जुन्या राजवाड्यातील स्वामीलीला
मराठी वैभवाला शोभेल असा अवकलकोटचा हा जुना राजवाडा. बाहेरून मोठ्या डौलात उभा असला तरी आतून पूर्णपणे मोडकळीस आला आहे. अतिभव्य बुरुज आणि टोलेजंग उंच तटबंदी असलेल्या या एकेकाळच्या दिमाखदार राजवाड्यास आठ फूट उंचीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हत्तीच्या टक्करीनेदेखील फुटणार नाही अशा पध्दतीने लोखंड व खिळ्यांच्या वापराने ते भक्कम बनवले आहे. राजवाड्यासमोर अगदी रुंद प्रशस्त अशा चिरेबंदी दगडी पायऱ्या आहेत. त्या चढून गेल्यावर हे मुख्य महाद्वार लागते. आता ओसाड पडलेल्या या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर सशस्त्र सुरक्षा रक्षकांचा कडक पहारा असे. सामान्य माणसास, पहाताच धडकी बसेल अशा पाजळत्या नग्न तलवारी घेतलेल्या पहारेकऱ्यांचा ताफा खडा असे. राजवाड्याच्या समोरच उजव्या हातास या पहारेकऱ्यांसाठी एक विशाल चौकी होती. ती चौकी आता पूर्णपणे ढासळली आहे. अक्कलकोटचे श्रीमंत मालोजीराजे आणि त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाई हे स्वामी महाराजांचे जीवश्च कंठश्च होते. दिवाळी, दसरा वा अन्य सणावारी श्रींना राजवाड्यात पाचारण करून त्यांची यथासांग पाद्यपूजा करून त्यांच्यासाठी खास बनवलेल्या सिंहासनावर बसवून मोठ्या थाटात समारंभ सोहळा साजरा करीत.
एके सायंकाळी स्वामी महाराज या चौकीत बसले होते. त्यावेळी राजाचे मॅजिस्ट्रेट श्री. बरजोरजी माणिकजी हे आपल्या रहात्या बंगल्यापासून घोडा पिटीत मोठ्या थाटात राजवाड्याकडे येताना श्रींनी पाहिले आणि त्यांनी रुद्रावतार धारण केला. कारभारी दाजीबा भोसलेच्या मनमानी जुलमास प्रजा कंटाळून गेली होती आणि त्यांना या मॅजिस्ट्रेट साहेबाची फूस होती. त्यामुळे श्रीमहाराज संतापले. एका शिपायाच्या कमरेचा मोठा सोटा हिसकावून घेतला आणि माणिकजींवर उगारीत महाराज गरजले… ‘चोरांनो पुढे गेलात तर डोके फोडीन… माता गमनी लुच्चे हरामखोर… माझी पारं जाळलीस पोळलीस’ श्रीमहाराजांचे रौद्ररूप पाहून मॅजिस्ट्रेटने तिथून काढता पाय घेतला. पण बडतर्फ… अशी श्रीमुखातून बरसलेली ब्रह्मवाणी, निसुटती कानावर पडली आणि त्याच्या काळजात धस्स झाले. त्यानंतर थोड्याच दिवसात इंग्रजांनी संस्थानवर जप्ती आणली. मालोजी राजे पदच्युत झाले. मॅजिस्ट्रेट साहेब व श्रीनिवास रामचंद्र अटकेच्या भितीने परागंदा झाले. दाजीबा भोसलेंना कैद झाली.
एकदा सकाळच्या प्रहरी श्रीमहाराज राजवाड्यातील देवघराजवळील झोपाळ्यावर येऊन बसले. राजपुरोहित अप्पा सलबते देवासमोर बसून मोठ्या सहाणीवर चंदन उगाळीत होते. मालोजीराजांना श्रींच्या आगमनाची वर्दी मिळताच तेही येऊन महाराजांच्या चरणाशी बसले. तेवढ्यात एक चिमुकला उंदीर देवघरात आला अन् निराजंनातील तुपाची वात तोंडात पकडून पळू लागला. अप्पांच्या हे लक्षात येताच रागाच्या भरात त्यांनी हातातील चंदनाचे खोड त्याच्या दिशेने फेकले आणि उंदीरमामा गतप्राण झाले. त्याची शेपटी पकडून मोठ्या विजयी मुद्रेने अप्पा त्यास बाहेर फेकण्यास निघाले. दयाघन स्वामीरायांनी अप्पास हाक मारून त्या मेलेल्या उंदरास आपल्याकडे मागून घेतले. झोपाळ्याच्या कड्यांतून इकडून तिकडे तिकडून इकडे असे थोडा वेळ फिरवून स्वत: च्या तळहातावर घेतले. मृत उंदीर आता हळुहळू हालचाल करू लागला. वच्चा जाओ… असे म्हणून महाराजांनी त्यास खाली ठेवताच टुणटुण उड्या टाकीत तो बिळाच्या दिशेने निघून गेला. चमत्कार पाहून उपस्थित मंडळी अवाक् झाली. पुजारी अप्पा सलवते ओशाळले. मुक्या प्राण्यांवर दया करण्याचा मंत्र श्रींनी त्यादिवशी सर्वांनाच या कृतीने दाखवून दिला. राजवाड्याच्या डाव्या बाजूच्या बुरुजाजवळ महाराज नेहमी वसत. कारण तिथून शेखनूर दर्गा नजरेच्या टप्यात येतो. असेच एकदा श्रीमहाराज राजवाड्यात मुक्कामास असताना, दुपारच्या वेळी सुंदराबाई त्यांना भोजन भरवीत होत्या. पण जेवता जेवता महाराज काही काळ स्तब्ध झाले. कारण, एक गौळण महाराजांकरिता दही घेऊन परगावहून निघाली होती. पण अक्कलकोटी पोहोचण्यास उशीर होईल, तोवर महाराजांचे भोजन झाले असेल, म्हणून रस्त्यातच रडत बसली होती. अंतर्साक्षी स्वामी महाराज जेवता जेवताच स्तब्ध झाले, ते तिच्यासमोर प्रकट झाले. आण ते दही इकडे, म्हणून लगबगीने तिच्या मटक्यातील सर्व दही त्यांनी फस्त केले आणि इकडे सुंदराबाईच्या समोर वाहवा, दह्याची तर शावास आहे असे म्हणत नाचू लागले. उपस्थित सारेच जण चकित झाले. कारण त्यादिवशी नैवेद्यामध्ये दही किंवा दह्याचा कोणताही पदार्थ नव्हता. संध्याकाळी ती गवळण अक्कलकोटात पोहोचली, तिने झाला प्रकार सांगितला तेव्हा श्रीमहाराजांच्या दह्याची शाबास ह्या उद्गारांचा अर्थ उलगडला.
असेच एकदा स्वामी महाराजांनी राजवाड्यात असताना हुजऱ्याच्या हातातील पानसुपारीचा चौफुला काढून घेतला आणि मालोजी राजेंकडे पहात म्हणाले, कायरे कुंभारा… हा चौफुला फेकून देऊ काय? महाराज चौफुला आपलाच आहे असे राजेसाहेब म्हणाले, त्यासरशी महाराजांनी तो समोरील विहिरीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी महाराजांनी शिपायाकडून एक दोरखंड घेऊन तो विहिरीत सोडला व काही वेळाने वर खेचताच चौफुला दोरीबरोबर वर आला. त्यावेळी राजवाड्यात उपस्थित असलेल्या मंडळींनी एकच जयजयकार केला. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे होते. कारण रात्रभर पाण्यात राहून चौफुल्यातील बदाम, काथ, लवंग, वेलची हे सारे पदार्थ सुखे खडखडीत होते. श्रीमहाराजांच्या अशा अनंत लीला या राजवाड्याने अनुभवल्या आहेत. असेच एकदा श्रीस्वामींची मुंवीपुरीतील मुख्य गादी म्हणजेच कांदेवाडीचा मठ सांभाळणारे हरिभाऊ तावडे तथा स्वामीसुत अक्कलकोट येथे आले. महाराज राजवाड्यात असल्यामुळे त्यांना दर्शन घडले नाही. शिवाय महाराज राजवाड्यात असले की सुंदराबाई, शिऊबाई, काशीबाई यांसारख्या महिला सेवेकऱ्यांखेरीज पुरुष सेवेकऱ्यांना तिथे प्रवेश नसे. राजवाड्याबाहेर थांबलेल्या दर्शनार्थीना महाराज, राजवाड्यातील गणेशद्वारावरील गच्चीतून दर्शन देत. नेमकी खूण किंवा नावगाव सांगून एखाद्यास आत देखील बोलावून घेत आणि त्याच्यावर कृपा करीत.
श्रीमहाराजांचे दर्शन घडल्याशिवाय अन्नग्रहण करायचे नाही असे ठरवून स्वामीसुत नामस्मरण करीत, चार दिवस निराहार बसले पण आता त्यांचा जीव श्रींच्या मुखदर्शनासाठी कासावीस झाला. त्यामुळे हाती वीणा घेऊन, राजवाड्यातील गणेशद्वारासमोर उभे राहून ते श्रींना साकडे घालू लागले… माझी माता तुमचे घरी, म्हणूनी आलो मी हो द्वारी, आम्हा नको तुमचे काही, स्वामीचरण दावा वाई… हा प्रेमळ अभंग ऐकून राणीसाहेबांसकट सारेच भारावून गेले. स्वामी सुतांना मोठ्या प्रेमाने राजवाड्यात पाचारण करून त्यांची व स्वामी राजांची भेट करवून दिली.
दत्तभक्त मालोजी राजे गाणगापूर येथे गुरु प्रतिपदेच्या उत्सवास प्रतिवर्षी जात असत. श्रीस्वामीरायांच्या आगमनानंतर एकेवर्षी ते गाणगापूरास गेले असता श्रीनरसिंह सरस्वतींनी त्यांना दृष्टांत दिला आणि मी तुझ्या गावी मुक्कामी असताना तू इथे कशाला येतोस? असे फटकारले. त्यावेळी मालोजींना स्वामीरायांचे स्मरण झाले आणि त्यानंतर गुरुप्रतिपदेचा उत्सव ते अक्कलकोट येथे करू लागले. मालोजी राजांनी मोठ्या भक्तिभावाने श्रीमहाराजांकडून त्यांच्या पादुका मागून घेतल्या आणि राजवाड्यातील प्रशस्त देवघरात एक स्वतंत्र शिसवी देव्हारा करवून त्यात ठेवल्या. सध्या त्या पादुका चांदीच्या पेटीत ठेवल्या असून सहजासहजी म्हणून त्यांचे दर्शन घडत नाही. श्रीमहाराज राजवाड्यात प्रवेश करताना राजवाड्याच्या आठ फूट उंच द्वारावरील श्रीगणरायांना हस्तस्पर्ष करून मेरा गण्या असे राजवाड्यात जात असत. आज राजवाड्यात प्रवेश करता येत नसला तरी, बाहेरून दिसणारे हे गणेशद्वार, श्रीमहाराज जिथे उभे राहून भक्तांना दर्शन देत ती गणेशद्वारावरील गच्ची, मॅजिस्ट्रेटवर सोटा उगारण्याचा प्रसंग घडला ती पहारेकऱ्यांची चौकी यांचे आपणास दर्शन घडते. उंदीरमामांना चंदनाचे खोड भिरकावून मारणाऱ्या अप्पा सलबते यांचेच वंशजांकडे राजवाड्यातील देवघरातील पूजाअर्चा वंशपरंपरेने आजही चालत आली आहे.