धाकट्या वेशीजवळील श्रीमुरलीधर मंदिर
अक्कलकोटच्या धाकट्या वेशी जवळ भोसले संस्थानिकांचे हे कृष्ण मंदिर. अगदी अलिकडच्या काळापर्यंत ते राजघराण्याकडेच होते. या मुरलीधर मंदिराला एकेकाळी मोठी धर्मशाळा होती. श्री. जयसिंह राजे भोसले १९६५ साली निवर्तले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती मृदुलाराजे साहेब यांनी हे मोडकळीस आलेले मंदिर धर्मशाळेच्या परिसरासहित १९८५ साली वटवृक्ष देवस्थानला दान केले. त्यानंतर देवस्थान ट्रस्टने परिसराचा जीर्णोध्दार करून परगावहून येणाऱ्या भाविकांच्या निवास व भोजनाची सोय या मंदिरात केली आहे. श्रींचे हे अत्यंत आवडते असे विश्रांतीस्थान, वटवृक्ष मंदिराच्या मागच्या वाजूस अगदी मुख्य रस्त्यावर आहे. आपण अक्कलकोटला गेल्यावर या देवस्थानात निवासासाठी राहू शकता. इथले वातावरण अगदी घरगुती स्वरुपाचे असून अक्कलकोट मधील श्रींची स्थाने इथून अगदी जवळ आहेत. मंदिराच्या मुख्यद्वारातून प्रवेश करता समोरच श्रीमुरलीधराचा प्रशस्त सभामंडप लागतो.
तुळशीवृंदावन असलेल्या सभामंडपातून गर्भगृहाकडे गेल्यावर, भगवान श्रीकृष्णांची मुरलीधर स्वरुपातील देखणी संगमरवरी मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. ही मूर्ती प्राचीन आहे. सभामंडपाच्या पुढे व दोन्ही बाजूस धर्मशाळेची सुसज्ज अशी एक मजली इमारत आहे.
श्रींच्या दर्शनास अक्कलकोट येथे येणारे स्वामीसुत महाराज याच मुरलीधर मंदिरात मुक्कामास असत. मंदिराच्या मागच्या बाजूस एका औदुंबराखाली एका छोट्याशा देवळीत श्रीमहाराजांच्या पादुका स्थापन करून तिथेच श्रीसमर्थांचे भजन कीर्तन करीत. ते ऐकण्यासाठी अनेक मंडळी येत असत. एक दिवस असेच श्रीस्वामीसुत श्रींच्या भजनात रंगून गेले होते. दीड दोन तासाचा हा सत्संग श्रींच्या नामगजराने संपला. मुरलीधराचे दर्शन घेऊन ग्रामस्थ मंडळी मंदिराबाहेर पडतात न पडतात तोच मोठा आवाज झाला अन् मोडकळीस आलेल्या छताचा मोठा भाग कोसळून पडला. पण सुदैवाने कुणीही तिथे नसल्यामुळे कुणास इजा झाली नाही. उपस्थित भाविकांनी श्रीस्वामी सुतांची योग्यता यावेळी जाणली. श्रींचा त्यांचेवर असलेला वरदहस्त सर्वांच्या प्रत्ययास आला. एकदा असेच श्रीमहाराज या मुरलीधर मंदिरातील पलंगावर पहुडले होते. एवढ्यात कानफाट्या दोन शिष्यांना बरोबर घेऊन घोड्यावरून तिथे आला. अंगावर उंची वस्त्रे असलेल्या या आडदांड कानफाट्याने आपल्याजवळील एक तांबडी बनात श्रीमहाराजांच्या अंगावर घातली. त्याच्या या करणीचा अर्थ क्षणार्धात ध्यानी येऊन श्रींनी, काय रे मादरचोद. चेटूक करतोस असे कडाडत ती बनात स्वतःचे पायाखाली टाकली. श्रीमहाराजांची ब्रह्मस्थिती पाहून, अतर्साक्षीत्व पाहून तो श्रींना शरण गेला. बरोबरच्या शिष्यांना वाटेला लावून पुढे एकनिष्ठपणे श्रींच्या सेवेत राहिला.
देह ठेवण्यापूर्वी पंधरा दिवस आधी, श्रीमहाराज तात्या सुभेदारांच्या परसात लवंडले. त्यांना ज्वर भरला होता. रांड पटकीने मला ढकलले असे म्हणत चालू लागले. सेवेकऱ्यांनी त्यांना मुरलीधर मंदिरात आणले. महाराजांनी एक दिवस तिथे विश्रांती घेतली आणि थोडा आराम पडताच ते बाहेर पडले.
श्रीमंत भोसले राजघराण्याने स्थापन केलेल्या अक्कलकोट येथील अनेक मंदिरांपैका मुरलीधर मंदिर हे अत्यंत पुरातन आहे. या मंदिरातील धर्मशाळेची नोंद श्रीस्वामीचरित्रात वारंवार येते. अक्कलकोटमध्ये वावरणाऱ्या धनलोभी सेवेकऱ्यांना स्वामीसुतांबद्दल वैषम्य वाटायचे. त्यामुळे आपले पूजाअर्चा सेवाकार्य झाल्यावर श्रीस्वामीसुत महाराज हे मुरलीधर मंदिरातच उपासनेसाठी बसत असत.
एकदा रात्री साडेनऊच्या सुमारास श्रीमहाराज मंदिराच्या उजव्या हातास असलेल्या साखरबावडीच्या दिशेने एक चिंचेचे झाड होते. त्याला कट्टा होता आणि तिथे पलंगावर महाराज पहुडले होते. मुंबईतील द्वारकानाथ अप्पाजी वकील सहकुटुंब तिथे आले आणि श्रीमहाराजांची पाद्यपूजा आरती करून कापराच्या वड्या लावून त्यांनी मोठी रोषणाई सुरु केली. श्रीमहाराज ते पाहून उठून उभे राहिले. “बेटा, तू माँगने को आया है । हमारा हनुमान अँधेरे में बैठा है । उसके तरफ तू देखता भी नहीं ।” असे म्हणून श्रीमहाराजांनी मुरलीधर मंदिराच्या दिशेने अंगुलीनिर्देश केला. समर्थांनी आपली मनोकामना अचूक ओळखली याचे वकील साहेबांना कौतुक वाटले. परंतु महाराजांच्या उर्वरीत विधानाचा अर्थ न समजल्यामुळे ते गोंधळून गेले. त्यावर महाराज एकदम प्रसन्न मुखाने प्रेमाने त्यास म्हणाले, “अरे, सामने मुरलीधर के मंदिर में हमारा हनुमान बैठा है, उसके तरफ देख…” हे ऐकताच भुजंगा शिपाई लगबगीने मुरलीधर मंदिरात गेले. तिथे अंधारात स्वामीसुत महाराज औदुंबराखाली ध्यानस्थ बसलेले त्यांनी पाहिले. ते पाहून ते परत आले आणि वकील साहेबांस म्हणाले, “मुरलीधर मंदिरात श्रीस्वामीसुत महाराज वसले आहेत त्यांच्यापुढे रोषणाई करा. त्यांना प्रकाशात आणलेत की, श्रीमहाराज तुमच्यावर कृपा करतील. “
वकील साहेव हे ऐकून लगोलग मुरलीधर मंदिरात गेले. त्यांनी स्वामीसुतांपुढे दिव्यांची आरास मांडून मोठा दीपोत्सव केला. पुढे श्रींनीही त्यांच्या मनोकामना सिद्धीस नेल्या. श्रीस्वामी महाराजांची लाडकी गाय भागीरथी गंगा हिचा विद्यमान वंश तिथेच नांदत होता. आता तो भक्त निवासच्या मागे असून भागीरथीची समाधी बुधवार पेठेत समाधी मठाच्या बाजूस आहे. श्री बाळप्पा महाराज अक्कलकोटात आल्यानंतर प्रारंभीच्या काळात या मुरलीधर मंदिरातच बिऱ्हाडस होते.
पुढे सुंदराबाईंच्या मर्जीने ते श्रीसेवेत आले आणि श्रींजवळ राहू लागले. या मुरलीधर मंदिरात मुरलीधराची वापी होती. त्याच्या काठी औदुंबराखाली श्रीस्वामी सुतांनी स्थापन केलेल्या, स्वामी महाराजांच्या पादुका, व गणपती गेली सव्वाशे वर्षे तिथे विराजमान आहेत. तिथे पूर्वी धर्मशाळा होती. श्रींच्या दर्शनास आलेल्या परगावच्या लोकांचे ते विश्रामधाम होते.