नवसाच्या मारुतीसमोरील नवी विहीर
वटवृक्षाच्या मागच्या बाजूस, मुख्य रस्त्यालगत मुरलीधर मंदिराच्या समोर वीररूपात उभे असलेले हनुमंत नवसाचा मारुती म्हणून प्रसिध्द आहेत. या मारुतीच्या कठड्यावर श्रीमहाराज अनेकदा विश्रांती घेत. ह्या मारुती मंदिरासमोरील ओवरीच्या मध्यभागी असलेला बंद दरवाजा उघडलात की समोर हिरव्यागार पोपटी रंगाच्या पाण्याची लांबलचक चिरेबंदी विहीर आपल्या दृष्टीस पडेल. तीच नवी विहीर होय. ही नवी विहीर आपणास सहजासहजी दिसणार नाही. लगतच्या दुकानांमुळे ती दडून गेली आहे. अनेक वर्षांचा कचरा, घाण, प्लॅस्टिक पिशव्या बाटल्या यांनी खचाखच भरली आहे. वर्षानुवर्षे उपसा नसल्यामुळे याचे पाणी नासून हिरवट झाले आहे. पंधरावीस पायऱ्या उतरून खाली जाता येते. श्रीमहाराजांच्या अक्ककोट येथील बावीस वर्षांच्या वास्तव्यकाळात, हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातून येणारे लोक, याच विहीरीवर हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन वटवृक्षाकडे जात असत. महाराजांच्या काळात सतत वापरात असलेली, हजारो लोकांचे पदप्रक्षालन करणारी ही विहीर. अक्कलकोटमधील अनेक विहीरींचे वर्णन आपण वाचत आहात, त्या विहीरी पुरातन आहेत. त्यांच्या मानाने ही विहीर अलिकडच्या काळात खोदली गेली असल्यामुळे तिला नवी विहीर असे संबोधण्यात येते. तिचा आकारही आयताकृती आहे. धाकट्या वेशीकडून वटवृक्ष देवस्थानकडे जाताना समोरच ही विहिर आहे.
श्रीस्वामी महाराजांची अक्कलकोटमधील जी विश्रांती स्थळे होती त्यापैकी नवी विहीर आणि नवसाच्या मारुतीचा ओटा ही वटवृक्ष देवस्थान लगतची स्थाने होत. एकदा असेच श्रीमहाराज या विहीरीच्या कठड्यावर बसले होते. अन्य सेवेकरीही महाराजांच्या सोबत होतेच. चेष्टा विनोद चर्चा सुरु असता, अचानक एक ब्राह्मण स्त्री तिथे आली. पोटशूळाच्या व्याधीने आपण त्रस्त असून आपण यावर उपाय द्यावा असे म्हणत ती श्रींचरणांचे दर्शन घेऊन तिथेच बसली. वातावरण गंभीर झाले. श्रीमहाराजांनी तिला सांगितले की, तू गंगाभागिरथी झालीस म्हणजे तुझी पोटदुखी जाईल. याचा अर्थ तू विधवा झालीस की तुझी ही व्याधी निवारण होईल. पंचमहाभूतांवर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रींची वाणी खरी ठरली. काशीयात्रेसाठी गेलेले त्या स्त्रीचे पती तिथेच निधन पावले आणि ते गेल्याची वार्ता कळताच त्या स्त्रिचा पोटशूळ पळाला तो कायमचाच.
कर्नाटकातील श्रीधर नावाचा एक देशस्थ ब्राह्मण ह्याच व्याधीने जर्जर होता. व्याधी निवारणासाठी अनेक तीर्थे हिंडत तो गाणगापुरास आला. इथे भीमा अमरजा संगमावर श्रीदत्तप्रभूंची आराधना सुरु केली. त्याचा भोग सरत आला. साक्षात् भगवान दत्तात्रेयांनी त्यास यतिरूपात दर्शन आणि श्रीपुरीच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर म्हणजे तुझा पोटशूळ शमेल, असे सांगून आशीर्वाद दिले. सकाळी उठून ब्राह्मण स्नानसंध्या करून, श्रीपुरी या शब्दाचा अर्थ विराचत हिंडला पण कुणाकडूनही उलगडा झाला नाही. निराश होऊन रात्री झोपी गेला. त्यावेळी श्रीदत्तमहाराजांनी पुन्हा दृष्टांत देऊन सांगितले की, तू अक्कलकोटास जा. तिथे श्रीस्वामी समर्थ परमहंसांची भेट घे. ते तुला श्रीपुरीचा वृक्ष दाखवतील. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून श्रीधराने अक्कलकोटची वाट धरली. धाकट्या वेशीकडून अक्कलकोट गावात प्रवेश करता. नव्या विहीरीसमोरील मारुतीच्या कट्यावर बसलेले श्रीमहाराज त्यास दिधले. त्यांचे ते तेजस्वी रूप, लखलखीत देहकांती आणि भेदक डोळे. दत्तप्रभूंनी सांगितलेले अक्कलकोटचे परमहंस ते हेच ओळखून त्याने श्रीचरणी लोळण घेतली. व्याधीने त्रस्त झालेल्या ब्राह्मणाची समस्या अंतज्ञार्नानाने जाणून श्रीमहाराज गरजले… अरे, कडुनिंबाच्या झाडाला श्रीपुरी म्हणतात. त्याच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ आणि सैंधव घालून ते मिश्रण तीन दिवस घे म्हणजे तुझी व्याधी जाईल. महाराजांच्या आज्ञेनुसार हा उपचार करताच तीन दिवसात रोगमुक्त होऊन श्रींचा जयजयकार करीत श्रीधर आपल्या गावी निघून गेला. श्रींचे दोन्ही पाय दोरखंडाने बांधून फरफटत नेणाऱ्या गोविंदाची कथा, भंडारखान्यांच्या जलकूपाजवळ घडली. हा वेडा गोविंदा त्यानंतर काही दिवसांनी नव्या विहीरीत पाणी पिण्यासाठी उतरला असता पाय घसरून पडला आणि तुडुंब भरलेल्या त्या विहीरीत बुडून मृत्यू पावला. अशा असंख्य प्रसंगांची लीलांची साक्षीदार असलेली ही विहीर. गाळ न काढल्यामुळे, साफसफाई न केल्यामुळे बकाल झाली आहे. अक्कलकोटमधील या महाकाय विहीरी पाण्याचा उपसा न झाल्यामुळे अस्वच्छ व दूषित झाल्या आहेत. उजनी धरणाचे पाणी मिळत नाही म्हणून सरकारच्या नावाने कंठशोष करणाऱ्या अक्कलकोटच्या नागरिकांनी या विहीरींची साफसफाई करून त्यांचा वापर सुरु केला पाहिजे. श्रींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वापींचे पावित्र्य राखले गेले पाहिजे.