नागनाथ मंदिर/ जोगी विहीर

अक्कलकोट येथे ॐ कार परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराजांनी उणीपुरी बावीस वर्षे वास्तव्य केले. ते एका ठिकाणी ठाण मांडून कधीच बसले नाहीत उलट त्यांच्या पायाला सतत भिंगरी लागलेली असायची. संपूर्ण अवकलकोट परिसरात त्यांचा नित्य संचार असायचा मग कधी राजवाडा तर कधी महारवरती कधी दर्ग्यात तर कधी देवळात कुणाच्या वाड्यात किंवा मळ्यात. कोणतेही क्षेत्र त्यांना निषिद्ध नसायचे. अवकलकोटच्या डवरे गल्लीत जोगी विहीर आहे. एके काळची ही जलदायिनी आता केरकचऱ्याने भरलेली आहे. ढासळली आहे. या जोगी विहिरीजवळ पुरातन असे नागनाथ मंदिर आहे. नाथसंप्रदायी नागनाथांपैकी वटसिध्द नागनाथांची, नागेश सांप्रदायिक अनेक स्थाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. वडवाळ नागनाथ किंवा वटसिध्द नागनाथ यांच्याशी संबंधित असे हे शिवस्थान आहे. येथील गर्भगृहातील शिव, अन्य प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण असून श्रीगणेशाची उभी मूर्ती आपले चित्त आकर्षित करते. शुभ्र संगमरवरी तेजस्वी असा हा उभा गणपती हेच या मंदिराचे खास आकर्षण आहे.

वटवृक्ष देवस्थानच्या उत्तर दरवाजातून बाहेर उजवीकडे सरदेशमुखांचा वाडा लागतो. या वाड्याकडून खाली जाणारा रस्ता थेट जोगी विहीर व नागनाथ मंदिराजवळ जातो. श्रीस्वामी महाराज डबरे गल्लीतील या नागनाथ मंदिराच्या कट्ट्यावर अनेकदा येऊन बसत. मंदिराच्या समोर उजवीकडे मारुती मंदिर असून इथे बाळीनाथ या नावाने ओळखली जाणारी एक छोटीशी समाधी आहे. मूळच्या दोड्याळ गावच्या जहागिरदार कुलकर्ण्यांना भोसले संस्थानने इथे उपाध्ये म्हणून नेमले. मूळ पुरुष अनंत तुको कुलकर्णी यांना हुन्नर रोडवर थडगे पट्टी म्हणून जो भाग आहे. ती जमीन मंदिराच्या दिवाबत्तीसाठी व कुटुंबाच्या चरितार्थासाठी म्हणून दिली गेली. व्यंकटेश आणि चिरंजीव नरसिंह हे ब्राह्मण, पहलवान म्हणून फारच लोकप्रिय आहेत. जोगी विहीरीत सापडलेली महाकाय दगडी मारुतीची अजस्त्र मूर्ती या ब्राह्मण पहेलवानाने एकट्याने उचलून आणली होती. सातारा जिल्ह्यातील वाल्हे गावचे हे मूळ घराणे तुको कुलकर्णी व त्यांच्या मागील पिढीच्या वंशजांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले होते. श्रींच्या आशीर्वादानेच पुढे अनंत तुकोजींना दड्याळचे कुलकर्णी पद व पुढे संस्थानकडून वडवाळ नागनाथांचे वंशपरंपरा उपाध्येपण प्राप्त झाले. यांच्या घरासमोरच त्यांच्या पूर्वजांच्या दोन समाधी असून त्या अत्यंत जागृत आहेत असे आसपासचे ग्रामस्थ सांगतात. नरसिंह व्यंकटेश कुलकर्णी हे सातव्या पिढीचे वंशज सध्या मंदिरातील पूजाअर्चा व व्यवस्थापन पहातात.

महाराजांच्या अद्भुत लीलांच्या मूक साक्षीदार असलेल्या असंख्य विहीरी अक्कलकोटात आजही तग धरून आहेत. एकेकाळी या विहीरींच्या पाण्याचा उपसा घरगुती व शेतीकरता मोठ्या प्रमाणावर होत असे. त्यामुळे त्याचे पाणी शुध्द व स्वच्छ असे. पुढे घरोघर नळ आले आणि ग्रामस्थांनी विहीरींचा वापर कमी केला आणि कालांतराने तिथे कुणी फिरकत नाहीसे झाले. एकेकाळच्या जीवनदायिनी असलेल्या या महाकाय विहीरी ओस पडल्या. त्यातले पाणी सडू लागले.

शिवाय केरकचरा प्लॅस्टिक पिशव्या, नारळाच्या किशा आणि नको असलेले सामान फेकण्यासाठी त्यांचा सर्रास वापर केला जाऊन तिथे बजबजपुरी झाली आहे.

धाकट्या वेशीसमोरील नवी विहीर, रामचंद्राचा जलकूप, जोगी विहीर ह्या उध्दवस्त झालेल्या दिसतात. जोगी विहीर ही एकेकाळी अगदी समृध्द पाण्याने तुडुंब भरलेली असायची. नागनाथ मंदिरासमोरील ओवरीत विश्राम करून अनेक संन्यासी, तापसी फकीर या विहीरीच्या आश्रयाने रहात असत. अनेक योगी या परिसरात वास्तव्य करून श्रींची उपासना करीत. योगीचे अपभ्रंश जोगी झाले. कालांतराने योग्यांचा वावर आणि जोगी विहीरीचा वापर बंद झाल्यामुळे ती ओस पडली आहे. (जोगी विहिरीचे रंगीत छायाचित्र पान नंबर ५ वर दिले आहे. )