श्रीस्वामी समर्थ महाराज आपल्या सव्वासातशे वर्षांच्या प्रदीर्घ जीवनकाळात अखंड हिंदुस्थानभर अविरत फिरले. आयुष्याचा अखेरचा उणापुरा बावीस वर्षांचा कालक्रम त्यांनी अक्कलकोट आणि परिसरात व्यतित केला. भटकंतीच्या माध्यमातून भक्तकल्याणाचा वसा पूर्ण करणारे श्रीस्वामी महाराजांसारखे संत विरळाच. रंजल्या गांजल्यांचा उद्धार, व्याधीग्रस्तांना आरोग्य, दुःखितांच्यां दुःखावर सुखाची फुंकर, भ्रष्टांना ताडन, आळशांना उद्योगाचा मंत्र आणि प्रापंचिकांना परमार्थाची शिकवण देत महाराज शेकडो ग्रामी, तीर्थक्षेत्री फिरले. दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी आणि सुष्टांना संरक्षण देण्यासाठी श्रीमहाराजांच्या रूपाने सगुण रूपात साक्षात् भगवंत वावरला. आपण महाराजांच्या ज्या विविध कथा, प्रसंग, घटना वाचत आहात, त्यावरून त्यांच्या पारमार्थिक अधिकाराची, अलौकिक दैवी सामर्थ्याची कल्पना आपणास आलीच असेल. या अक्कलकोट संस्थानची प्रसिध्दी दिगंत झाली ती मात्र श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्यामुळेच. हे गाव सर्व मुमुक्षूंचे श्रध्दास्थान ठरले. अक्कलकोटचे वैभव वाढले. अक्कलकाढा ही जिव्हादोषावर रामबाण असलेली औषधी या भागात मोठ्या प्रमाणावर उपजत असे. अकल्लक नावाची वनस्पती ज्या भूईकोटात विपुल प्रमाणात उगवते ते अक्कलकोट. शिवाय अक्कल हा शब्द बुध्दिचा निदर्शक आहे. अवकल म्हणजे बुध्दि, मती, प्रज्ञा, विचार, मनिषा, प्रेक्षा. कोट म्हणजे कुंपण, प्राकार. तसेच अंत:करण बुध्दि, अहंकार, मन, चित्त. ज्यात बुध्दि निश्चितपणे असते आणि त्याच्याभोवती अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय असे पाच प्रकारचे कोप असतात. अशा या अक्कलकोटात म्हणजेच बुध्दिग्रामात सच्चिदानंदस्वरूप परमात्मा स्वामी महाराजांचे वास्तव्य घडले. श्रीस्वामी समर्थ महाराजांनी १८५६ च्या सुमारास अक्कलकोटात प्रवेश केला त्यावेळी मालोजीराजे भोसले हे नुकतेच गादीवर बसले होते. ते महाराजांचे परमभक्त होते. मालोजीराजे जेव्हा इंग्रजांकडून पदच्युत झाले त्यावेळी स्वामीसमर्थ महाराजांनी स्वतः राजवाड्यात मुक्काम करून त्यांचे राज्य सांभाळले. मानवी देह धारण करून भक्तांच्या कल्याणार्थ अक्कलकोट येथे अवतरलेले परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराज ज्या ज्या स्थळी फिरायचे तिथे तिथे अतर्क्य घडायचे. अक्कलकोटमधील असंख्य वाडे, वास्तू, वापी, मंदिरे, मठ हे महाराजांच्या लीलांचे मूक साक्षीदार आहेत. महाराजांच्या एकवीस वर्षांच्या वास्तव्य काळात खुद अक्कलकोटमधील ज्या ज्या वाड्यांत, वापींवर, वास्तूंमध्ये, महाराजांच्या अनंत लीला घडल्या ती महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली स्थाने श्रींचे चरित्र वाचून, त्या त्या ठिकाणी जाऊन वंशजांना, संबंधित व्यक्तिंना भेटून फार परिश्रमाअंती शोधून काढली. स्वतः पाहिली, अनुभवली आणि आपल्यापुढे सादर केली आहेत.

वटवृक्ष देवस्थान – मुरलीधर मंदिर – साखर बावडी – थडगीमळा – हत्ती तलाव शेख नूर दर्गा जुना राजवाडा – भंडारखाना दत्तमंदिर लक्ष्मीतोफ – राजवाड्याजवळील चार देवळी गणेश पंचायतन – शहाजी हायस्कूल – राजे रायरायान मठ – वेलेनाथ बाबा समाधी मंदिर – रामचंद्राचे देवालय व वापी – राजांची खास बाग आणि तेथील महाकाय विहिरी – चोळाप्पाचे घर, समाधी मठ – जंगमाचा मठ – आईसाहेबांचे मंदिर – उपलप विठ्ठलमंदिर – खंडोबाचे मंदिर – गुरु मंदिर – हाक्याचा मारुती – वावा ज्योतिर्लिंग मंदिर – पटवर्धनांचे गणपती मंदिर – जोशीबुवांचा मठ – नवा राजवाडा सरदेशमुखांचा मारुती – लंडोरी बुवांचा मळा आणि मुजुमदार – ओंडकर – मोदी – हर्डीकर – ग्रामजोशी व मैंदर्गीकर यांचे वाडे व तेथील स्वामी वैभव अशा असंख्य पावन स्थळांचे दर्शन या स्थलदर्शिकेच्या माध्यमातून घडत राहिल.