जुन्या राजवाड्याजवळील भंडारखाना – जलकूप आड- त्रिमुखी दत्तमंदिर
जुन्या राजवाड्याचे दर्शन घेऊन डाव्या बाजूला वळलात की तिथे असलेल्या घरांच्या मागे भोसले संस्थानिकांचा एकेकाळी हजारो लोकांची क्षुधा तृप्त करणारा भंडारखाना उजाड स्थितीत पडलेला दिसतो. दर गुरुवारी इथे मोठ्या प्रमाणावर पाकसिध्दी होऊन अक्कलकोटच्या गोरगरीब व अतिथी अभ्यागलतास प्रसाद भोजन दिले जायचे. साक्षात् अन्नपूर्णाच त्याकाळी इथे नांदत होती. इथे येऊन कोणीही साधू फकीराने जे अन्नपदार्थ मागितले ते रांधून खाऊ घालण्याचा वसा राजघराण्याने घेतला होता. मागाल तो खाद्य पदार्थ इथे मिळत असल्यामुळे यात्रेकरू पांथस्थ तसेच साधूसज्जनांची इथे चंगळ होती. इथे राजघराण्याचे छोटेखानी त्रिमुखी दत्तमंदिर आहे. त्याच्या समोरच आवळ तोंडाचा पण खूप खोल असा जलकूप होता. याला कठडा नसल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणामुळे आता तो बुजवून टाकला आहे. सुसज्ज अशा भंडारखान्यातील अन्नपदार्थ याच आडाच्या निर्मळ जळातून तयार केले जात.
भंडारखान्यातील या आडालगत श्रीमहाराज एका पलंगावर एकदा पहुडले होते. सेवेकरी पेंगुळले होते. मध्यान्हीची वेळ होती. एवढ्यात गोविंदा नावाचा एक माथेफिरु तिथे आला. त्याचे हातात एक मोठा दोरखंड होता. त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक त्याने क्षणार्धात हातातील दोरखंडाचे एक टोक स्वत:च्या मानेभोवती आवळले अन् दुसऱ्या टोकाने पलंगावर वामकुक्षीसाठी निजलेल्या श्रीमहाराजांचे दोन्ही पाय करकचून बांधले आणि खेचायला सुरुवात केली. त्याच्या स्वत:च्या गळ्याला त्रास होत होता पण त्याची शुध्द त्या वेड्याला होती कुठे? श्रीमहाराजांना फरफटत घेऊन चालला होता. महाराज शांत होते. एवढ्यात सुंदराबाईंचे तिथे लक्ष गेले. तिने आरडाओरड केला, त्यामुळे आजुबाजूचे गोसावी बैरागी धावून आले. त्यांनी गोविंदाला पकडले आणि श्रीमहाराजांची सुटका केली. या प्रकाराने सारेच संतापले. गोविंदाला मारु लागले परंतु महाराजांनी त्यास सोडवले. तो वेडा असल्यामुंळे तसा वागला असे सांगून त्यास क्षमा केली. कारण श्रीमहाराज त्याचे भविष्य जाणून होते. यानंतर काही काळातच हा गोविंदा नवसाच्या मारुती समोरील नव्या विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला असता पाय घसरून पडला आणि बुडून मेला. अजाणतेपणी झालेल्या अपराधाची शिक्षा त्यास मिळालीच. भंडारखाना दत्तमंदिरासमोर झाडाखाली दगडधोंडे रचलेल्या भागात हा आड आता दडवला गेला आहे. याच भंडारखान्याजवळ संस्थानिकांचे त्रिमुखी दत्तमंदिर आहे. यातील संगमरवरी दत्तमूर्ती चित्त प्रसन्न करते. आळंदीच्या नृसिंह सरस्वतींची मुळात वैराग्य संपन्न व श्रेष्ठ असलेल्या नृसिंह सरस्वती स्वामींना, समाधी सुखाची अनुभूती देऊन त्यांना पूर्ण कृपांकित केले..