भाग्यवान कर्जाळकर घराणे
अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थान, ज्याच्या छायेत गेली दीडशे वर्षे करोडो लोकांवर श्रीकृपा झाली आहे, दु:ख संकटांचे, व्याधींचे, आपदांचे निवारण होऊन शेकडो लोकांचे संसार सावरले, तो वटवृक्ष देवस्थानचा परिसर एकेकाळी कर्जाळकर घराण्याची खाजगी मालमत्ता होती. देवकेळी आणि कर्दळीचे बन, वाजूने वहाणारा ओढा, गाईगुरे, हत्ती यांचे आजुबाजूला वावरणारे कळप असा हा रम्य परिसर. धाकट्या वेशीच्या पुढे मुरलीधर मंदिराचे समोर कर्जाळकर, सरदेशमुख, वाकनिस आणि कोतवाल अशा चार ब्राह्मणांच्या वाड्यांपुढील मोकळ्या जागेत वटवृक्ष देवस्थान बनले आहे. वटवृक्षासमोर असलेला खाऱ्या पाण्याचा आड कर्जाळकरांच्या मालकीचा होता. स्वामी महाराजांनी जिथे देह ठेवला ती बाजू व आपल्या रहात्या वास्तुपैकी स्वामींच्या बैठकीचा घरातील महत्त्वाचा भाग वगळता, अन्य जागा कर्जाळकरांनी देवस्थानच्या विस्तार कार्यार्थ दिली. असे हे भाग्यवान कर्जाळकर घराणे. शेजघरालगतच्या बोळातून ही मंडळी हल्ली हल्लीपर्यंत वटवृक्षासमोरील आडाचे पाणी शेंदून वापरत असत. आता हा आड बंद करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक कुलकर्णी. अक्कलकोटजवळील कर्जाळ गावी यांची खूप जमीन होती. त्यामुळे ते कर्जाळकर म्हणून ओळखले जाऊ लागले. मनोहर पंढरीनाथ तथा बाबासाहेब कर्जाळकर हे अक्कलकोट नरेशांचे दिवाण होते. राजघराण्याचा आश्रय आणि श्रींचा वरदहस्त ह्यामुळे हे कुटुंब खरोखरच पुण्यपावन ठरले. यशवंतरावांची पणजी राधाबाई तथा माई सखाराम कर्जाळकर यांचे माहेर करजगीचे. श्रीस्वामीराय करजगीमध्ये जात माहेरी अनुभवलेल्या महाराजांच्या अनेक लीला त्या वर्णन करीत. कर्जाळकरांच्या वाड्यासमोर मोठे तुळशीवृंदावन होते. त्याच्या ओट्यावर महाराज बसायचे. हा भाग देवस्थानला दिल्यावर देवस्थानने तो ओटा पाडून टाकला. कर्जाळकरांची पणजी श्रींच्या उपासनेत होती. तिचा मृत्यू श्रींनी जाणला. ही बाई आता रहात नाही असे श्री म्हणाले आणि साऱ्यांनाच आश्चर्य वाटले कारण पणजीबाई ठणठणीत होत्या पण काही दिवसांनी वाड्याजवळची मोठी भिंत अचानक कोसळली अन् तिच्या खाली दबून पणजीबाईंचा मृत्यू झाला. स्वामी समर्थ महाराजांच्या बावीस वर्षांच्या वटवृक्षाखालील वास्तव्यकाळातील असंख्य घटना वैभवाचे हे कुटुंब साक्षीदार आहे. यशवंत मनोहर कर्जाळकर यांचे बालपण वटवृक्ष देवस्थानात श्रींचे समोर गेले. श्रींचे समोरच त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई १९४६ साली गेल्या. त्यांचेवर स्वामीरायांची कृपा होती. या कर्जाळकरांच्या घरात महाराज अनेकदा येत असत. सकाळच्या वेळी लहान मुलांची पंगत न्याहारीसाठी बसली की श्रीमहाराज तिथे येत अन् मुलांबरोबर जेवायला बसत. कर्जाळकरांचे हे स्वयंपाकघर आपणास आजही पहायला मिळते.