उपलपांचे विठ्ठल मंदिर

तेलगू मातृभाषिक रावबहाद्दूर विठ्ठल टिकाजी उपलप यांनी बांधलेले हे विठ्ठलमंदिर अक्कलकोटात प्रसिध्द आहे. उपलपांचे घराणे विठ्ठलभक्त. विठ्ठल टिकाजी हे उच्चशिक्षीत होते. विद्वत्तेच्या जोरावर ते मामलेदार झाले. श्रींच्या कृपेने ८ नोव्हेंबर १८८४ रोजी अक्कलकोटचे कारभारी झाले आणि १८९६ मध्ये संस्थानचे अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्त झाले. यांनी संस्थानात बऱ्याच सुधारणा केल्या. प्रेमळ स्वभाव आणि साधी रहाणी असलेल्या उपलपांनी अक्कलकोटच्या जनतेची मनापासून सेवा केली. पाण्याचे नळ, धर्मशाळा, विद्याशाला राजमंदिरे बांधली. गुरुलीलामृतांच्या एकूण पन्नासाव्या अध्यायात यांची माहिती येते. विठ्ठल टिकाजी यांचे ज्येष्ठ बंधू एकदा अक्कलकोटला स्वामी दर्शनार्थ आले होते. श्रींचा मुक्काम तेव्हा पटवर्धनांच्या गणेश मंदिरात होता. श्रींच्या चरणी नतमस्तक झाल्यावर श्रींनी त्यांना साक्षात विठ्ठल रुपात दर्शना दिले आणि स्वत:च्या कंठातील पुणहार पिराजींच्या गळ्यात घालून त्यांचा बहुमान केला. याच घराण्याने १८९९ नंतर हे विठ्ठल मंदिर बांधले. मंदिराच्या खर्चा करता त्याकाळी सहा हजाराची रक्कम ठेऊन त्यातून पूजाअर्चा दिवाबत्तीसाठी नेमणूक केली. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे विठ्ठल रुक्मिणी बरोबर राईची मूर्तीही प्रतिष्ठापीत आहे.