पटवर्धनांचा स्वयंभू गणेश – एकवीस गणपती मंदिर
१७६३च्या राक्षसभुवनच्या लढाईनंतर निजामाकडून व्यांऐशी लाखांचा सरंजाम घेऊन तह करण्यात आला. त्यापैकी पटवर्धनांचा सरंजाम हा हरि गोविंद यांचे नावे होऊन मिरज – सांगली – तासगाव – जमखिंडी आणि कुरुंदवाड असे सुभे निर्माण झाले. यापैकी चिंतामण अप्पासाहेब पटवर्धन हे १९३० साली गादीवर आले. १९७५ पर्यंत त्यांची कारकीर्द होती. हे पटवर्धन घराणे मूळचे कोकणातले. गणपती हे त्यांचे आराध्य दैवत. या गणपतीच्या कृपेने हे पटवर्धन घराणे पेशवाईच्या काळात विशेष गाजले. जिथे जातील तिथे त्यांनी गणेशाची मंदिरे उभारली. महाराष्ट्र आणि कर्नाटकात या पटवर्धनांनी उभारलेली असंख्य गणेश मंदिरे आजही पहायला मिळतात. गणेशाच्या कृपेने हरभट बाबा पटवर्धनांचे घराणे वैभव संपन्न बनले. अनेक पुरुष महापराक्रमी ठरले. कुरुंदवाड संस्थानिक पटवर्धनांच्या अखत्यारीत असलेल्या परिसरात, त्यांनी अशी एकवीस गणपती मंदिरे बांधली आहेत. पटवर्धनांचे सहाव्या पिढीचे वंशज युवराज हे पुण्यनगरीस रहातात. या पटवर्धनांचा मोठा संगमरवरी राजवाडा बेळगाव जवळील वडगाव माधवपूर येथे आहे. राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरही मोठा संगमरवरी गणपती असून तिथे मुजरा करून मगच आत प्रवेश केला जातो.
याच पटवर्धनांचे एक स्वयंभू गणेश मंदिर अक्कलकोट येथे मुरलीधर मंदिराकडून फत्तेसिंह चौकाकडे जाताना पहिल्याच डाव्या हाताच्या गल्लीतील कुंभार आळीत, कुंभार मठाच्या मागे आहे. श्रीमहाराज अक्कलकोटला आले त्याच्या आधी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली आहे. अक्कलकोटकरांचा हा मानाचा गणपती असून, तो एकवीस गणपती या नावे ओळखला जातो. लग्न मुंज आदि मंगलकार्याची अक्षत प्रथम याच गणरायांपुढे ठेवली जाते. पटवर्धनांच्या गणपती मंदिरात श्रीस्वामी महाराज बसले होते, असा उल्लेख चरित्रांमधून येतो तेच हे गणपती मंदिर.
कुरुंदवाड संस्थानकडून या गणेशाला वार्षिक मानधनाची तरतूद आहे. त्यातूनच येथील पुजाऱ्याला त्याकाळी दहा रुपये वेतन देण्यात येई. या मंदिराच्या मागे एक विहीर असून त्या विहिरीतच ही गणपतीची मूर्ती सापडली. मूर्ती कोरीव असली तरी अवचित हाती आली म्हणून पटवर्धन त्याला स्वयंभू मानतात. १६६५ साली या मंदिराची स्थापना झाली. हे मंदिर बाहेरून राहाते घर असल्यासारखे दिसते. मंदिराच्या बाहेर लहानसे मारुती मंदिर आहे. श्रीमहाराज अनेकदा या मंदिरात येत असत. गुरुलीलामृताच्या अडतीसाव्या अध्यायात या घराण्याची हकीगत येते. यांचे खापरपणजोबा विनभट ग्रामोपाध्ये यांना इथले पुजारीपण त्यांच्या मामांकडून मिळाले. ग्रामोपाध्ये यांची सहावी पिढी सध्या कार्यरत आहे.
गणपती मंदिराच्या अवतीभवती मोकळी जागा आहे. तिथे श्रींच्या मूर्ती बनवण्याचे काम चालते. इथले एक खास वैशिष्ट्ये म्हणजे, फार पूर्वीपासून इथे प्रत्येक गणेश चतुर्थीला श्रींच्या पार्थिव मूर्ती बनवून त्याची पूजा करण्याची व दुसऱ्या दिवशी त्यांचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. अनेक जण इच्छापूर्तीसाठी इथे नवस बोलतात. अडीअडचण, नोकरी धंद्याचा प्रश्न, विवाह, प्रापंचिक समस्या, अपत्य प्राप्ती यासाठी गणरायांना साकडे घातले जाते. त्याच्या परिपूर्तीसाठी गणेशचतुर्थीच्या दिवशी श्रीगणपतीच्या २१ पार्थिव प्रतिमा करून त्यांचे विधीवत पूजन केले जाते. आजवर शेकडो लोकांच्या मनोकामना या गणरायांनी पूर्ण केल्या आहेत.
याच गणेशमंदिरात, रहिमतपूरचे सरदार विश्वासराव माने यांचेवर श्रींनी कृपा केली. विश्वासराव तथा अप्पासाहेब रामराव माने हे अक्कलकोटच्या राजेसाहेबांचे मानकरी होते. रहिमतपुरात त्यांचा तीन चौकी वाडा होता. राज्यकारभारासंबंधात त्यांची अक्कलकोटी ये-जा असायची. मेहेनताना म्हणून राजघराण्याकडून त्यांना प्रतिमहा रोकड मिळत असे. सुरुवातीला अप्पासाहेब अक्कलकोटास पटवर्धनांच्या या गणेश मंदिरातच मुक्कामास असत. त्यावेळी बाबासाहेब गुर्जर या मराठा मानकऱ्याकडे ते सेवेकरी होते. त्यावेळी अचानक त्यांना विषम ज्वराने घेरले. समर्थांच्या नित्य दर्शनाचा नेम चुकला. अशक्तपणामुळे ते बेशुध्द पडले. अत्यवस्थ झाले तरीही त्यांच्या ध्यानी मनी समर्थांचे चरण होते. त्यांचे दर्शनाची आस इतकी विलक्षण होती की भक्त वत्सल स्वामीराय अप्पासाहेबांचा धावा ऐकून मंदिरात हजर झाले. अप्पासाहेबांचे शरीरावरून तीन वेळा आपला पाय फिरवला आणि काहीवेळ तिथे बसून निघून गेले. दुसऱ्या दिवसापासून दुखण्यास आराम पडून ते बरे झाले. आपल्या घराण्याचा उत्कर्ष व्हावा यासाठी मानेंनी श्रींची खूप सेवा केली. उपवर तरुण मुलगी तान्हीबाई हिच्या विवाहाची त्यांना चिंता होती. त्यावर तिच्यासाठी खंड्या नेमला आहे, असे महाराजांनी सांगितले. त्याप्रमाणे तिचा विवाह बडोद्याच्या खंडेराव गायकवाडांशी झाला आणि अप्पासाहेबांची कन्या जमुनाबाई ही बडोद्याची महाराणी झाली. वंशपरंपरेने, श्रीकृपेने आम्हास श्रीमंतपण बहाल झाले असे अप्पासाहेव सर्वांना सांगत असत. महाराजांनी अप्पासाहेबांना पापाण पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. त्या रहिमतपूर येथे आपल्या गावी नेऊन तिथे छोटेसे मंदिर बांधून त्याच्या पूजेअर्चेतच त्यांनी देह ठेवला. पटवर्धनांच्या या गणपती मंदिरात श्रींनी अशा अनेक लीला केल्या. आजही भक्तांच्या हाकेला श्रीगणरायांबरोबर स्वामी समर्थ महाराज धावून येत असल्याची कित्येक उदाहरणे इथले पुजारी सांगतात.