महाराष्ट्रकर्ते समजल्या जाणाऱ्या देवगिरीच्या यादवांनी अक्कलकोटवर सुमारे दोनशे वर्षे राज्य केले. चपळगाव, कडबगाव येथे सापडलेले हेमाडपंती वास्तुकलेचे अवशेष या विभागाचे प्राचीनत्व सिध्द करतात. चौदाव्या शतकापासून अनेक राजवटी बदलत अक्कलकोट परगणा अखेर सातारा जिल्ह्याचा भाग बनला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू शाहू महाराज यांना औरंगजेबाने लग्नाची भेट म्हणून अक्कलकोट परगणा बहाल केला. पुढे शाहू महाराजांकडून तो फत्तेसिंह पहिले यांना खाजगी मालमत्ता म्हणून राजेशाही सन्मानचिन्हासहीत बहाल करण्यात आला आणि मोठ्या काळानंतर अक्कलकोटात मराठी राजवट सुरु झाली. त्याचा इतिहास रोमांचक आहे.
औरंगजेबाच्या कैदेतून मुक्त झालेले शाहू महाराज स्वराज्य परत मिळवण्यासाठी दक्षिणेकडे निघाले. सातारा – सोलापूर मार्गे प्रवास करीत असताना परसोजी भोसले आणि चिमाजी दामोदर हे त्यांना येऊन मिळाले. त्यामुळे शाहूंची बाजू बळकट झाली. परंतू राजारामाच्या पत्नी ताराबाईसाहेब शाहूंना वारस मानण्यास तयार नव्हत्या. या सर्व घडामोडी घडत असताना प्रवास करीत शाहू औरंगाबाद जिल्ह्यातील पारद गावी येऊन पोहोचले. त्यांनी पारदच्या पाटलाकडे मदत मागितली. परंतु मुघलांच्या बाजूने असल्यामुळे मदत करण्याऐवजी पारदचा पाटील शहाजी लोखंडे शाहूंवरच चाल करून आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून शाहूंनी सर्व सैन्यानिशी युद्ध केले आणि शहाजी लोखंडे पाटलाला ठार केले. एका लहान मुलाशिवाय पाटलांच्या घरात कर्ता पुरुष उरला नाही. त्यामुळे पाटलाच्या विधवेने घराण्याचा एकमेव वारस असलेला आपला मुलगा राणोजी शाहूंच्या चरणी अर्पण केला. शाहूंना त्या मुलाची दया आली. त्यांनी त्यास मानसपुत्र मानले. पारदचे ठाणे फत्ते झाले म्हणून या राणोजीचे फत्तेसिंह असे नामकरण केले. पारदच्या पाटलाचा हा मुलगा शाहूंना यशदायी ठरला. १७०८ ला शाहूंना सातारा इथे राज्याभिषेक झाला. फत्तेसिंह त्यांचे सोबत राजवाड्यात राहू लागला. वय लहान असल्यामुळे युध्द, राजनीती, न्यायदान, राज्यकारभार आदींचे प्रशिक्षण त्याला मिळू लागले. मोठा झाल्यावर जंजिरा, कर्नाटक, रायगड आदि मोहिमांमध्ये त्याने यशस्वी कामगिरी बजावली. राजघराण्यांशी संबंधित सर्व कामे फत्तेसिंह पार पाडीत. छत्रपती शाहूंनी फत्तेसिंहाचा वकूब ओळखून १७४९ ला त्यास अधिकृतपणे दत्तक घेतले. त्याचे नामकरण फत्तेसिंह भोसले असे करून, ५५ लाख उत्पन्नाचा मुलुख बहाल करून अक्कलकोटचा संस्थानिक म्हणून जाहीर केले. राजे फत्तेसिंह भोसले हे अक्कलकोटचे प्रथम संस्थानिक होत. यांच्यापासून अक्कलकोटच्या राजघराण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. फत्तेसिंहाचा प्रचंड नावलौकिक झाला. प्रसिध्दी मिळाली. सलग दहा वर्षे त्यांनी यशस्वी राज्यकारभार केला. त्यांच्याच काळात श्रीरामचंद्रांचे देवालय, भुईकोट किल्ला व जुन्या राजवाड्याचा काही भाग बांधला गेला. २० नोव्हेंबर १७६० रोजी अक्कलकोटचे प्रथम नरेश, राजे फत्तेसिंह यांनी देह ठेवला. फत्तेसिंह महाराजांना औरस पुत्र नव्हता. त्यामुळे त्यांचे दत्तकपुत्र शहाजी राजे गादीवर आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र फत्तेसिंह (दुसरे) सत्ताधिश झाले. त्यानंतर पहिले मालोजी राजे १८२८ ला केवळ पाचच वर्षे राज्य कारभार पाहून कालवश झाले आणि त्यांचे चिरंजीव शहाजी राजे (दुसरे) हे सत्तेवर आले. ते अल्पवयीन असल्यामुळे १८३० नंतर राज्यकारभार साताऱ्याचे राजे प्रतापसिंह राजे भोसले पाहात होते.
१८५६ मध्ये शहाजी राजे दुसरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मालोजीराजे (दुसरे) गादीवर आले. १८५७ ते १८७० अशी तेरा वर्षे त्यांची कारकीर्द झाली. स्वामींच्या चरित्रात ज्या भालोजी राजेंचा उल्लेख येतो, तेच हे स्वामीकृपांकित अक्कलकोट नरेश, मालोजी राजे (दुसरे) होत.
१८६७ साली मालोजीराजेंना श्रींच्या कृपेने पुत्ररत्न झाले. त्यांचे नाव श्रीमंत शहाजीराजे तिसरे. १८७० साली मालोजी राजांना इंग्रजांनी पदच्युत केले आणि मुंबापुरीत नजरकैदेत ठेवले. यावेळी त्यांचे अज्ञान सुपुत्र शहाजी राजे तिसरे वयाच्या चवथ्या वर्षी गादीवर बसले. ते अल्पवयीन होते. त्यामुळे १८७० ते १८७१ पर्यंत अक्कलकोटचा कारभार ब्रिटिशांच्या व्यवस्थापनाखाली सुरु होता. विठ्ठल टिकाजी उपलप, चिंतोपंत टोळ ही मंडळी राज्यकारभारात संस्थानिकांना मदत करत होती. त्यामुळे श्रीमहाराज काही काळ राजवाड्यात जाऊन राहिले होते. पुढे श्रींच्या कृपेने राजेसाहेब परत आले तेव्हा, आपली गावी आता सांभाळ अशी आज्ञा करून स्वामी तिथून बाहेर पडले. स्वामींच्या कृपेने संस्थानची जप्ती खुली झाली. राजास पूर्ण अधिकार दिला नव्हता. राज्यकारभार चालवण्यासाठी माधवराव विठ्ठल विंचूरकर यांश रिजंट तर माधवराव गोविंद रानडे यांस कारभारी नेमले. २५ नोव्हें. १८९१ रोजी अक्कलकोटच्या गादीवर बसलेल्या स्वामी समर्थ कृपांकित शहाजी राजे (तिसरे) यांना पूर्ण अधिकार मिळून ते कारभार पाहू लागले. १८९६ साली त्यांना देवाज्ञा झाली. शहाजी राजेंना देखील पुत्र नसल्यामुळे १८९९ मध्ये फत्तेसिंह यांस दत्तक घेऊन गादीचा वारस म्हणून नेमले. त्यांच्या कारकीर्दीत १९१६ साली इंग्रजांनी सर्व प्रतिबंध उठवून त्यांच्या हाती खऱ्या अर्थाने कारभार सोपवला. या फत्तेसिंहांनी पहिल्या महायुध्दात इंग्रजांतर्फे मोठ पराक्रम गाजवला. पूर्वीचा राजवाडा जुना होत चालल्यामुळे याच फत्तेसिंह महाराजांनी परदेशी शिल्पकलेचा अभ्यास करून गावाच्या पश्चिमेस सात मजली अष्टकोनी असा अतिभव्य असा नवा राजवाडा उभारला. १९२३ साली फत्तेसिंह तिसरे यांना पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल केले होते. परंतु चुकीचे औषध पोटात गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव विजयसिंह भोसले गादीवर आले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपले अवकलकोट संस्थान अखंड भारतात विलीन केले. भारत सरकारकडून मिळत असलेल्या तनख्याचे वारस पुढे जयसिंह राजे उर्फ बाबासाहेब महाराज झाले. बाबासाहेब महाराजांचे १९६५ साली निधन झाले. या बाबासाहेबांना संयुक्ताराजे व सुनिताराजे अशा दोन कन्या आहेत. सध्याच्या अवकलकोट संस्थानच्या अधिपती आहेत.