासमोर ती जागा पाहून अक्कलकोट संस्थानचे कारभारी नानासाहेब बर्वे यांच्या मदतीने काही महिन्यातच शंकररावांनी तब्बल तीस हजार रुपये खर्च करून टोलेजंग मठ बांधला. सन १८७७ च्या माघ महिन्यात स्वामी महाराजांच्या उपस्थितीत श्रींचे सुंदर मुखकमल आणि संगमरवरी पादुकांची तिथे स्थापना करण्यात आली. त्यादिवशी सुमारे दोन हजार ब्राह्मणांना पक्वान्नभोजन दिले. ब्राह्मण व सुवासिनीस एक रुपया तर गर्भवती स्त्रियांना दोन रुपये अशी शेकडो रुपयांची दक्षिणा वाटण्यात आली. एवढी भरघोस दक्षिणा अवकलकोटास या आधी कोणीही दिलेली नव्हती. त्यामुळे शंकरराव राजेंच्या दातृत्वगुणाला अनुसरून, दक्षिणा द्यावी तर राजे रायरायन यांनी आणि ब्राह्मणभोजन घालावे ते बडोदेकरांनी अशी म्हण प्रचलित झाली होती. मठाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर शंकररावांनी मठाची व्यवस्था अवकलकोटमधील रामाचार्य जमखिंडीकरांच्या वाड्यात रहाणाऱ्या रामदासी बुवांकडे सुपूर्द केली. श्रीमहाराज या रामदासी बुवांना कबिरा म्हणत. त्यानंतर या मठाची व्यवस्था नरसिंहाचारी जोशी यांचेकडे अनेक वर्ष होती.

बेलेनाथ बाबा समाधी मंदिर 

१९५३ च्या दरम्यान गाणगापूरहून आलेले एक बालसाधु वटवृक्ष मंदिराजवळील सरदेशमुखांच्या मारुतीजवळ वास्तव्यास असत. त्यांच्या हातात नेहमी बेलपत्र असायचे त्यामुळे वेलेनाथ बाबा असे त्यांचे नामकरण झाले. काही अक्कलकोट ग्रामस्थांनी पुढे त्यांना या राजेरायरायन मठात आणले. मठातील बिल्ववृक्षाखाली त्यांनी एका शिवलिंगाची स्थापना केली. मठाबाहेर एका छोट्याशा मंदिरात मारुतीची स्थापना केली. सध्या या मठाचा जीर्णोद्धार झालेला असून मठ पूर्णत: आधुनिक तऱ्हेने उभारलेला दिसतो. मठाचे मुख्य द्वार मात्र पूर्वीचे आहे. श्रींचा पूर्वीचा मुखवटा सोलापूर येथील म्हसकरांच्या वंशजांकडे हस्तांतरीत झाला आहे. मुखवट्याऐवजी श्रींची पंचधातूची वरद हस्त मूर्ती ६ डिसें. १९९६ रोजी मठात स्थापन करण्यात आली आहे. मूळ पादुका मात्र आजही पहायला मिळतात. १९६४ सालापासून राजे रायरायन् मठात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. श्रीमहाराजांच्या काळात उभारलेला हा मठ म्हणजे एक चैतन्यमय चिरंतन स्थान आहे. त्याची व्यवस्था मुंबईचे श्री. दादा निकम पाहतात. श्रीमंत राजेरायरायन यांनी स्थापन केलेल्या या मठात आपणास मनसोक्त पूजा करता येते. मठाच्या विश्वस्त मंडळामार्फत नित्य नेमे असंख्य धार्मिक कार्यक्रम इथे संपन्न होतात. अक्कलकोट मधील एक निवांत स्थळ म्हणून आपण या मठात विश्राम करु शकता. निवासासाठी इथे अल्प दरात खोल्या उपलब्ध आहेत. परिसर रम्य आहे. बेलेनाथ बाबांचे समाधीमंदिर तिथे समोरच असून तेही प्रेक्षणीय आहे.