तीर्थक्षेत्र अक्कलकोट

गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर या महान तीर्थक्षेत्रांचे केंद्रबिंदू ठरलेले अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्याच्या आग्नेय दिशेस असलेले एकेकाळचे संस्थान. माळशिरस तालुक्यातील सहा गावे, खटाव तालुक्यातील कुलेगावसहीत सात गावे आणि सोलापूर जिल्ह्यातील १०२ खेडी ही अक्कलकोट संस्थानात अंतर्भूत होती. इंग्रज सरकारने सोलापूरच्या कलेक्टर साहेबांना अक्कलकोट संस्थानच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिटिकल एजन्ट म्हणून नेमले होते. ४९८ चौरस मैलांचे क्षेत्रफळ असलेल्या या भागात तेरा चौरस मैल इतके मोठे जंगल होते. संस्थानच्या उत्तरेला निजामाचे राज्य. पूर्वेला पटवर्धनांची जहागिर व निजामी राज्य, दक्षिणेस इंडी तालुका आणि पश्चिमेला सोलापूर तालुका अशा अक्कलकोट संस्थानच्या सीमा होत्या. दिवाण, मुख्य न्यायाधीश, मामलेदार, महालकरी, चिफ मेडिकल ऑफिसर, पोलीस इन्स्पेक्टर, वॉटर वर्क्स इंजिनियर, सरकारी शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षणाधिकारी असे अनेक अंमलदार या संस्थानात पूर्वीपासून होते. संस्थानाधिपतींना दिवाणी, फौजदारी व मुलकी असे पूर्ण अधिकार होते. तसेच एकेचाळिस शिवबंदीचे शिपाई (अलिगोल) आणि नक्त पगारी पोलिस ठेवण्याचा अधिकार होता. समुद्र सपाटीपासून बाराशे फूट उंच असलेल्या वृक्षरहीत सपाट मैदानातील काही भागात भीमा व सीमा या दोन नद्या असून, बोरी नदी इथे भीमेला मिळते. पुढे याच नदीची एक शाखा उगम पावते. तिला हरणी म्हणतात. एक भला मोठा तलाव व महाकाय अशा अनेक विहिरी इथे पूर्वापार होत्या. येथील जंगलात पूर्वी साग, चंदन आणि बाभळीची झाडे होती. कोल्हे, लांडगे, काळवीट व हरणांसारखे प्राणी एकेकाळी इथे सर्रास वावरत असत. मराठा, ब्राह्मण, वाणी, लिंगायत, पांचाळ व हरिजन या जातीतील हिंदू आणि उर्वरीत मुस्लिम वस्ती. पूर्वी इथे कानडी आणि मराठी या दोनच भाषा बोलल्या जात. गुजराती मारवाडी व इतर जमातींचे लोक पुढे व्यापाराच्या निमित्ताने इथे स्थिरावले. ज्वारी, मिर्ची, विड्याची पाने इ. प्रकारची शेती होते. लुगडी, खण, पागोटे, खादी यांच्या हातमागाचा धंदा जोरदार होता.