श्रींच्या कारकीर्दीतील जोशी मठ
मुरलीमंदिराजवळच्या टिळक गल्लीतील नाईक चाळीजवळ किंवा जुन्या राजवाड्याजवळील शहाजी हायस्कूलच्या समोरील गल्लीत असलेला हा मठ. या जोशी मठाची स्थापना श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या उपस्थितीत झाली. अक्कलकोटातील प्रमुख उत्सवात जेव्हा श्रींची पालखी निघते ती थोड्यावेळ या मठात थांबून मगच पुढे जाते. गुरुमंदिर न्यासातर्फे नुकताच या मठाचा त्याचा जीर्णोध्दार झाला आहे. अक्कलकोट संस्थान राज ज्योतिषींचे दत्तकपुत्र संगमेश्वरचे श्री गणेश उर्फ गणपतराव जोशी. त्यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत एक प्राचीन औदुंबर आणि एक आड होता. या औदुंबराच्या कट्ट्यावर स्वामी महाराज नेहमी येऊन बसत. गोपाळराव भिडे, मिरजकर आणि स्वत: गणपतराव जोशी यांचे मनात, घराच्या उत्तरेस असलेल्या पडीक जागेत औदुंबर वृक्षाखाली स्वामींच्या पादुका स्थापन कराव्या असा विचार झाला. परंतु हे तिघेही पडले गृहस्थाश्रमी बांधकामासाठी लागणारा पैसा कुठून आणणार यावर, हवेली बांधून पादुकांची स्थापना कर… अल्लख कर… म्हणजे पाहिजे तेवढे पैसे … असे श्रींनी सुचवले. श्रींची आज्ञा शिरसावंद्य मानून गोपाळ भट धाराशिवकर, मिरजकर आणि अन्य सेवेकरी अल्लख करीत उभ्या अक्कलकोटात फिरले आणि चारपाचशे रुपये सहज जमा केले. वर्गणीतून हजार रुपये जमले.
फाल्गुन कृष्ण तृतीया इ.सन. १८६९ रोजी स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्णवेळ उपस्थितीत औदुंबराच्या छायेतील नवनिर्मित वास्तुत श्रीस्वामी महाराजांच्या पादुका आणि विष्णुपंचायतनाची स्थापना सासवडकर दीक्षितांसारख्या अनेक वैदिक विद्वानांच्या पौरोहित्याखाली झाली. श्रीमन् महागणाधिपतये नमः निर्विघ्नं मस्तु अशी गणेशवंदना करीत श्रीमहाराजांनी स्वत: अर्चेस प्रारंभ केला. स्वामी महाराजांच्या अक्कलकोटमधील वास्तव्यकाळात जे चार मठ स्थापन झाले त्यातील हा पहिला मठ होय. येथील शिवलिंगावर प्रतिष्ठीत पादुकांवर श्रीस्वामीरायांनी ओंजळीने धान्य घातले. दिक्षितांना चार पैसे दक्षिणा दिली. गणपतराव जोशींना श्रीफळ व प्रसाद आशीर्वाद स्वरूप दिला आणि महाप्रसाद विडा दक्षिणा देऊन प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आनंदात पार पडला. मुंबईचें स्वामीभक्त विनायक वासुदेव आगासकर आणि रावजी बळवंत ढवळे यांनी श्रींच्या प्रेरणेने जोशीमठापुढील सभामंडप त्याकाळात तब्बल आठ हजार रुपये खर्च करून उभारून दिला.
सोलापूरचे चिंतोपंत टोळ पुढे अक्कलकोटास भोसल्यांच्या सेवेत आले. या चिंतोपंतांचे बिऱ्हाड गणपतराव जोशींच्या वाड्यात होते. श्रीमहाराज चिंतोपंतांच्या घरी पूजेच्या वेळी उपस्थित झाले तर विष्णूसहस्त्रनामाची तुळशीपत्रे ते श्रींच्या चरण कमळांवर वहात असत. अशीच एके दिवशी आपले चरण कमल नित्य पूजेकरता निरंतर सन्निध असावेत अशी विनंती त्यांनी श्रींकडे केली. चिंतोपंत मोठे भाग्यवान, एरवी पाटावर बसून चरणसेवा घेणारे स्वामी महाराज त्यादिवशी पाटावर उभे राहिले आणि पूजाअर्चा आटोपल्यावर निघून गेले. दुसरे दिवशी पाटावरील तुळशीपत्राचे निर्माल्य बाजूला करताच श्रींची पदकमले त्यावर स्पप्ट उमटलेली दिसली. श्रींची पदचिन्हे असलेला हा पाट चिंतोपंतांनी अखेरच्या श्वासापर्यंत पुजला. पुढे त्यांच्या वंशजांनी हा पाट जोशीमठात दिला. याच जोशीमठात श्रीस्वामी महाराजांनी, विद्यारण्य स्वामींच्या पंचदशी ह्या वेदांतपर ग्रंथातील अडलेल्या श्लोकाचे विश्लेषण करून जय तीर्थ पुराणिक, गोपाळराव जोशींसारख्या विद्वानांना चकित करून सोडले होते. या मठाची पूजेअर्चेची व्यवस्था १९७२ सालपासून जहागिरदारांच्या वंशजांकडे होती. १९७२ नंतर ती गुरुमंदिरकडे सोपविण्यात आली. गुरुमंदिरातील पूजा आटोपल्यावर गुरुजी या मठातील पूजा अर्चा करतात. दैनंदिन कार्यक्रम व उत्सव गुरुमंदिराप्रमाणेच इथेही होतात. या मठातील विष्णुपंचायतनात, मागील बाजूस उंचावर डावीकडून प्रथम गणपती, नंतर शिवलिंग, मध्यभागी विष्णु व उजवीकडे अंबामाता अशा चार देवता विग्रह रुपात आहेत. श्रीसूर्य अर्थात् श्रीस्वामी महाराज हे तेजरूपात गृहित धरले आहेत.