काशीच्या बहिरेशास्त्रींच्या मुलास जीवनादान देणारा हर्डीकर वाडा

यावत् प्रकाशते भानू… तावत विजयी भव असा आशीर्वाद देणारी पूर्वीची विप्र मंडळी ही खऱ्या अर्थाने ब्रह्म जाणणारी होती. त्यामुळे त्यांची भविष्यवाणी आणि त्यांचा आशीर्वाद खरा ठरत असे. मैंदर्गी दुधनी मार्गावरील कुरुंदवाडकर पटवर्धनांच्या गणपतीचे पुजारी नारायण भट हर्डीकर हे अशाच प्रकारचे वैदिक होते. ज्यांचे आचार विचारांचा कित्ता पुढे अनेक पिढ्यांनी गिरवला. कोकणातील हर्डी गावचे हे हर्डीकर, गणपतीच्या पूजेअर्चेसाठी मैंदर्गी येथे नियुक्त झाले. त्यांचे मैंदर्गी येथे रहाते घर व शेती होती. यांचे चिरंजीव भाऊ भट व नातू वामन यांनी अक्कलकोट येथे मेन रोडवर फत्तेसिंह चौकात वाडा बांधला आणि मैदर्गीहून हे घराणे अक्कलकोटला स्थायिक झाले. वटवृक्ष देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर फत्तेसिंह चौक ओलांडल्यावर लगेचच डावीकडे हा हर्डीकरांचा वाडा असून, श्री महाराजांच्या असंख्य लीलांचा तो मूक साक्षीदार आहे.

 

काशीच्या बहिंरेशास्त्रींच्या मृत मुलास याच वाड्यात श्रींनी नवसंजीवन दिले. श्रींची किर्ती ऐकून बहिरेशास्त्री काशीसारख्या महाक्षेत्राहून मजल दरमजल करीत अक्कलकोटास आले. या नवख्या गावात नारायणभटजी हर्डीकरांची व त्यांची गाठभेट घडली अन् ते हर्डीकरांच्या वाड्यात अतिथी म्हणून बहिरेशास्त्रींना उतार वयात झालेला मुलगा अल्पायु होता. तो सत्पुरुषाच्या दर्शन आशीर्वादानेच आयुष्यमान होईल. असे काशीच्या एका सत्पुरुषाने त्यास सांगितले आणि कलियुगात असा महात्मा महाराष्ट्रातील अक्कलकोट प्रांतात सगुण रूपात सांप्रत वावरतो आहे. त्यांचे दर्शन घ्यावे, फलप्राप्ती होईल. म्हणून बहिरेशास्त्री मुलास सोबत गेऊन प्रज्ञापुरीस दाखल झाले. मुलाचा काळ जवळ आला होता. त्यामुळे स्नानसंध्या उरकून बहिरेशास्त्री श्रींचे दर्शनास गेले आणि श्रीगुरुचरित्र पारायणास बसले व मुलाची मृत्यूची घटिका भरत आली तो मूर्च्छित होऊन जमिनीवर कोसळला. श्रीस्वामीराय अंतर्साक्षी होते. त्यांनी काळे तीळ साखरेत घालून बाळाच्या मुखात घालावयास सांगितले आणि तसे करताच काही क्षणात जादूची कांडी फिरावी तसा मुलगा उठून बसला. आपल्या आयुष्यमान झालेल्या मुलास श्रीचरणी घालून मोठ्या आनंदाने बहिरेशास्त्री काशीस निघून गेले. ह्या प्रसंगाचा साक्षीदार असलेल्या हर्डीकरांच्या वाड्यात श्रींच्या लाकडी खडावा आहेत. पणजी रमाबाई ह्या श्रींच्या मोठ्या भक्त होत्या. वटवृक्ष देवस्थानचे सध्या विश्वस्त कार्यालय आहे. त्या खोल्यांचे बांधकाम रमाबाई वामन हर्डीकर यांनी त्याकाळी करून दिले. राजांतर्फे जेवण, ब्राह्मण भोजन वा समाराधनेची तयारी आणि शेकडो लोकांचा स्वयंपाक या खोल्यातून रांधला जायचा. अक्कलकोट स्टेशनजवळील जेऊर येथे त्यांची पूर्वापार शेती आहे. पूजापाठ व भिक्षुकीवर उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब. मैंदर्गीच्या गणपतीची पूजा आजही या घराण्याकडे असून गेली दीडशे वर्षे ते अक्कलकोटात स्थाईक आहेत.