बाळप्पा महाराजांचे श्रीगुरुमंदिर
सुमारे सव्वासात फूट उंचीचा श्रींचा तेज:पुंज आजानुबाहू देह अक्कलकोट येथे तब्बल बावीस वर्षे वावरला. श्रीस्वामी हे मूलब्रह्म असल्याने जड देहाचे आणि पर्यायाने देह बोलीचे, शब्दांचे व्यक्त किंवा अव्यक्ताचे कोणतेही नियम त्यांना लागू पडत नाहीत. सर्व चराचराचा सांभाळ करणारे श्रीस्वामी आयुष्याच्या अखेरीस अक्कलकोट येथे आले आणि तिथेच १८७८ साली त्यांनी नश्वर देहाचा त्याग केला. हे विश्वचैतन्य ११४९ ते १८७८ अशी तब्बल ७२१ वर्षे भारतवर्षातल्या बहुसंख्य क्षेत्री सदेह वावरले. वैदिक हिंदू संस्कृतीस आलेली ग्लानी. अधर्माचे थैमान, भ्रष्ट हिन्दूंचे होत असलेले धिंडवडे, मुसलमानांची जोरजबरदस्ती आणि फिरंगी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालवलेले धर्मांतर रोखून हिन्दु धर्माचे पुनरुत्थान घडविण्यासाठी श्रीस्वामी समर्थ महाराजांनी अवतार धारण केला होता. प्रत्यक्ष परब्रह्माचे ते सगुण साकार रूप होते. मीच राम होतो मीच कृष्ण होतो, दत्तनगर मूळ मूळ वडाचे झाड असे म्हणत हिंदु विरोधी यवनांच्या साम्राज्याला त्यांनी सुरुंग लावला. ब्रिटिश राज्यकर्त्यांचे अत्याचार आणि स्वधर्माचा दुराग्रह त्यांनी हाणून पाडला. परब्रह्माचा हा सगुण अवतार लोक विलक्षणच होता. आमचा वास अखंड विश्वात आहे. सर्व स्थाने आमचीच आहेत. मूर्ती पूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ अशी त्यांची शिकवण होती.
गाणगापूरला दत्तसेवेस राहिलेले बाळप्पा नामक यजुर्वेदी ब्राह्मण, चोळायाचे जावई श्रीपाद भट यांची गाणगापूर येथे गाठभेट होऊन श्रींची कीर्ति ऐकून अक्कलकोटास दर्शनार्थ आले. श्रीपाद भटांनी त्यांना श्रींचे दर्शन घडवून, भोजनादी व्यवस्था लावून समर्थ सेवेस ठेवले. काही दिवसांनी बाळप्पांनी आपली पत्नी भागीरथीस एक कन्या व पुत्रासह अक्कलकोटात आणले. त्यावेळी बाळप्पा महाराजांचे विन्हाड मुरलीधर मंदिरात होते. पुढे वाळप्पांची सेवा श्रीचरणी रुजू होत गेली. वाळप्पांचे चिरंजीव गुरुनाथ हेही श्रींची सेवाभक्ती करीत. श्रींच्या समाधी पश्चात श्रीपाद भटांनी आपली उपवर कन्या काशी ही वाळप्पांचे पुत्र गुरुनाथ यांना दिली पुत्र विवाहानंतर बाळप्पा महाराज सहपरिवार पेठेतील मठामागे रंगनाथ पुजाऱ्याचे घरात राहू लागले. तेथे त्यांच्या अल्पवयीन कनिष्ठ पुत्राचे निधन झाले आणि त्यानंतर पत्नी भागीरथीबाईनीही ईहलोक सोडला. परंतु बाळप्पा महाराजांनी श्रीगुरु सेवेत सदोदित पूजा अनुष्ठानात राहून या दुःखावर मात केली. पुढे त्यांचे जेष्ठ पुत्र गुरुनाथ यांचाही क्षयरोगाने मृत्यू झाला. चाकरी निमित्त ते कुलबर्ग्यास होते. त्यामुळे वाळप्पांची सून व बाळप्पा महाराज पुन्हा दुःखी झाले. पण ते वैराग्य संपन्न होते. पेठेतील मठात ज्ञानेश्वरी, दासबोध ग्रंथांचे वाचन करीत.
श्रीमहाराजांनी वटवृक्षाच्या छायेत देह ठेवला. त्यावेळी, आपल्या या लाडक्या पुत्रवत भक्तास म्हणजेच बाळप्पास जवळ बोलावले. आपल्या कंठातील रुद्राक्ष बाळप्पांच्या गळ्यात बांधून हाती निशाण ठेऊन मस्तकावर वरदहस्त ठेवला. श्रीस्वामी समर्थ अशी नाममुद्रा कोरलेली अंगठी त्यांना देऊन यावच्चंद्रदिवाकरौ आमचा शिक्का आता तू चालव, अशी आज्ञा केली. जपाची माळ, आसन आणि झोळी तात्पूर्वीच दिली होती आणि त्यांचेकडून कठोर तपश्चर्या करवून घेतली होती. देह विसर्जनाच्या वेळेस श्रीमहाराजांनी त्यांचेकडे करुणामय नेत्रकटाक्ष टाकला आणि औदुंबराच्या छायेत बैस असे सांगितले. वाळाप्पा त्यावेळी बुधवार पेठेत रहात होते. त्यानंतर ते चिदानंद वाड्यात राहून सर्व उत्सव करू लागले पुढे ही जागा अपुरी पडू लागली. ही अडचण लक्षात घेऊन, अक्कलकोटचे कारभारी दाजीबा भोसले यांच्या वाड्याजवळील (परसू) मोकळी जागा ८ ऑक्टोबर १९०१ मध्ये संस्थान तर्फे बाळप्पा महाराजांना मठासाठी दान स्वरूपात मिळाली आणि तिथे गुरुमंदिराची निर्मिती झाली. बाळप्पा महाराजांनी अखेरपर्यंत इथेच मुक्काम केला. श्रींच्या कार्याची महती दिगंत केली. १९०१ साली त्यांनी संन्यास घेतला व श्रीब्रह्मानंद स्वामी हे नाम धारण केले. बाळप्पा महाराजांनी हजारो लोकांवर कृपा कोली. त्यांना स्वामी महाराजांच्या शिकवणीची दीक्षा दिली. पुढे ही गादी गंगाधर महाराजांचे हाती सोपवून १९१० साली ते समर्थ चरणी लीन झाले.
गंगाधर महाराजांनंतरही परंपरा १९४४ साली गजानन महाराजांचे हाती आली, श्रुतिंचे पुनरुज्जीवन करण्याची प्रतिज्ञा करून गजानन महाराजांनी शिवपुरी येथे १९६९ साली महासोमयाग केला. अग्निहोत्राची महती वाढवली. ६ डिसेंबर १९८७ साली गजानन महाराज श्रीचरणी विलीन झाले. पूज्य बाळप्पा महाराज यांची समाधी गुरुमंदिरातील गर्भगृहात श्रींच्या पादुकांखाली असून त्यांचे उत्तराधिकारी श्रीगंगाधर महाराज यांची समाधी गर्भगृहाबाहेर उजव्या बाजूस आहे. डाव्या बाजूस श्रीस्वामी समर्थ महाराजांची शेज (पलंग) असून त्यावरील देव्हाऱ्यात स्वामींचे सेवेकरी भुजंगा भालके (शिपाई) यांना श्रीस्वामींनी दिलेल्या लाकडी खडावा ठेवल्या आहेत. शेजेच्या पुढे असलेल्या काचेच्या पेटीतील चांदीचे आवरण असलेल्या पादुका, माहिम मुंबई येथील डॉ. ब्रह्मानंद माविन कुर्वे यांच्या आजोवांस श्रीमहाराजांनी दिल्या होत्या. त्यांच्या कुटुंबियांकडून पादुकांची पूजाअर्चा होत नसल्यामुळे १९७८ साली महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथीस या पादुका माविनकुर्वे यांनी गजानन महाराजांकडे सुपूर्द केल्या आणि हे कुटुंब पुढे नाशिक येथे स्थलांतरीत झाले. गुरुमंदिर हे स्वामींच्या पट्टशिष्याने उभारलेले आपल्या गुरूंचे स्मारक आहे. येथे दुपारी प्रसाद मिळतो. गुरुमंदिराची इमारत टोलेजंग असून अत्यंत प्रसन्न अशी ही वास्तू. श्रींच्या काळातील औदुंबर आजही तिथे असून त्याच्या छायेत अवश्य बसावे… बाळकृष्णभट ग्रामजोशींचे नातू, बापू श्रीनिवास हे पंच्याहत्तरी ओलांडलेले गृहस्थ, बाळप्पा महाराजांच्या गुरुमंदिराची व्यवस्था पहातात.