आझाद गल्लीतील हाक्याचा मारुती
अक्कलकोटच्या आझाद गल्लीत गुरुमंदिरापासून जवळच असलेले ध्यानगुहेसह असलेले हे चारशे वर्षांपूर्वीचे हक्याचे मारुती मंदिर. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी यांनी त्याची स्थापना केली. तिथे समर्थांची कुबडी, चिपळ्या अणि खडावा आहेत. लोभस मानवी चेहऱ्याचा हा हक्याचा वीररूप उभा मारुती, नवसाला पावतो अशी सर्वांची श्रध्दा आहे. श्रींच्या सांगण्यावरून बाळप्पा महाराजांनी इथे तब्बल १२ वर्षे अनुष्ठान केले होते. या काळात वाहेरच्या चिंचेच्या झाडावरील पिशाच्चाचा त्रास श्रींनी बाळप्पांचे आसनास चारी बाजूंनी दिग्बंधन करून बंद केला. हे मंदिर अतिशय जागृत आहे. ह्या ध्यान गुहेसमोर (ब्रह्मगुहा) श्रीस्वामी महाराज व बाळप्पा महाराजांच्या पादुका आहेत. बाळप्पा महाराज या अनुष्ठान काळात मुरलीधर मंदिराजवळील मानकऱ्यांच्या म्हणजेच रामाचार्य जमखिंडीकरांच्या वाड्यात मुक्कामास होते. चोळप्पा, श्रीपादभट, सुंदराबाई आणि अन्य सेवेकरी बाळप्पांचा द्वेष करीत. या त्रासाला कंटाळून अक्कलकोट सोडून निघालेल्या बाळप्पा महाराजांना सेवेतुन मुक्त करून स्वामींनी या मंदिरात अनुष्ठानास बसवले व जपाचा हिशेब असू दे असे बजावले. एक तपाचे अनुष्टान झाल्यावर बाळप्पा महाराज खऱ्या अर्थाने तत्पुरुष झाले. याकाळात त्यांची दाढी व मिशा खूप वाढल्या होत्या. त्याकाळातले त्यांचे एक छायाचित्र उपलब्ध आहे.