जुना डाकबंगला
आनंद मळ्याच्या पलीकडे आजही सुस्थितीत असलेली एक प्राचीन वास्तु असून तिला डाकबंगला म्हणतात. ब्रिटिश अधिकारी किंवा अवकलकोट संस्थानमध्ये येणारे देशीविदेशी अतिथी यांचेसाठी असलेले हे विश्रामगृह श्रीमहाराजांच्या कारकीर्दीत, अक्कलकोट संस्थानच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी बंबगार्डन साहेबाची नियुक्ती इंग्रज सरकारतर्फे करण्यात आली होती. त्याचे वास्तव्य ह्या डाकबंगल्यात असे. करड्या शिस्तीचा हा अधिकारी. बंगल्यासमोरील रानातून अनवाणी फिरता एकदा त्याच्या पायाला गोम डसली. असंख्य वेदना होऊन दंश झालेला भाग काळानिळा पडला. अनेक उपचार केले. त्याची ही व्याधी श्रीमहाराजांनी एका दिवसात घालवली. खासबागेतल्या बावडीवर तोंड धुवत असलेल्या कोंडू नानांना या बंबगार्डनने लाथा मारल्या होत्या. खराब पाणी विहिरीत जात होते त्याविषयी ही शिक्षा होती. कोंडुनानांना विहीरीच्या थोडे लांब जाऊन तोंड धुवा असे सांगता आले असते. परंतु या उर्मट माणसाने वयोवृद्ध कोंडूनानांना लाथाबुक्क्यांनी मारले ही गोष्ट श्रींच्या जीवाला लागली होती. नेमक्या त्याच पायाला गोम चावली आणि तीन वर्षे बंबगार्डन साहेब यामुळे त्रस्त होता. जखमेला लेप लावावा ह्या श्रींनी सांगितलेल्या उपायाने पाय बरा झाला.
याच बंवगार्डन साहेवाने एक वानरी पाळली होती. पुढे तिला काय झाले कुणास ठाऊक तिचे वर्तन बिघडले आणि ही सर्वांना छळू लागली. खंडोबा मंदिराच्या मागे शिपाई तिला पकडून ठार मारण्याच्या तयारी होते. महाराजांनी तिला भुजंगामार्फत बोलावणे पाठवले. ती खवळलेली वानरी क्षणार्धात शांत झाली आणि श्री महाराजांच्या चरणी आली. त्यानंतर बहुत काळ ती श्रीमहाराजांच्या आसपास होती. श्रीमहाराज तिच्या डोक्यावर स्वत:ची टोपी घालत, कधी फुलांच्या माळा घालून स्वहस्ते मिठाई भरवत. लोक तिला सुंदरी म्हणू लागले. एके दिवशी सुंदरीने श्रींचे चरणी मस्तक ठेवले आणि ती पंचतत्त्वात विलीन झाली. असंख्य भक्त मंडळींच्या उपस्थितीत तिची शवयात्रा गुलाल बुक्क्याची उधळण होत खंडोबा मंदिरापर्यंत वाजत गाजत आली आणि खंडोबा मंदिरासमोरील घोड्याच्या समाधीजवळ तिला समाधी देण्यात आली.