खोडवे तथा भुईगल्लीतील कासेगावकर वाडा

श्री. नामदेव बापूराव कासेगावकर (१९०५ – १९९९) हे अक्कलकोटमधील नि:स्पृह निर्मोही संतपुरुष. बेलेनाथ बाबा आणि बाबा महाराज आर्वीकर चांचा सहवास लाभलेले भगवतभक्त गृहस्थाश्रमी. पंढरपूर सांगोला रोडवरील कासेगाव हे त्यांचे मूळ गाव. बालपणी मातृछत्र हरपले त्यामुळे माचणूर लगतच्या ब्रह्मपुरी गावी आजोळी महामुनी कुटुंबात ते वाढले. सोलापूर येथे हरिभाई देवकर प्रशालेत जुनी मॅट्रिक पास झाले आणि १९३६ साली अक्कलकोट येथे मामलेदार कचेरीत (जिथे घाणादेवीचे स्थान आहे तिथे ही कचेरी होती) नोकरीस लागले. घरात विठ्ठलभक्तीची परंपरा. आजी आजोबा वारकरी. त्यांची एक आत्या भागीरथीबाई ही अक्कलकोटास सोनारांकडे दिली होती. खोडवे गल्लीत या सोनारांचा वाडा होता. आत्याबाईला मूलबाळ नव्हते. दुसरी एक आत्याही अखेरच्या काळात अकेकलकोट येथे येऊन राहिली. दोन बायकांच इथे रहात होत्या. अशात नोकरी निमित्त अक्कलकोटात आलेल्या भाचा नामदेव याला आत्याबाईंनी स्वतःच्या घरी ठेऊन घेतले. कालांतराने त्याला दत्तक घेऊन वाड्यासहित सर्व इस्टेट त्याचे नावे करून दिली. त्यामुळे खोडवे गल्लीतील सोनारवाडा कासेगावकरांचा वाडा म्हणून ओळखला जाऊ लागला.

१९३६ साली नामदेवरावांची अक्कल हुपारी, प्रामाणिकपणा आणि गोड लाघवी स्वभाव ओळखून श्रीमंत विजयसिंह आणि जयसिंह महाराज यांच्या मातोश्री तारामाता राणीसाहेब यांनी त्यांना खाजगी कारभारी म्हणून राजवाड्यात नियुक्त केले. १९३६ ते १९७५ पर्यंत चाळीस वर्षे राजवाड्यात इमाने जवळून एतबारे नोकरी केली. राजवाड्यातील सोन्या चांदीचे खनिजे, शेकडो चांदीची ताटे वाट्या लोट्या, रत्नजडित सिंहासन, दागदागिने हे सर्व वैभव पाहिले-हाताळले. राजवाड्यातील प्रत्येक समारंभ, मंगलकार्य, धार्मिक विधी याची जबाबदारी त्यांचेवर होती. घरी चार मुले पत्नी आत्याबाई अशी खाणारी तोंडे अधिक आणि मिळवता मात्र एकच. पण निस्पृह नामदेवरावांनी राजवाड्यातील सुतळीच्या तोड्यालाही कधी स्पर्श केला नाही.

त्यांना सर्वजण ‘देवा’ असे म्हणत. ते देवतुल्यच होते. तारामाता राणीसाहेबांच्या पश्चात त्यांनी विजयसिंह आणि जयसिंह महाराज यांची सावलीसारखी साथ दिली. दोन्ही राजांसोबत शिकारीसाठी, समारंभांसाठी, राजकारभारात, सदैव साथ संगत केली. राजांना नेमबाजीचा शोक होता. नामदेवराव हवेत नाणे फेकीत आणि राजेसाहेव पिस्तुलाच्या नेम धरून ते टिपीत. अशी तांब्याची असंख्य जुनी नाणी त्यांच्या संग्रही आहेत तसेच काही समारंभाची, मंगलकार्याची निमंत्रणे, राजघराण्याकडून त्यांना वेळोवेळी मिळालेली प्रशस्तीपत्रके त्यांच्या संग्रही आहेत..

कासेगावकरांच्या वाड्यात विठ्ठल रुख्मिणीचे मंदिर असून १९५० पासून गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर संपन्न होतो. भजन कीर्तन, प्रवचन, धर्मग्रंथांचे पारायण यामुळे तो सदैव हरिभक्तीत रंगलेला असतो. बाबा महाराज आर्वीकरांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारचे भजन (शनिवार क्लबची) स्थापना केली. नामस्मरण, भजन पूजन करीत अखेरपर्यंत त्यांनी भोसले घराण्याची सेवा केली. नामदेवरावांचे सुपुत्र कन्या व त्यांची नातवंडे ही ईशपरायण आहेत.