नवा राजवाडा – मिस मॉक्सन हाऊस
मालोजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांचे चार वर्षांचे अज्ञान पुत्र शहाजीराजे तिसरे हे अक्कलकोटचे राजे झाले. १८९६ साली ते निवर्तले. त्यानंतर फत्तेसिंह तिसरे हे अक्कलकोट नरेश म्हणून घोषित झाले. हे महापराक्रमी होते. पहिल्या महायुध्दाचे वेळी ब्रिटिशांनी भारतीयांच्या मदतीची याचना केली त्यावेळी अक्कलकोटचे श्रीमंत फत्तेसिंह महाराज तिसरे यांनी आपले सहकार्य जाहीर करून ते स्वत: सैन्यात दाखल झाले. ब्रिटीशांतर्फे जर्मनीविरुद्ध लढताना विदेशी भूमीवर त्यांनी अभूतपूर्व पराक्रम गाजवला. मराठ्यांचे शौर्य पुन्हा एकदा प्रत्ययास आणून दिले. इंग्रजी सैन्यातील कॅप्टन ही पदवी प्राप्त करणारे ते पहिले भारतीय होते. ब्रिटीश साम्राज्याला अशा कर्तबगार शिपायामुळे, न भूतो न भविष्यती असा विजय १९१८ साली संपलेल्या पहिल्या महायुध्दात मिळाला. त्यामुळे वरिष्ठ ब्रिटीश नेत्यांनी फत्तेसिंह महाराजांना इंग्लंड येथे पाचारण करून इंग्लंडच्या राजदरबारात त्यांचा मोठा सन्मान केला. अन्य ठिकाणीही त्यांचे सत्कार झाले. इंग्लंड येथील मुक्कामात ते इंग्रज वरिष्ठांबरोबर शिकारीला जात तेथेही त्यांनी आपले कौशल्य दाखवलेच. परदेशी शिल्पकलेचा बारकाईने अभ्यास करून फत्तेसिंह महाराजांनी एस. टी. स्टँडपासून पाच मिनिटांवर शहराच्या पश्चिमेस सात मजली अष्टकोनी नवीन राजवाडा बांधला. ही वास्तू अतिभव्य असली तरी ती दक्षिणमुखी असल्याने, शनिवारवाड्याप्रमाणेच दुर्दैवी ठरली. राजघराण्यास ती अजिबात फलदायी ठरली नाही.
स्त्रिया पराक्रमी पुरुषांना वरतात. सौंदर्य हे स्त्रियांचे भूषण तर पराक्रम हे पुरुषाचे सौंदर्य असे सुभाषित आपल्याकडे प्रचलित आहे. त्याची अनेक उदाहरणे आपण इतिहासात वाचतो परंतु एक विदेशी महिला हिन्दू पुरुषाच्या प्रेमात पडून सर्व संगपरित्याग करून त्याच्याबरोबर येते आणि सर्वांना आपलेसे करून अखेरीस याच मातीत मिसळून जाते. याचे जाज्वल्य उदाहरण अक्कलकोट येथे पहायला मिळते. त्या साध्वीचे नाव होते मिस मॉक्सन.
फत्तेसिंह राजेसाहेबांचे शिकारीतील कौशल्य, त्यांचा निडरपणा, चापल्य आणि करडेपणा यावर मिस मॉक्सन नावाची एक देखणी इंग्रज तरुणी बेहद्द खुश झाली. त्यांच्या प्रेमात पडून त्यांचेबरोबर हिन्दुस्थानात येण्याचा मनोदय तिने व्यक्त केला. फत्तेसिंह महाराजांनी आपण विवाहीत असल्याचे सांगून तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. आपल्या मायभूमीस कायमचा रामराम ठोकून ती भारतात, अक्कलकोट येथे आली. राजेसाहेबांबरोबर अक्कलकोटास आलेली ही विदेशी तरुणी बघता बघता सर्वांत मिसळून गेली. प्रथम थोडे तर्क वितर्क झाले परंतु मिस मॉक्सनने साक्षात राणीसाहेबांशी म्हणजेच स्वतःच्या सवतीशीच असे काही सूत जमवले की त्यामुळे ती सर्वांच्याच आदरास व प्रेमास पात्र ठरली. पुढे कधीही तिने आपल्या मायदेशाचे नावही घेतले नाही इतकी ती या छोट्याशा संस्थानात समरस होऊन गेली.
तिच्या सद्शील सोज्वळ वागण्यामुळे फत्तेसिंह महाराजांचेही तिच्यावर महाराणीइतकेच प्रेम होते. ती फत्तेसिंह महाराजांच्या दोन्ही मुलांचा अभ्यास घ्यायची. स्वतःच्या पोटची मुले मानून त्यांची मातेप्रमाणे देखभाल करायची. त्यामुळे मुले तिला ‘मम्मी’ म्हणत. त्यांचे लालनपालन आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मॉक्सनने समर्थपणे पार पाडली. फत्तेसिंह महाराजांनी आपल्या नवीन राजवाड्याबाहेरच तिला रहाण्यासाठी एक प्रशस्त बंगला बांधून दिला. तिच्या सेवेस अनेक चाकर नेमले. मिस मॉक्सन उभे आयुष्य अक्कलकोट येथे व्यतीत करून इथेच मरण पावली. हे कथानक आपणास नवीन वाटेल. कोणत्याही चरित्र ग्रंथात याची नोंद नाही. कारण ते अलिकडचे आहे. फत्तेसिंह महाराजांच्या पराक्रमाची गाथा सर्वश्रुतच आहे. नव्या राजवाड्यातील त्यांनी उभारलेले भव्यदिव्यय शस्त्रालय हे त्यांचे चिरंतन स्मारकच आहे. परंतु नवीन राजवाड्याच्या समोरचे मिस मॉकसन हाऊस हे एका विदेशी तरुणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून पहायला विसरू नये. अर्थात् हा बंगला संस्थानिकांच्या दुर्लक्षामुळे, इतर वास्तुंप्रमाणेच मोडकळीस आली आहे. या बंगल्यात महाविद्यालयाचे वर्ग भरत असत. बंगल्याच्या मागच्या बाजूस असलेल्या एका बंद खोलीवर मिस मॉक्सन हाऊस असा फलक आजही नजरेस पडतो. त्या खोलीत तिच्या सर्व चीज वस्तू जतन करून ठेवल्या आहेत.
घोड्याची समाधी नव्हे… इंग्रज साहेवाची कबर
इंग्रजी भाषेचा गंध नसलेल्या भावड्या ग्रामस्थांना कोनशिलेवरील मजकुराचे आकलन न झाल्यामुळे त्यावरील बोड्याकडे पाहून ही घोड्याची समाधी असल्याचा गैरसमज करून घेतला. परंतु ही समाधी घोड्याची नसून घोडदळाच्या मुख्य ब्रिटीश अधिकाऱ्याची ती कवर आहे, हे त्यावरील संगमरवरी कोनशीलेवरील मजकूर वाचल्यानंतर ध्यानात आले. १८३० सालचे हे बांधकाम एका इंग्रजी सैनिकाचे हे स्मृतिस्मारक आहे. अक्कलकोट संस्थानच्या इतिहासाचा मागोवा घेतला असता कॅप्टन एडमंड स्पॅरो याची नोंद सापडते. अवकलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजी राजे (पहिले) हे १८२२ साली गादीवर आले आणि केवळ सहा वर्षांच्या कारकीर्दीनंतर १८२८ साली ते अल्पवयातच मृत्यू पावले. त्यानंतर त्यांचे पुत्र अज्ञान शहाजी (दुसरे) हे वयाच्या आठव्या वर्षी अवकलकोटचे राजे झाले. त्यावेळी संस्थानचा कारभार सातारच्या राजातर्फे पाहिला जाई. अशातच १८२९ साली येथे रयतेचे
(Image-on Right Side)
बंड झाले. कारण राजा अज्ञान आणि सातारचे राजे प्रतापसिंह ‘मोसले सरकार उंटावरून शेळ्या हाकल्याप्रमाणे कार्यरत होते. परिणामी कर्तबगार, प्रजाहित दक्ष राजाच्या अभावामुळे अक्कलकोटची जनता त्रस्त झाली, मूलभूत सोईसुविधा, संरक्षण, अशांती, कारभाऱ्यांची दहशत अशा अनेक कारणांमुळे अवकलकोटच्या रयतेने असहकाराचे धोरण स्वीकारीत संस्थानच्या विरोधात बंड पुकारले. यावेळी ब्रिटीश राजवट संपूर्ण भारतात आपला मोठा अंमल गाजवीत होती. हे बंड मोडून काढण्यासाठी, ‘दि बॉम्बे लाईट कॅवेलरी’ ही इंग्रजी सैन्यातील घोडदळाची तुकडी अक्कलकोटात तैनात असावी. रयतेशी दोन हात करताना सदराहू तुकडीचे कॅप्टन श्री एडमंड स्पैरो, बंडखोरांणी मुकाबला करताना त्यांचा बळी गेला हे कोनशीलेवर कोरलेल्या मजकुरावरून स्पष्ट होते. परकीयांवर बळजबरीने सत्ता गाजवणाऱ्या काफर इंग्रजांना आपला एक सैनिक गमवावा लागला. त्यामुळे संतापाने बंडखोरांचा उल्लेख त्यांनी एनिमी म्हणजे शत्रू असा केलेला दिसतो. हे कॅप्टन साहब ज्या कॅवेलरी म्हणजे घोडदळात तैनात होते, त्याचे प्रतीक म्हणून स्मारकावर घोड्याचे चिन्ह कोरले. गोऱ्या साहेबाचे हे थडगे अक्कलकोटची जनता घोड्याची समाधी म्हणून भजत आहे.